मराठवाडय़ाची तहान भागविण्यासाठी दारणा धरणातून पाणी सोडण्याकरिता गुरूवारी सकाळचा मुहूर्त निवडला गेला असला तरी पाटबंधारे विभाग त्या अनुषंगाने नियोजन करू न शकल्याने दिवसभरात पाणीच सोडण्यात आले नाही. आता शुक्रवारी सकाळपासून हे पाणी सोडले जाणार आहे. मात्र, तत्पुर्वीच पाणी सोडण्यास विरोध करणाऱ्या स्थानिकांनी दारणा धरणावर तीव्र आंदोलन केले. यावेळी आंदोलकांशी बाचाबाची होऊन त्यांना अटकाव करण्यासाठी पोलिसांना बळाचाही वापर करावा लागला. धरणातील पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्न करणारे मनसेचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्यासह आणखी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले.
गुरूवारी दारणातून पाणी सोडले जाणार असल्याने परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मराठवाडय़ासाठी हे पाणी सोडल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा मनसेने दिला होता. मेंगाळ यांनी २०० स्थानिक शेतकऱ्यांसह धरण परिसरात धडक दिली. प्रवेशद्वारावर ठाण मांडून पाणी सोडू नये, अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली. यावेळी नांदगाव बुद्रुकचे माजी सरपंच भाऊसाहेब गायकर यांनी पाण्यात उडी मारली. मेंगाळही उडी मारण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी प्रवेशद्वारावरील आंदोलकांनी पाण्याकडे धाव घेतल्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.  
मनसेच्या १५ पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. या घडामोडीत नियोजन पूर्णत्वास न गेल्यामुळे दिवसभरात धरणातून पाणी सोडण्यात आले नाही.  दारणा व गोदावरी नदीवरील १२ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी अडविले जाऊ नये म्हणून फळ्या काढण्याचे काम बाकी होते. त्यामुळे गुरूवारी पाणी सोडण्यात आले नाही. रात्री उशिरा ते काम पूर्णत्वास गेल्यानंतर शुक्रवारी सकाळी सहाला पाणी सोडले जाईल, अशी माहिती नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उत्तम म्हस्के यांनी दिली. नदीकाठावरील गावांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचे कामही पूर्णत्वास गेले आहे.
दरम्यान, स्थानिकांचा असंतोष कमी करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडी व भंडारदरा धरणातून सिंचनासाठी एका मर्यादेत शेतीसाठी आवर्तन देण्याचे नियोजन या विभागाने केले आहे.