सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात गेल्या ४८ तासांत कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. आज दुपारपासून पावसाने थोडीफार विश्रांती घेतली. या पावसामुळे सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या पाच घरांत पाणी शिरले, तर वनराई बंधारे वाहून जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, त्याची मोजदाद सुरू आहे.
काल मंगळवारी पहाटेपासून पावसाने प्रारंभ केला तो आज बुधवारी दुपापर्यंत सुरू होता. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आठही तालुक्यांत एकूण १२७९ मि.मी. म्हणजेच सरासरी १६९ एवढय़ा पावसाची नोंद झाली आहे. सिंधुदुर्गात आठही तालुक्यांत कोसळलेल्या विक्रमी पावसाच्या नोंदीत वैभववाडी २५७ मि.मी., सावंतवाडी १८३ मि.मी., कणकवली १६८ मि. मी., दोडामार्ग १४३ मि.मी., कुडाळ १४२ मि.मी., देवगड १३४ मि.मी., वेंगुर्ले १२७ मि.मी. व मालवण १२५ मि.मी. मिळून एकूण आठही तालुक्यांत १२७९ मि.मी. एवढा विक्रमी पाऊस कोसळला.
या अतिवृष्टीमुळे मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी रात्री खारेपाटण, भंगसाळ व पीठढवळ नद्यांना पूर आल्याने मार्ग बंद होता. या महामार्गावरील वाहने रोखण्यात आली होती. नंतर पर्यायी व्यवस्था करण्यात आली. आज पूरस्थिती नसल्याचे जिल्हा आपत्ती यंत्रणेकडून सांगण्यात आले.
करुळ घाटात दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू होती तर आंबोली घाटात दरडीचे दगड व झाडे रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळे आले. आज दुपारनंतर दोन्ही घाटांतून वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे सांगण्यात आले.
काल मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी एका डेव्हलपरने भूखंड डेव्हलप करताना झाडांचे बुंधे नाल्यात टाकले होते. त्यामुळे नाल्याचा प्रवाह बदलून पायथ्याशी असणाऱ्या पाच घरांत या भूखंडाच्या मातीसह चिखल मंगळवारी रात्री घुसला. सुमारे १५ ते २० लोकांनी घरात पाणी घुसल्यानंतर युद्धपातळीवर प्रयत्न करून अनर्थ टाळण्यासाठी प्रयत्न केला त्यामुळे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.
प्रांताधिकारी सुषमा सातपुते, तहसीलदार विरसिंग वसावे, नगरपालिका मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, अभियंता तानाजी पालव, नगरसेवक विलास जाधव आदी सर्वानी घरात पाणी घुसून चिखलमय झालेल्या परिस्थितीची पाहणी केली.
सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथील पुलाचा भाग खचला, तर डेगवे येथील वनराई बंधारा फुटून ३० ते ३५ एकर शेती नापीक झाली. त्यामुळे २० खातेदार शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार दोन लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. न्हावेलीत बांधण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. शेतीचे प्रचंड नुकसान झाले. शिवाय लोकांना जाण्यायेण्यास अडथळा निर्माण झाल्याची पाहणी तहसीलदार बसावे यांनी केली. अशोक परब यांच्या घरावर संरक्षक भिंत कोसळून ८१ हजार तर प्रमिला राजाराम कदम हिचे ९५ हजार रुपयांचे नुकसान झाले. सावंतवाडी तालुक्यात घरांची पडझड, बंधारे वाहून गेल्याने भात शेतीचे असे मिळून पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कालपासून सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे नदीनाल्याचे प्रवाह बदलून भातशेतीत चिखल घुसल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jul 2013 रोजी प्रकाशित
मुसळधार पावसाने सिंधुदुर्गचे जनजीवन विस्कळीत
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात गेल्या ४८ तासांत कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. आज दुपारपासून पावसाने थोडीफार विश्रांती घेतली. या पावसामुळे सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या पाच घरांत पाणी शिरले, तर वनराई बंधारे वाहून जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, त्याची मोजदाद सुरू आहे.

First published on: 04-07-2013 at 04:48 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stormy rain affects lives in sindhudurga