कालाकुरिचीमधील नऊ विभागांमध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. यामध्ये उलुंथुरपेट्टई, तिरुनावलूर, तिरुकोविलूर रिशिवंदियम, शंकरपुरम, कालाकुरिची, तियागदुरम, चिन्नासालम आणि काल्वरायनमधील डोंगराळ भागाचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दूर जंगलात लपून राहिलेल्या अनेक तामिळनाडूमधील उपेक्षित वर्गातील लोकांनी आत्तापर्यंत ‘आम्हाला याची गरज नाही’ असं म्हणत बऱ्याच काळापासून कोविड लसीचे डोसच घेतलेले नाहीत.

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा २०२२ या वर्षात जरी कोविड-१९च्या रुग्णांची संख्या कमी झालेली असली, तरी या लोकांमध्ये लस घेण्यास टाळाटाळ करण्याची वृत्ती मोठ्या प्रमाणावर दिसून येते. यासाठी मृत्यूची भीती, आजारपण, अपुरी माहिती आणि लस घेण्यासंदर्भात चुकीची माहिती ही काही प्रमुख कारणं आहेत.

देशातील १८ राज्यांमध्ये पसरलेल्या उपेक्षित वर्गातील लोकांमध्ये लसीकरणाविषयी जनजागृती करण्यात आणि अंतिमत: त्यांचं लसीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आले. यामध्ये USAUD च्या पाठिंब्याने आणि जॉन स्नो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अर्थात JSI च्या पुढाकाराने राबवलेल्या मोमेंटम रुटिन इम्युनायझेशन ट्रान्सफॉर्मेशन अँड इक्विटी (M-RITE) मोहिमेचा मोठा हातभार लागला.

यासाठी आशा वर्कर्स मोठ्या प्रमाणावर काम करतच होत्या. मात्र, तरीही सरकारला या समाजघटकांमधील लसीकरणाविषयीची भीती कमी करण्यासाठी मदतीची गरज होती. याचसाठी ‘मोमेंटम’ प्रकल्पानं मोलाची भूमिका बजावली.

उत्सवांच्या माध्यमातून प्रयत्न

या प्रकल्पासाठी काम करणारे कम्युनिटी हेल्थ वर्कर पी कबिलन यांनी सांगितलं, की त्यांचा मुख्य उद्देश हा लसीकरणाविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि कोणतीही भीती न ठेवता लोकांना लसीकरणासाठी तयार करणे हा आहे. कबिलन म्हणतात, खरंतर सरकार मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवत आहेच. पण आमचं मुख्य काम हे अशा लोकांना शोधून काढणं आणि त्यांना लसीकरणासाठी तयार करणं आहे ज्यांनी कोविड लसीचा पहिला किंवा दुसरा डोस अद्याप घेतलला नाही.

“आम्ही कालाकुरिचीमध्ये फेब्रुवारी महिन्यात याची अंमलबजावणी सुरू केली. एप्रिल महिन्यात सादरा होणारा कूथांदवर मंदिर महोत्सवाच्या निमित्ताने इथल्या तृतीयपंथीयांमध्ये लसीकरणाविषयी जनजागृती करण्याची उत्तम संधी आहे हे आमच्या लक्षात आलं. तृतीयपंथीयांशी ज्यांचे चांगले संबंध होते, त्यांना आम्ही लसीकरणाच्या फायद्यांविषयी त्यांच्याशी बोलायला लावलं”, असं कबिलन म्हणाले.

कूवगम महोत्सव हा कालाकुरिचीची ओळख ठरला आहे. हा महोत्सव तृतीयपंथीय मोठ्या प्रमाणावर साजरा करतात. दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात कूथांदवर गावातील मंदिरात तो साजरा केला जातो.

या प्रकल्पावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मते इथले तृतीयपंथी लस घेण्यास टाळाटाळ करण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे या महोत्सवादरम्यान ते मद्यप्राशन करतात. शिवाय हार्मोनल मेडिसिनही घेत असतात. त्यांना भीती होती की लस घेतल्यामुळे त्यांना या गोष्टींचं सेवन करता येणार नाही.

“यासाठी आम्ही एलईडी स्क्रीन्सवर जनजागृती करणारे संदेश लावले. शिवाय यासंदर्भात माहिती देणारी ४ हजार पत्रके देखील त्यांच्यामध्ये वाटली. यासोबतच, आम्ही त्यांना हेही सांगितलं की जरी ते हार्मोनल मेडिसिन घेत असले, तरी ते लसीचा डोस घेऊ शकतात”, असंही कबिलन यांनी सांगितलं.

