भारतीय हवाई दलाच्या जवानांनी प्रशिक्षण घेण्यासाठी वापरलेले पहिले विमान आणि दुसऱ्या महायुद्धात भारताकडून वापर झालेले ‘विन्टेज टायगर मॉथ’ हे विमान बुधवारी पुण्यातील लोहगाव येथील लष्करी विमानतळावर दाखल झाले. ‘टायगर मॉथ’ व अत्याधुनिक ‘सुखोई’ या विमानांनी प्रदर्शनीय उड्डाण एकाच वेळी करून आपली कौशल्यक्षमता दाखवत येथील नागरिकांची व जवानांची मने जिंकली.
टायगर मॉथ हे सन १९३० नंतर विकसित करण्यात आलेले विमान आहे. भारतीय हवाई दलाच्या जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी या विमानाचा पहिल्यांदा वापर केला. त्याचबरोबर या विमानाच्या मदतीने भारतीय हवाई दलाच्या जवानांनी अफगाणिस्तान व बर्मा या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला होता. २६ ऑक्टोबर १९३१ रोजी या विमानाने प्रथम अवकाशात उड्डाण केले होते. भारतीय हवाई दलाचा इतिहास सांगणारे ‘टायगर मॉथ’ हे चालू स्थितीतील एकमेव विमान असून ६ ते १० फेब्रुवारीदरम्यान बंगळुरू येथे होणाऱ्या ‘एअर शो’ मध्ये सहभाग घेण्यासाठी दिल्लीहून निघाले आहे. ग्रुप कॅप्टन डी. एस. डांगी आणि विंग कमांडर एच. कुलश्रेष्ठ हे दिल्ली, जयपूर, जोधपूर, अहमदाबाद, सुरत, पुणे, बेळगाव मार्गे बंगळुरूला हे विमान घेऊन जात आहेत.
याबाबत एच. कुलश्रेष्ठ यांनी सांगितले की, भारतीय हवाई दलामधील महत्त्वपूर्ण व प्रशिक्षणासाठी वापरले जात असलेले ‘टायगर मॉथ’ हे पहिले विमान आहे. भारतातच फक्त उड्डाण करू शकेल असे एकच टायगर मॉथ विमान आहे. या विमानाचा बाह्य़ भाग हा कापडासारखा असून ते बहुतांशी लाकडापासून बनवलेले आहे. या विमानाच्या इंजिनचा व समोरचा भाग तेवढा लोखंडापासून बनविलेला आहे. हे देखभालीसाठी सोपे आहे. दिल्लीहून हे विमान घेऊन येताना विविधतेने नटलेला भारत पाहण्याचा एक अद्भुत अनुभव होता. या विमानात तंत्रज्ञानाचा वापर नसल्यामुळे त्याला उडविण्यासाठी विशिष्ट कौशल्य लागते. त्यासाठी निर्णय हे स्वत:लाच घ्यावे लागतात. हे विमान एकाच वेळी चारशे किलोमीटर धावू शकते. मात्र, उड्डाण करू शकेल असे हे एकमेव विमान असल्यामुळे त्याला दोनशे किलोमीटपर्यंत चालविले जाते. ते सहा हजार मीटर उंचीपर्यंत त्याला नेता येऊ शकते. बंगळुरू येथे होणाऱ्या एअर शोमध्ये अत्याधुनिक विमानांबरोबरच हे विमान सहभागी होणार आहे.
‘टायगर मॉथ’चे २३ वर्षांनंतर उड्डाण
प्रशिक्षण विमान म्हणून नावाजलेले ‘टायगर मॉथ’ हे १९५१ पर्यंत युनायटेड किंगडममध्ये, तर १९५५ पर्यंत न्यूझीलंडमध्ये सेवा देत होते. जगात आठ हजार सातशे ‘टायगर मॉथ’ विमाने तयार करण्यात आली होती. ती १९५६ नंतर वायुदलातून निवृत्त करण्यात आली. भारतात त्यानंतरही चार टायगर मॉथ कार्यरत होती. मात्र, १९८९ साली यामध्ये काही त्रुटी निर्माण झाल्यामुळे त्याचे उड्डाण थांबण्यिात आले होते. भारतीय हवाई दलाचा इतिहास सांगणारे विमान असावे म्हणून टायगर मॉथ पुन्हा उड्डाणासाठी सज्ज झाले. त्याने तब्बल २३ वर्षांनंतर म्हणजे ऑक्टोबर २०१२ मध्ये पुन्हा उड्डाण केले, अशी माहिती विंग कमांडर राहुल देशपांडे यांनी दिली.
भारतीय हवाई दलाचा इतिहास मांडणारी११ विमाने पुन्हा आकाशात झेपावणार
भारतीय हवाई दलाचा इतिहास तरुणांपुढे यावा आणि या क्षेत्राकडे तरुणांनी अकर्षित व्हावे, या दृष्टिकोनातून हवाई दलात महत्त्वाची कामगिरी बजावलेली अकरा ऐतिहासिक विमाने दुरुस्त करून पुन्हा उड्डाणासाठी तयार करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहेत. भारतीय हवाई दलातील ‘टायगर मॉथ’ या पहिल्याच विमानाने ऑक्टोबरमध्ये अशा प्रकारे उड्डाण केल्यानंतर येत्या मे-जून महिन्यात ‘हावर्ड’ हे दुसरे ऐतिहासिक विमान उड्डाणासाठी सज्ज होईल.
या मोहिमेचे प्रमुख आणि विंग कमांडर राहुल देशपांडे यांनी बुधवारी ही माहिती दिली. हवाईदलातील अनेक विमानांनी देशाच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यातील अनेक विमाने आता इतिहास जमा झाली आहेत. हवाई दलाचा इतिहास सांगणाऱ्या या विमानांचे संवर्धन करून ती पुन्हा उड्डाणयोग्य करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये विन्टेज टायगर मॉथ, हावर्ड, विपीती, टेम्पेस्ट, हरिकेन, स्पीड फायर या विमांनाचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून टायगर मॉथ उड्डाणासाठी सज्ज करण्याचे हवाई दलाचे प्रयत्न सुरू होते. अथक परिश्रमानंतर विन्टेज टायगर मॉथ हे ऑक्टोबर २०१२ मध्ये उड्डाणासाठी सज्ज झाले. यानंतर हावर्ड हे दुसरे ऐतिहासिक विमान उड्डाणासाठी सज्ज करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते मे ते जून महिन्यात सज्ज होईल. त्यानंतर हिंदुस्थान ट्रेनिंग २ (एचटी २) हे पूर्णपणे भारतीय बनावटीचे विमान सज्ज केल.
आज जगातील अत्याधुनिक म्हणून गणल्या जाणाऱ्या भारतीय हवाई दलाचा विकास कसा होत गेला? आपले पूर्वज कोणती विमाने चालवत होते? याची माहिती पुढील पिढीला व्हावी आणि अधिकाधिक तरुण या क्षेत्राकडे एक व्यवसाय म्हणून पाहतील या दृष्टिकोनातून ऐतिहासिक कामगिरी केलेली विमाने पुन्हा सज्ज केली जाणार आहेत. त्यामध्ये काही बदलही केले जातील. ही विमाने भारतीय हवाई दलाचा इतिहास सांगतील, असे देशपांडे यांनी सांगितले.