साधारणपणे २००९ पासून गीतलेखन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कवी, गीतकार मंदार चोळकरने आतापर्यंत ‘कळत नकळत’, ‘ती दोघं’ आणि ‘लग्नलॉजी’ या तीन नाटकांसाठी गीतलेखन केलं आहे. सिनेमे, मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमांमध्ये गीतलेखन केलेल्या मंदारला आजही नाटकासाठी गीत लिहिणं जास्त कठीण वाटतं. आपल्या याच अनुभवाबद्दल त्याने लोकसत्ता ऑनलाइनशी गप्पा मारल्या.

जेव्हा मालिकांचे टायटल ट्रॅक लिहायचे असतात तेव्हा प्रेक्षकांची आवड निवड ही माहिती असते. तसेच सिनेमांमध्ये गाणी लिहिताना कथानक नेमके काय आहे आणि ते गाणे त्या कथानकाला पुढे कसे घेऊन जाईल याचा विचार करुन लिहिले जाते. पण नाटकामध्ये मात्र तसे होत नाही. ‘ती दोघं’ नाटकासाठी गाणं लिहिताना मी एक लव्ह साँग लिहिलं होतं. पण काही प्रयोगानंतर त्यात कवितांचीही जोड दिली. प्रेक्षकांना काय आवडेल किंवा नाही याचा अंदाज नाटकांमध्ये येत नाही.

‘प्रयोग’ या शब्दामध्येच सारं काही स्पष्ट होतं. प्रत्येक प्रयोगामध्ये नवीन काही मिळत जातं आणि ते नाटकामध्ये सहभागी केलं जातं. पण एकंदरीतच नाटकांमध्ये गाणी कमीच असतात. पार्श्व संगीतावरच नाटकात अधिक भर दिला जातो. संगीत नाटकं हा पूर्ण वेगळा विषय आहे. साध्या नाटकांमध्ये फारशी गाणी पाहायला मिळत नाहीत. पण आता ही गोष्टही बदलताना दिसतेय. स्ट्रॉबेरी नाटक जेव्हा यायचे होते तेव्हा या नाटकाच्या प्रमोशनसाठी खास गाणं तयार करण्यात आलं होतं. असे वेगवेगळे प्रयोग नाटकांमध्ये होणं गरजेचं आहे. हीच त्या रंगभूमीची खरी ओळख आहे असं मला वाटतं.

नाटकाचा जो लेखक असतो तो सर्वेसर्वा असतो असं मला वाटतं. त्याला कोणत्या दृष्याला संगीत लागेल, नेपथ्य काय असेल, प्रकाश योजना काय असतील याचं ज्ञान असतंच. तेच डोळ्यासमोर ठेवून तो नाटक लिहित असतो. त्यामुळे एखाद्या नाटकामध्ये जर गाणे हवे असेल तर ते लेखक स्वतःच लिहितो. नाटकाची स्वतःची अशी भाषा आहे त्यात आपल्या गाण्याची भाषा मिळवणं आणि ते प्रेक्षकांसमोर सादर करणं हे खरंच कठीण काम आहे. नाटकात एकाद्या प्रसंगानंतर गाणं येणं हे फार कमी होतं. कोडमंत्रमध्ये तसं आहे. एका घटनेनंतर तिथे गाणं येतं ते फार खिळवून ठेवतं. अशा पद्धतीची नाटकं येणं फार आवश्यक आहे.

मी ‘ती दोघं’ नाटकासाठी एक ठुमरी लिहिली होती. संगीतकार मकरंद भागवत यांनी केलेल्या चालीवर मी ती ठुमरी लिहिली होती. नाटकात टेपरेकॉड सुरू होतो आणि ती ठुमरी ऐकू येते असे दृश्य होते. मकरंदने मला एकदा फोन केला आणि एका प्रेक्षकांनी त्या ठुमरीचे भरभरून कौतुक केले होते असे सांगितले. २०१५-१६ मध्ये लिहिलेलं गाणं ऐकताना ३० ते ४० वर्ष मागे घेऊन जातं ही प्रतिक्रियाच माझ्यासाठी खूप मोठी होती.

शब्दांकन- मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@indianexpress.com

Jagga Jasoos song Phir Wahi: बाप- लेकाची हृदयस्पर्शी कहाणी