वन्यजीव तज्ज्ञांचे मत
गोंदियातील नरभक्षक वाघिणीला गोळ्या घालून ठार मारल्याचे तीव्र पडसाद पर्यावरण आणि वन्यजीव अभ्यासकांमध्ये उमटले आहेत. गोंदियातील नवेगाव पार्क परिसरात पाच महिलांवर हल्ला करणारा बिबटय़ा आणि वाघ या दोघांनाही गोळ्या घालण्याचे आदेश राज्याचे मुख्य वन्यजीव संरक्षक एस. डब्ल्यू. एच. नकवी यांनी जारी केल्यानंतर नरभक्षक असल्याच्या अंदाजाने वाघिणीला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. या वाघिणीने ४ जानेवारीला शेवटची मानवी शिकार केली होती. त्यानंतर या परिसरात माणसांवर हल्ले झालेले नाहीत. नक्षलवाद्यांविरुद्ध लढण्याची जबाबदारी असलेल्या कमांडोने वाघिणीला गोळ्या घातल्या.
पाचही महिलांवरील हल्ले जंगलाच्या आतील भागात झालेले आहेत. त्यामुळे या बिबटय़ाला किंवा वाघिणीला नरभक्षक म्हणणे कितपत योग्य आहे, असाही सवाल पर्यावरणवाद्यांकडून विचारण्यात आला आहे. एनटीसीएने या गोळीबाराची गंभीर दखल घेतली असून संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी केली जाणार आहे. या वाघिणीने डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत गोंदियाच्या जंगल परिसरातील गावांमध्ये प्रचंड दहशत माजविली होती. दर चार दिवसांनी एक अशा मानवी शिकारी तिने केल्या. तिला ठार मारल्यानंतर सध्या हा परिसर शांत असून लोक त्यांच्या नित्याच्या कामावर जाऊ लागले आहेत.
मानव-वन्यप्राणी संघर्षांच्या सर्वाधिक घटना विदर्भात घडत आहेत. २००७ मध्ये तळोधीला नरभक्षक वाघिणीने धुमाकूळ घातला होता. तेव्हापासून नरभक्षकांना गोळ्या घालण्याचे प्रसंग उद्भवत आहेत. गोंदियाची वाघीण नरभक्षक नसेल तर एकूण १५ वाघांची हत्या झाल्याचे मानले जात आहे. एक वाघीण तिच्या संपूर्ण आयुष्यात १५ पिल्लांना जन्म देते. त्यामुळे देशातील १५ वाघांना जन्माला येण्यापासून रोखले गेले आहे, असा त्याचा अर्थ काढण्यात येत आहे.
असे का घडावे, असा सवाल गोंदियाचे विभागीय वनाधिकारी रामा राव यांना केला असता वनक्षेत्रातील वाघांच्या हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी गस्ती पथकांची सक्रियता वाढवावी लागेल, असे त्यांनी सांगितले. पर्यावरण व वन्यजीवतज्ज्ञांच्या मते मानव-वन्यप्राणी संघर्षांच्या घटना भविष्यात अपरिहार्य ठरणार असल्याने त्या रोखण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडियाचे मध्य भारताचे संचालक नितीन देसाई म्हणाले, गोंदियातील जंगलात गेल्या काही वर्षांपासून वाघाचे अस्तित्व नव्हते. परंतु, एवढय़ातच वाघांचे अस्तित्व जाणवायला जागले होते, तर त्यांच्या हालचालींवर योग्य पद्धतीने देखरेख सुरू करण्याची आवश्यकता होती. हिंस्र प्राण्यांच्या वावरावर शास्त्रीय पद्धतीने देखरेख (मॉनिटरिंग) करणे हाच मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्याचा योग्य मार्ग आहे.
गोंदियातील घटनास्थळी भेट देणाऱ्या वन्यजीवतज्ज्ञ व एनटीसीएच्या प्रतिनिधी पूनम धनवटे म्हणाल्या, मानवी शिकार रोखण्यासाठी हिंस्र प्राण्यांच्या हालचालींचा सातत्याने मागोवा घेणे वन खात्याचे काम आहे, जेणेकरून माणसाचा जीव वाचू शकेल. अलीकडेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात एका वाघिणीने पाळीव जनावरांवर हल्ले करून शिकार केल्याच्या घटना घडल्या. या वाघिणीला मानवी वस्त्यांत शिरण्यापासून रोखण्याचे उपाय तातडीने झाल्याने पुढील मनुष्यहानी टाळता आली. गावातील तरुण आणि वन खात्याच्या गस्ती पथकाच्या मदतीने यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते.
पूनम धनवटे आणि हर्ष धनवटे हे दाम्पत्य टायगर रिसर्च अँड कन्झव्र्हेशन ट्रस्ट (ट्रॅक्ट) ही स्वयंसेवी संस्था चालविते. या दाम्पत्याने चंद्रपुरातील तळोधीत २००७ साली वाघिणीच्या धुमाकूळानंतर ताडोबा-अंधारी परिसरातील मानव-वन्यप्राणी संघर्ष रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न चालविले आहेत. मानवाचा वावर असलेल्या जंगल परिसरात असा संघर्ष उफाळून येऊ नये, याची काळजी घेण्यासाठी असंरक्षित क्षेत्रात वन्यजीव व्यवस्थापन अधिक परिणामकारकरीत्या राबविण्याची गरज धनवटे दाम्पत्याने व्यक्त केली.
ट्रॅप कॅमेरे आणि वाघाच्या पावलांच्या मागावर सातत्याने लक्ष ठेवून त्यांच्या हालचालींचा अंदाज घेत असल्याने संघर्ष टाळण्यात ‘ट्रॅक्ट’ला मोठय़ा प्रमाणावर यश लाभले आहे. यामुळे वाघांच्या हालचालींबाबत गावक ऱ्यांना जागरूक केले जाते. ब्रम्हपुरी परिसरात गेल्या दोन वर्षांत वाघ वा बिबटय़ाने माणसावर हल्ला केल्याची एकही घटना घडलेली नाही, याकडे धनवटे यांनी लक्ष वेधले.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jan 2013 रोजी प्रकाशित
मानव-वन्यप्राणी संघर्ष रोखण्यासाठी ‘टायगर मॉनिटरिंग’ हाच सर्वोत्तम मार्ग
गोंदियातील नरभक्षक वाघिणीला गोळ्या घालून ठार मारल्याचे तीव्र पडसाद पर्यावरण आणि वन्यजीव अभ्यासकांमध्ये उमटले आहेत. गोंदियातील नवेगाव पार्क परिसरात पाच महिलांवर हल्ला करणारा बिबटय़ा आणि वाघ या दोघांनाही गोळ्या घालण्याचे आदेश राज्याचे मुख्य वन्यजीव संरक्षक एस. डब्ल्यू. एच. नकवी यांनी
First published on: 16-01-2013 at 04:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger monitaring is the best way to stop humen and animal fight