जिल्ह्यातील पानेवाडी येथील भारत पेट्रोलियमच्या प्रकल्पात पाच दिवसांपासून सुरू असलेला इंधन टँकरचालकांचा संप मागे घेण्यात आला आहे. खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी कंपनी प्रशासन व वाहतूकदारांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर तोडगा निघू शकला. संप मिटल्याने टँकरमधून इंधन वाहतूक पूर्ववतपणे सुरू झाली आहे. भारत पेट्रोलियम प्रकल्पाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत संपामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यामुळे त्वरित तोडगा काढण्यावर एकमत झाले. वाहतूक दर वाढविणे, ई टेंडर, टँकरचालकांचे शिक्षण तसेच अपघात कमी होण्याबाबतचे प्रशिक्षण, याविषयी सविस्तर चर्चा होऊन सर्व मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी स्थानिक अधिकाऱ्यांनी घेतली. वाटाघाटी सकारात्मक झाल्याने अखेर १६० टँकरचालकांनी संप मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले. खा. चव्हाण यांच्यासमवेत झालेल्या बैठकीच्या वेळी भारत पेट्रोलियमचे वरिष्ठ अधिकारी बी. के. विश्वास, संदीप गुप्ता तसेच वाहतूकदारांचे प्रतिनिधी नाना पाटील, दिलीप आहेर तसेच टँकरचालक व भाजपचे पदाधिकारी नितीन पांडे, नारायण पवार, कांतीलाल लुणावत आदींनी चर्चेत भाग घेतला.