कूवगम गावाच्या सरपंच नागालक्ष्मी मुरुगन म्हणाल्या, की प्रकल्प अधिकाऱ्यांनी या महोत्सवाच्या १५ दिवस आधी त्यांच्याशी संपर्क साधला. ही लसीकरण मोहीम कशी राबवली जाणार याचीही माहिती त्यांना दिली. मुरुगन यांनी सांगितल्यानुसार, या सुप्रसिद्ध महोत्सवासाठी देशभरातून आणि काही विदेशातूनही जवळपास ५० हजार तृतीयपंथी कूवगममध्ये दाखल झाले होते.

“त्यांनी आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आमच्या मनात दुसरा कोणताही विचार आला नाही. पंचायत आणि प्रकल्पाशी संबंधित टीमने या सर्व तृतीयपंथींना करोनाची लस घेण्यासाठी राजी करण्याचा निर्धार केला. आम्ही त्यासाठी महोत्सवादरम्यान स्वतंत्र जागेची व्यवस्था केली. १८ दिवस चाललेल्या या महोत्सवाच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये आम्ही १५ तृतीयपंथींना करोनाची लस दिली”, असं मुरगन म्हणाल्या.

तृतीयपंथींकडून साजरा केल्या जाणाऱ्या या महोत्सवादरम्यान प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्यांना मोठ्या प्रमाणावर एकत्र केलं. पत्रकांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये जनजागृती केली. शिवाय त्यांच्यातल्याच काही प्रसिद्ध नेतेमंडळींच्या माध्यमातूनही या समाजामध्ये लसीकरणाच्या फायद्यांविषयी जनजागृती घडवून आणली.

महोत्सवाच्या ठिकाणी करोनाविषयी जनजागृती करणारे संदेश झळकवण्यासाठी एक मोठा एलईडी स्क्रीन लावण्यात आला होता. कूवगममधील महोत्सवाच्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना करोनाची लस देण्यासाठी पोलीस, डॉक्टर्स यांच्यासोबतच गावातील आरोग्य कर्मचारीही तत्पर होते.

गेल्या तीन दशकांपासून दरवर्षी कूवगम महोत्सवात येणाऱ्या ४० वर्षीय अंबिका यांनी सांगितलं की त्यांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. करोनाची लागण आपल्याला होऊ नये, म्हणून लसीकरण करून घ्यायचं होतं असं त्या म्हणाल्या. त्यांनी त्यांच्या समाजातील लोकांनाही लसीकरणाच्या फायद्यांविषयी माहिती दिली. तसेच, त्यातल्या दोघांना लसीचे डोस घ्यायला देखील लावले. “लोकांना घाबरण्याची गरज नाही. लसीकरण आरोग्यासाठी चांगलं आहे. लस घेतल्याने आपलं करोनापासून संरक्षण होईल”, असं त्या म्हणाल्या.

मोमेंटम प्रकल्पाचे जिल्हा स्तरावरील अधिकारी कबिलन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी या काळात जून महिन्यापर्यंत जवळपास १६ हजार ५०० लोकांना लस दिली. यामध्ये जिप्सी, ट्रान्सजेंडर, नोमडिक ट्राईब्ज, दिव्यांग व्यक्ती अशा लोकांचा समावेश होता. “एकट्या ऑगस्ट महिन्यात आम्ही तब्बल ९ हजार ५२ लोकांना करोनाची लस दिली. आत्तापर्यंत इथे २५ हजार ५८२ लोकांना करोनाची लस देण्यात आली आहे”, असं ते म्हणाले. शिवाय या प्रकल्पाच्या माध्यमातून हे लोक बूस्टर डोस घेतील याचीही खात्री केली जात आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

कालाकुरिचीमधील नऊ विभागांमध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. यामध्ये उलुंथुरपेट्टई, तिरुनावलूर, तिरुकोविलूर रिशिवंदियम, शंकरपुरम, कालाकुरिची, तियागदुरम, चिन्नासालम आणि काल्वरायनमधील डोंगराळ भागाचा समावेश आहे.

प्रभावशाली व्यक्तींवर लक्ष केंद्रीत!

शंकरपुरम ब्लॉकमधल्या समथुवापुरम भागातील नरीकुरावर कॉलनीमध्ये जवळपास ७० जिप्सी कुटुंब राहतात. ते उदरनिर्वाहासाठी रंगीबेरंगी नेकसेल आणि कानातील रिंगा विकतात. त्यांच्यातले काही पदवीधरही झाले आहेत. काहींनी तर टॅटू काढण्याचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.

