लातूर-अंबाजोगाई रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणारी हैदराबाद बँक कॉलनीसमोरील मंदिरासमोर असलेली दोन मोठी झाडे अखेर तोडण्यात आली. देवस्थानचे सदस्य व नागरिकांशी चर्चा करून कोणाच्या धार्मिक भावनेला ठेच न पोहोचवता ही झाडे दूर करण्यात आली.
हे मंदिर अंबा हनुमान नावाने ओळखले जाते. नवसाला पावणारा हनुमान म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. मंदिरासमोर िपपळाचे व वडाचे अशी दोन मोठी झाडे होती. झाडाच्या सावलीत बसता यावे, यासाठी झाडाभोवती बांधलेले दोन गोलाकार ओटे, झाडाच्या सावलीमुळे भर उन्हाळय़ातही ओटय़ावर भाविक, पेन्शनरांची गर्दी होत असे. गर्दीमुळे भाजी, फळविक्रेत्यांचे गाडे असत. दिवंगत विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना शहराबाहेरील रस्त्यांचे रुंदीकरण झाले. यात हनुमान मंदिर रस्त्यावर आले. त्यामुळे भररस्त्यावर गर्दी होऊ लागली. वाहनांना येथून जाणे जिकिरीचे झाले होते. छोटय़ा-मोठय़ा अपघातांचे प्रमाणही वाढले होते.
नगरसेवक अॅड. दीपक सूळ अंबा हनुमान ट्रस्टमध्ये सरचिटणीस आहेत. त्यांनी ट्रस्टचे सदस्य व नागरिकांशी चर्चा करून मंदिराच्या मागील मोकळय़ा जागेत गेल्या वर्षी अंबा हनुमानाची विधिवत स्थापना केली. मंदिर पाठीमागे गेले; पण दोन झाडे भररस्त्यात होती. मंदिरासमोर वड व िपपळ अशी झाडे लावून वाढविली व रस्त्यातली झाडे तोडून रस्ता मोकळा केला.