रस्त्याच्या मधोमध भरधाव जाणारा कंटेनर व प्रवासी वाहतूक करणाऱ्या टमटमची समोरासमोर धडक बसून टमटममधील तीन जण जागीच ठार, तर अन्य आठ जण गंभीर जखमी झाले. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास उस्मानाबाद-तुळजापूर रस्त्यावर सिद्धेश्वर वडगावनजीक ही दुर्घटना घडली. अपघात इतका भीषण होता की, कंटेनरने टमटमला जवळपास ५० फूट फरफटत नेले.
उस्मानाबाद तालुक्यातील दीपकवाडी येथून प्रवासी घेऊन उस्मानाबादच्या दिशेने येणारा टमटम (एमएच २५ एफ १५७७) वडगाव येथील सिद्धेश्वर देवस्थाननजीक आला असता, उस्मानाबादहून तुळजापूरच्या दिशेने रस्त्याच्या मधोमध भरधाव जाणाऱ्या कंटेनर (एमएच ४६ एच ७८७८) चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून टमटमला समोरासमोर धडक दिली. अपघातग्रस्त टमटम जवळपास ५० फूट मागे फरफटत जाऊन रस्त्याकडेला उलटला. तोवर टमटममध्ये बसलेल्या चालकासह ११जणांपकी चंद्रकला केवटे (वय ४८, ढेकरी), अनिता मरतड (वय ५०, बामणीवाडी), टमटमचालक उद्देश राठोड (दीपकवाडी) हे जागीच मरण पावले, तर बंडू खंडागळे (वय ३८, जुनोनी), अर्चना सिरसट (वय ३५, बोरी), सुभाष बनसोडे (वय ३५, लासोना), ज्योती सिरसट (वय १७, बोरी), सुवर्णा लगदिवे (वय ५०, शेकापूर), निर्मला लगदिवे (वय ५०, शेकापूर), अजित पवार व अन्य एक असे आठ जण गंभीर जखमी झाले.
अपघात घडताच लोकांनी धाव घेत उस्मानाबाद शहर पोलिसांना माहिती कळविली. शहर पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ येऊन जखमींना उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोघा जणांना सोलापूर येथे हलविण्यात आल्याचे वृत्त आहे. घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू हेते. दरम्यान, घटनास्थळावर टमटमचा चक्काचूर झाला होता. अपघातग्रस्त कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेतला.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Apr 2015 रोजी प्रकाशित
कंटेनरची टमटमला धडक; ३ जागीच ठार, आठ गंभीर
रस्त्याच्या मधोमध भरधाव जाणारा कंटेनर व प्रवासी वाहतूक करणाऱ्या टमटमची समोरासमोर धडक बसून टमटममधील तीन जण जागीच ठार, तर अन्य आठ जण गंभीर जखमी झाले.
First published on: 03-04-2015 at 01:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three died in road accident