या जिप्सी लोकांचं लसीकरण करण्याचं मोठं आव्हानच प्रकल्प अधिकाऱ्यांसमोर होतं. कारण प्रकल्प अधिकाऱ्यांना पाहताच ही मंडळी त्यांच्या वसाहतीमध्ये लपून बसत असतं.

या प्रकल्पातील एक महिला अधिकारी सरस्वती म्हणाल्या, की त्यांनी या जिप्सी लोकांवरच आधी लक्ष केंद्रीत केलं. त्यांच्या नरीकुरवा समाजामध्ये लसीकरणाला सुरुवात केली. “जेव्हा मी सुरुवातीला इथे आले, तेव्हा मला धक्काच बसला. लोक म्हणत होते की ते मांसाहार करतात, त्यामुळे कोणत्याही रोगाशी लढण्यासाठी त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती आहे. काहींनी तर लस घेतल्याचा दावाही केला. त्यानंतर मी पुन्हा तिथे गेले. त्यातल्या काहींशी बोलून त्यांना लसीकरणाच्या फायद्यांविषयी माहिती देऊन लसीकरणासाठी राजी करण्यात मला यश आलं”, असं त्या म्हणाल्या.

“मी त्यांच्या प्रमुखाला भेटले आणि त्यानंतर आम्ही पहिल्याच दिवशी १५ लोकांचं लसीकरण केलं. त्यानंतर मी पुन्हा दुसरा डोस देण्यासाठी तिथे जायला लागले. जेव्हा केव्हा मी आसपासच्या भागात काही कामानिमित्त यायचे, तेव्हा मी ठरवून या वसाहतीला भेट द्यायचे. इथल्या लोकांची, त्यांच्या लसीकरणाबाबत विचारपूस करायचे”, असंही सरस्वती म्हणाल्या.

यासंदर्भात बोलताना या वसाहतीच लहानाच्या मोठ्या झालेल्या ४८ वर्षीय राधा सांगतात, सुरुवातीला त्यांनीही लस घ्यायला टाळाटाळ केली. पण त्यानंतर त्यांच्या प्रमुखाच्या आदेशांनुसार त्यांनी करोनाची लस घेतली. त्या म्हणाल्या की आता त्यांना करोनाची भीती वाटत नाही. “करोना लसीचा पहिला डोस घेताना माझ्या मनात धाकधूक होत होती. पण दुसऱ्या डोसवेळी माझ्या मनात कोणतीही भीतीची भावना नव्हती”, असं राधा यांनी सांगितलं.

“टीव्हीवर ते दाखवत होते की करोनाची लस घेतल्यानंतर अनेकांचा मृत्यू झाला. आम्ही तर असंही ऐकलं की डॉक्टर विवेकसुद्धा करोनाची लस घेतल्यानंतर दगावले. त्यामुळे आम्हाला वाटलं की पैसे असलेल्या श्रीमंत लोकांचीही जर ही अवस्था होत असेल तर आमची काय अवस्था होईल? पण प्रकल्पाचे स्वयंसेवक आणि आमच्या प्रमुखांशी बोलल्यानंतर आणि त्यांनी करोना लसीकरणाविषयी आमच्या मनातील गैरसमज काढून टाकल्यानंतर मी लसीचा डोस घ्यायचा निर्णय घेतला”, असंही राधा यांनी नमूद केलं.

या समाजात लसीचा डोस घेणाऱ्या पहिल्या व्यक्ती म्हणजेच लता यांनीही अशाच प्रकारच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ५८ वर्षीय लता सांगतात की लस घेतल्यानंतर ताप किंवा अंगदुखी होण्याची शक्यता इतरांनी वर्तवली होती. पण त्यांना असं काहीही झालं नाही. “आम्ही खूप फिरतो. त्यामुळे आम्ही लसीकरण करून घ्यायलाच हवं. आम्हा सर्वांचं पूर्ण लसीकरण झालं आहे”,असं लता म्हणाल्या.

जनजागृतीसाठी नाटिकांची मोठी मदत

या प्रकल्पाचे अजून एक अधिकारी इथूमलायी यांनी कलावरयन या डोंगराळ भागातील रहिवाशांना भेट दिली. या भागात एकूण १७१ गावांमध्ये तब्बल ८० हजार आदिवासी नागरिक राहतात. “आदिवासी लोकांना एखादी गोष्ट करण्यासाठी तयार करणं फार कठीण काम असतं. सुरुवातीला तर तुम्ही पुरावा दाखवूनही ते तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. त्यांनी मला सांगितलं की ते डोंगराळ भागात निसर्गाच्या सान्निध्यात राहतात. त्यामुळे त्यांना करोनाची लागणच होणार नाही. त्यांनी तर आम्हाला यासंदर्भातली माहिती देण्यासाठी गावातल्या रस्त्यांवरही उतरू दिलं नाही. आम्ही पुढे जाताच ते जंगलात पळून गेले”, असं इथूमलायी म्हणाले.

