रसिका शिंदे
कोणत्याही क्षेत्रात गॉडफादर किंवा मार्गदर्शक असणं फार महत्त्वाचं असतं असं म्हटलं जातं. मात्र मार्गदर्शक असण्याची संकल्पनाच न आवडणाऱ्या अभिनेत्री राधिका आपटेने हिंदी आणि मराठी चित्रपटांबरोबरच हॉलीवूडमध्येही डंका गाजवला आहे. चौकटीत न राहता विविध भूमिकांना रुपेरी पडद्यावर न्याय देत त्या भूमिका तितक्याच ताकदीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अनेक अभिनेत्रींपैकी एक म्हणजे राधिका आपटे. मराठी मुलगी म्हटलं की तिला चित्रपटांत चौकटीतल्याच भूमिका दिल्या जातात, त्या क्षेत्रात विविधांगी भूमिका राधिकाने वठवल्या आणि आपली दखल घ्यायला भाग पाडलं. अमुक एका धाटणीचेच चित्रपट साकारण्यापेक्षा अभिनयकौशल्य आणखी खुलवण्याचाच अट्टहास आपल्या प्रत्येक चित्रपटातून राधिकाने केलेला दिसतो. बिनधास्त भूमिका करणाऱ्या आणि आपले वेगळेपण कायम जपणाऱ्या राधिकाचा नेटफ्लिक्सवर ‘मोनिका ओ माय डार्लिग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिने एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.
राधिका आपटेने तिच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात मराठी चित्रपटांपासून केली होती. त्याआधी आपले शिक्षण पूर्ण करत ती चित्रपटसृष्टीत सक्रिय झाली होतीच. मात्र मुख्य भूमिकेत तिचं पदार्पण २००९ मध्ये ‘घो मला असला हवा’ या चित्रपटातून झालं. या सिनेमात तिने खेडय़ातल्या एका सामान्य स्त्रीचं पात्र साकारलं होतं. त्यानंतर मग एकामागोमाग एक मराठी चित्रपटांतून तिचा अभिनयाचा आलेख वर चढतच गेला. ‘तुकाराम’, ‘पोस्टकार्ड’, ‘लय भारी’, ‘समांतर’ अशा काही मराठी चित्रपटांमध्ये तिने काम केलं. अभिनेता रितेश देशमुख सोबत ‘लय भारी’ चित्रपट केल्यानंतर राधिका मराठी चित्रपटातून गायब झाल्याची चर्चा सुरू झाली. तिला मात्र हा मुद्दा पटत नाही.
मी मराठी चित्रपटांकडे अजिबात पाठ फिरवली नाही आहे. उलट खरं सांगायचं तर मला गेल्या तीन वर्षांत एकाही मराठी चित्रपटासाठी विचारणा झाली नाही. त्याआधी काही प्रोजेक्टसाठी विचारण्यात आलं होतं, पण कथा न आवडल्यामुळे मी नकार दिला होता. मात्र कथा आवडली पण केवळ तो मराठी चित्रपट आहे म्हणून मी नकार दिला असं कधीच झालेलं नाही. कोणतीही भूमिका निवडताना माझ्यासाठी भाषेचा किंवा माझी भूमिका किती लहान मोठी आहे हा मुद्दा कधीच महत्त्वाचा नसतो, असं ती म्हणते.
लहानपणापासून आपल्याला कोणत्या शाळेत जायचं आहे, कोणत्या महाविद्यालयात शिक्षण घ्यायचं आहे, कशात आपलं करिअर घडवायचं आहे? यासाठी एक अथवा अनेक मार्गदर्शक असतात. राधिकाला मात्र मार्गदर्शक ही संकल्पनाच पटत नाही, असं तिने सांगितलं. मी ज्या कलाकार, दिग्दर्शक, लेखकांबरोबर काम करते ते सगळे जण माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांच्याकडून मी सल्ले नक्कीच घेते, पण मार्गदर्शक असं मला कोणी नाही असं ती स्पष्टपणे सांगते.
