रंगभूमी म्हणजे एक प्रकारचं वेगळं जगच आहे. रंगभूमीची झिंग एकदा चढली की ती आजन्म त्या व्यक्तीसोबतच असते. रंगभूमीच्या जगात तुम्ही विविध अनुभव घेत समृद्ध होत असता. अशा या रंगभूमीविषयीचे कलाकारांचे अनुभव आपण या सदरातून अनुभवले. आतापर्यंत अनेकांनी आपल्या कष्टाने आणि एकनिष्ठेने मराठी रंगभूमी गाजवली. मराठी रंगभूमीच सबकुछ मानणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांनीही त्यांचे रंगभूमीवरचे अनुभव ‘लोकसत्ता ऑनलाइन’कडे शेअर केले.

‘सखाराम बाइंडर’, ‘रथचक्र’ आणि ‘कमला’. लालन सारंग यांच्या आयुष्यातील ही तीन महत्वाची नाटकं. त्यातील त्यांच्या भूमिका कलावंत म्हणून त्यांचा कस पाहणाऱ्या तर होत्याच. पण त्याचबरोबर जगण्याचं नवं भान देणाऱ्या होत्या. पण हीच तीन नाटकं त्यांची ओळख नक्कीच नाही. आयुष्याकडे मागे वळून बघताना लालन सारंग यांना त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिका, प्रत्येक नाटक आजही लख्ख आठवतात.
तेव्हा नाटकात काम करण्याचा अनुभव खूप वेगळा होता. तो एक समृद्ध काळ होता. मी मालिका, सिनेमे आणि नाटक या तीनही प्रकारात काम केले. पण मला ‘मी’ नाटकांमध्येच भेटले या मतावर आजही ठाम आहे. माझ्यासाठी स्वतःला व्यक्त करण्याचं माध्यम होतं ते. नाटक हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय… यावर मी कितीही वेळ बोलू शकते. आताची नाटकं आणि तेव्हाची नाटकं यात खूप फरक झालाय. तेव्हा भरपूर पैसे मिळायचे नाही पण प्रेक्षकांची दादच इतर गोष्टींवर वरचढ ठरायची. आता तसं राहिलं नाही. अनेक कलाकार एकाचवेळी दोन दगडांवर पाय ठेवून जिथे पैसे जास्त मिळतील त्या गोष्टीला प्राधान्य देतात. यात मी त्यांना दोषही देत नाही. आता प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या गोष्टीकडे असा वेड्यासारखा धावत सुटला आहे की त्याला आपण कुठे थांबायचं हेच कळत नाही.

आमच्याकडे सध्याच्या कलाकारांसारखे भरमसाठ पैसे नसतील. जगण्यापुरत्या पैशांची सोय करून ठेवली आहे, तिच पुरेशी आहे. पण रंगभूमीने जे आम्हाला घडवलं त्याची तुलना बाकी कशाशीच होऊ शकत नाही. प्रत्येक प्रयोग संपल्यावर प्रेक्षक जेव्हा भेटायला यायचे तेव्हा दृष्ट काढायचे, भरभरून कौतुक करायचे. आपण त्यांना या तीन तासांत काही तरी दिलं याची जाणीवच सुखावणारी होती. एक, दोन नाही तर माझ्या आयुष्याचं गाठोडचं अशा अनुभवांनी भरलेलं आहे.

‘मी आणि माझ्या भूमिका’ या एकपात्री नाटकाचे अनेक प्रयोग मी केले. यात मी माझे अनुभव, भूमिका, आयुष्यातले खाचखळगे यावर २.३० तास मध्यंतर न घेता बोलायचे. प्रेक्षकही एवढे भारावून जायचे की त्यांनाही बाहेर उठून जाण्याचे भान राहायचे नाही. कोणतीही संहिता नसताना मी ते प्रयोग करायचे. त्या एकपात्री नाटकाने मला भरपूर आनंद दिला. त्या आठवणींमध्येच मी माझं पुढचं संपूर्ण आयुष्य काढू शकते. आताच्या नाटकांमध्ये तसं होत नाही. आता कोणतं नवीन नाटक येणार असेल तर त्याचा गाजावाजाच जास्त होतो. अशा नाटककारांची आणि त्यात काम करणाऱ्या कलाकारांची कीव येते. सध्याची फार कमी नाटकं आहेत जी पाहून मला आनंद झाला आहे. पण ठिक आहे.. काळ बदलतो तशी परिस्थिती बदलते.

शब्दांकन- मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@indianexpress.com