केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने श्रीरामपूर शहरातील केंद्रीय उत्पादन, सीमा शुल्क व सेवा कर अधीक्षकांच्या कार्यालयावर छापा टाकून दोघा लाचखोर निरीक्षकांना रंगेहाथ पकडले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. शहरात अशा प्रकारची कारवाई प्रथमच झाली आहे.
चिटफंड योजनेचा चालक संतोष जाधव यांनी पुणे येथील सीबीआयच्या पथकाकडे तक्रार नोंदविली होती. त्यानुसार निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या पथकाने नगरपालिकेमागील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर छापा टाकून लाचखोर निरीक्षक अखिलेश कुमार सिंग (रा. रोहतक, बिहार) व अशोक उर्फ लक्ष्मण शिवाजी भोसले (रा. भोसलेआखाडा, नगर) यांना अटक केली. विशेष सत्र न्यायाधीश एम. जे. मिर्झा यांनी दोघांना दि. २ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
चिट फंड योजनेचे चालक जाधव यांना सेवा कर भरण्यासाठी सेवा कर क्रमांक १ व २ चे प्रमाणपत्र हवे होते. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन अर्ज केला होता. या अर्जावर अधीक्षकाचा सही, शिक्का हवा असतो. तो मागितला असता निरीक्षक सिंग यांनी दोन हजार रुपयांची मागणी केली होती. जाधव यांनी यासंदर्भात सीबीआयच्या पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली होती. सिंग यांनी मोबाईलवर लाचेची मागणी केली. त्यावेळी जाधव यांनी त्याचे रेकॉर्डीग केले होते. हे रेकॉर्डीगही तक्रारीसोबत त्यांनी दिले होते. काल पथकाच्या निरीक्षक सुजाता तानवडे, निरीक्षक स्वाती देसाई, अधिकारी शीतल शेंडगे, उपनिरीक्षक कुमार भास्कर, हवालदार पी. एन. गुरव, शिपाई यू. एम. पारखी यांनी छापा टाकला. लाच म्हणून  घेतलेले चौदाशे रुपये सिंग यांच्या खिशात तर भोसले यांच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये मिळून आले. सापळ्यात दोघे अधिकारी रंगेहाथ पकडले गेले. भोसले याच्या नगर येथील घरीही सीबीआयच्या पथकाने छापा घातला. आता या दोघांच्याही बेनामी संपत्तीचा शोध घेतला जाणार आहे.