डिजिटल माध्यम हे फारच महत्त्वाचं आणि गरजेचं झालं आहे. आणि या डिजिटल माध्यमाचा खऱ्या अर्थाने पाया रचला तो म्हणजे नेटफ्लिक्सने. नवनवीन तंत्रज्ञान विकसित झालं आणि प्रेक्षकांना जगात कुठेही बसून आपल्या आवडीचा आशय बघण्यासाठी एक मोठं माध्यम उपलब्ध झालं. चित्रपटसृष्टीत कोणाच्याही पाठिंब्याशिवाय केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक कलाकार आपलं स्वतंत्रपणे स्थान निर्माण करू शकले. मात्र इतकं सगळं घडत असताना अजूनही सिनेजगतात लेखकांना हवा तसा आदर मिळत नसल्याची खंतही राधिकाने व्यक्त केली.
इंग्रजी भाषेचा डोंगरही सर केला विद्येचं आणि कलेचं माहेरघर असणाऱ्या पुण्याची राधिका आपटे. तिचं शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झालं. वडील जरी पेशाने डॉक्टर असले तरी मातृभाषेत शिक्षण घ्यायचं, असा त्यांचा अट्टहास होता. शाळेतील शिक्षण पूर्णत: मराठी माध्यमातून झाल्यानंतर अचानक महाविद्यालयात अफाट इंग्रजी भाषेचा डोंगरही राधिकाने सर केला. लंडनला पटकथा लेखनाचा शिक्षणक्रम पूर्ण करण्यासाठी गेल्यामुळे इंग्रजी भाषेत अधिक सुधारणा झाल्याचंही तिने सांगितलं. हल्ली कलाकाराने केवळ अभिनयच करावा, लिखाण किंवा दिग्दर्शन करू नये, असं काही चौकटी- समज उरलेले नाहीत. कलाकार अभिनय करत असताना आपलं लिखाण कौशल्य, संगीतातील कौशल्य दाखवत असतोच. तशीच आवड राधिकालाही आहे. सध्या राधिका लंडनमध्ये राहात असून ती पटकथा लेखनाचा शिक्षणक्रम पूर्ण करते आहे. तिला भविष्यात दिग्दर्शनही करायचं आहे. त्यामुळे लवकरच राधिका आपटे दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्याच्या रूपातही आपल्याला दिसेल यात शंका नाही.
‘फोबिया’, ‘मांझी’, ‘बदलापूर’, ‘बाजार’, ‘अंधाधुंद’ अशा अनेक चित्रपटांत वेगवेगळय़ा भूमिका साकारणाऱ्या राधिकाने लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रातच पुढे जायचं असं ठरवलं होतं. राधिकाला बऱ्याच जणांना न आवडणारा विषय आवडतो, तो म्हणजे गणित. गणितात तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं असून जर ती अभिनेत्री नसती तर गणिताच्या क्षेत्रात पुढे करिअर करायला आवडलं असतं, असं तिने सांगितलं. अभिनय क्षेत्रातील वाटचाल सुरू झाल्यानंतर जराही उसंत न घेतलेल्या राधिकाला करोनाकाळातील टाळेबंदी काहीशी आवडल्याचं ती कबूल करते. करोनाकाळात सर्व मंडळी शेफ झाली होती, मात्र राधिकाला खरोखरच स्वयंपाकाची आवड असून विशेषत: पेस्ट्री बेकिंगचं शिक्षण तिला घ्यायचं आहे, असंही तिने सांगितलं. मराठमोळय़ा राधिका आपटेने भाषेचा, दिसण्याचा कोणताही न्यूनगंड न ठेवता समोर आलेली प्रत्येक भूमिका समरसून केली आहे. त्यामुळेच की काय हिंदीत इतक्या अभिनेत्रींची भाऊगर्दी असताना राधिका आपटे आपल्या चोखंदळ भूमिकांमुळे उठून दिसते.