अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातून १७५० क्युसेक वेगाने जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यात आले आहे. तसेच ज्यामार्गाने जायकवाडी धरणात पाणी येणार आहे या दरम्यानच्या गावांतील वीजपुरवठा खंडीत करुन पाणीचोरी रोखण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात यावे, अशी याचीका सोमनाथ रोडे यांनी खंडपीठात दाखल केली होती. यावर गेल्या बुधवारी न्यायालयाने पाणी सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली होती. दरम्यान, राज्य शासनाने पुनर्विलोकन याचिका दाखल केली. खंडपीठाने याचिका फेटाळून लावली आणि हस्तक्षेप अर्जावर सोमवारी सुनावणी घेण्याचे निश्चित केले.
नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपली होती. त्यानंतर आज(रविवार) सकाळी निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. जायकवाडी धरणात पाणी येण्यास ४८ तास लागण्याची शक्यता आहे.