विशेष म्हणजे, ६० वर्षांवरच्या काही वृद्धांनी तर त्यांना असंही सांगितलं की ते अजून काही वर्षच जिवंत राहणार आहेत. त्यामुळे लस घेण्याची फारशी गरज नाही. “आम्ही या गावांना सातत्याने भेटी देत राहिलो आणि त्यांच्यावर प्रबाव पाडणाऱ्या सर्वात प्रमुख व्यक्तीलाच राजी करण्यात यश मिळवलं. एकदा त्यानं लस घेतल्यानंतर त्यानं इतरांनाही लस घेण्यासाठी तयार केलं. त्यानंतर आम्हाला या गावकऱ्यांना लसीचे डोस देता आले”,असं इथूमलायी यांनी सांगितलं.

“आम्ही त्यांना प्रत्यक्ष माहिती दिली. शिवाय ज्यांना वाचता येत होतं, त्यांना पत्रकंही दिली. पण जर आपण त्यांना दृश्य स्वरुपात काही दाखवलं, तर त्याकडे त्यांचं लक्ष लवकर आकर्षित होतं. त्यामुळे मग आम्ही काही कलाकारांनाही पाचारण करून लसीकरणासंदर्भात नाटिकेच्या माध्यमातून जनजागृती केली”, असंही ते म्हणाले.

इथूमलायी यांनी असंही नमूद केलं, की या गावकऱ्यांना कामाच्या निमित्ताने दर आठ ते दहा महिने इतर राज्यांमध्ये प्रवास करावा लागतो. त्यावेळी त्यांच्याकडे करोना लसीकरणाच्या प्रमाणपत्राची मागणी करण्यात येते. त्यामुळेही त्यांना लसीकरण करून घ्यायला हवं याची जाणीव झाली.

यासंदर्भात मेल्वझापदी भागातील प्रभावी व्यक्ती असलेल्या ४७ वर्षीय वेल्ली कन्नन यांनी एक आठवण सांगितली. ते जेव्हा उत्तर प्रदेशात वाराणसीला गेले, तेव्हा तिथे अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे लसीकरणाचं प्रमाणपत्र मागितलं. मोमेंटम प्रकल्पाच्या मदतीने त्यांचं लसीकरण पूर्ण झालं असल्यामुळेच त्यांना तिथे फिरताना कुठेही आडकाठी करण्यात आली नाही. कन्नन यांनी त्यांच्या इतर गावकऱ्यांनाही ही गोष्ट सांगितली की जर त्यांचं लसीकरण पूर्ण झालं असेल, तरच त्यांना इतर राज्यांमध्ये रोजगार मिळू शकेल. यामुळेही तिथल्या अनेक लोकांनी करोना लसीचे डोस घेतले.

“इथल्या अनेकांना असं वाटतं की जर त्यांनी करोनाची लस घेतली, तर त्यांना अंगदुखी होईल किंवा ताप येईल. मी त्याना संगितलं की तसं झालं तरी ते दोन किंवा तीन दिवसांत बरं होईल. लस देणारे लोक त्यासाठी गोळ्याही देतील. या भागात जवळपास ५०० लोक आहेत आणि बहुतेक सगळ्यांनी करोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे”, असं कन्नन यांनी नमूद केलं.

मेल्वझापदीमध्येच पाहणाऱ्या किर्ती अम्मल यांनी सांगितलं की त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे आधी लस घ्यायला त्या टाळाटाळ करत होत्या. पण प्रकल्पाच्या स्वयंसेवकांनी त्यांना यासंदर्भात योग्य ती माहिती दिल्यानंतर त्यांनी लस घेतली. त्यांनी आधीच लसीचे दोन्ही डोस घेतले होते आणि आमच्या भेटीदरम्यान त्यांनी बूस्टर डोसही घेतला. “जर मी लस घ्यायला घाबरले आणि कुठल्यातरी शेतामध्ये मरण पावले तर काय? मला हे होऊ द्यायचं नाहीये. माझा जीव वाचवण्यासाठी मी लसीकरण करून घेतलं आहे”, असं अम्मल ठामपणे म्हणाल्या.

मराठीतील सर्व मीडिया पार्टनरशिप बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Defying the odds reaching the unreached m rite project covid shot to marginalized people
First published on: 30-09-2022 at 18:52 IST