अजून खूप शिकायचे आहे. खूप गोष्टी समजायच्या आहेत. मी अजून लहान आहे. शिवचरित्रात नवनवीन विचार आहेत. शिवचरित्र अभ्यासले. वाचन केले. वडिलांकडून व शिक्षकांकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. असे शिक्षण नव्या पिढीलाही मिळावे, असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडले.
साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान आणि शिवशाही प्रतिष्ठान यांच्या वतीने येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये पुरंदरे यांची ग्रंथतुला करण्यात आली. या वेळी ते बोलत होते. शिवाजी महाराजांनी जिजामातांची सुवर्णतुला करताना डबीर नावाच्या नोकराचीही सुवर्णतुला केल्याचे त्यांनी नमूद केले. शिवचरित्रासारखे शिक्षण नव्या पिढीला मिळाल्यास ही पिढी समृद्ध होईल व राष्ट्रप्रेमाचे बाळकडू या तरुणांना मिळेल, असेही ते म्हणाले. साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठानचे मिलींद कुलकर्णी, संदीप महाजन, स्वप्निल देशपांडे, अनिल भालेराव, आदी या वेळी उपस्थित होते. जयश्री शाह यांनी सूत्रसंचालन केले.