भारतीय इंग्रजीतल्या नाटकांची सगळ्यात महत्त्वाची अडचण इंग्रजी भाषाच असते. म्हणूनच अशी अडचणच होऊन बसलेल्या इंग्रजीमध्ये कथा, कादंबऱ्या, कविता लिहिणाऱ्या भारतीय लेखकांची संख्या मोठी असली तरी नाटकं लिहिणाऱ्यांची नावे मात्र फारशी दिसत नाहीत. अशा परिस्थितीत पॉली सेनगुप्ता यांच्या या नाटय़संग्रहाकडे विशेष स्वागतशील दृष्टीनं पाहायला हवं. समकालीन भारतीय जनमानसातील ताणेबाणे, समरप्रसंग आणि घालमेल या संग्रहातल्या नाटकांतून चांगल्याप्रकारे मांडली गेली आहे. किंबहुना त्याचा कानोसा या नाटकांतून जाणून घेता येतो.
इंग्रजीतून नाटकं लिहिणाऱ्या भारतीयांमध्ये महेश दत्तानी, गिरीश कार्नाड अशी तीच तीच आणि तुरळक नावं सतत असताना पॉली सेनगुप्ता यांच्या ‘विमेन सेंटर स्टेज’ या नाटय़संग्रहाकडे आपण आवर्जून लक्ष दिलं पाहिजे, असं वाटतं. या संग्रहात सेनगुप्तांची सहा नाटकं- ‘मंगलम्’, ‘इनर लॉज’, ‘किट्स वॉज अ टय़ुबर’, ‘अलिफा’, ‘दस स्पेक शूर्पणखा, सो सेड शकुनी’ आणि ‘समराज् साँग’ – एकत्रित प्रकाशित केलेली आहेत. संग्रहाला आघाडीच्या कादंबरीकार शशी देशपांडे यांची स्वागतशील प्रस्तावना आहे.
वसाहतवाद, उत्तर-वसाहतवाद वगैरे प्रवाहांमुळे भारतीयांच्या इंग्रजी लेखनाला जो प्रतिसाद आजपर्यंत मिळाला आहे, तो अतिशय स्वाभाविक आणि योग्य आहे. इंग्रजी भाषेत लिहिणाऱ्या भारतीय लेखकांचे दृष्टिकोनही परदेशी पर्यटकासारखे आणि आपल्याला अस्वागतार्ह वाटतील असेच असल्याचे दिसते. मात्र क्षीण नि स्वाभाविकच दुर्लक्ष होईल अशा परिस्थितीत कथा, कादंबरी, कविता, चरित्रलेखन आणि मुलांसाठीच्या साहित्यात भारतीय इंग्रजीनं काही न काही योगदान दिलेलं आहे, पण नाटकाच्या बाबतीत परिस्थिती बरीचशी वेगळी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात इंग्रजी भाषेत फारशी नाटकं लिहिली जात नव्हती आणि सादरही केली जात नव्हती. एका मोठय़ा कालखंडानंतर भारतातल्या असिफ करीमभॉय, जिव्ह पटेल, निस्सीम इझिकेल, गुरुचरण दास, दीना मेहता या लेखकांनी नाटकं लिहिली, पण ती प्रामुख्यानं संहिता म्हणूनच राहिली. त्या नाटकांचे फारच तुरळक प्रयोग झाले. १९६०-७० नंतर मात्र मराठी, बंगाली आणि हिंदी भाषांमधून नाटक आणि नाटय़चळवळींनी लक्षणीय जोर धरला. इंग्रजीच्या संदर्भात मात्र तसे झाले नाही, कारण नाटक ही गोष्ट संहितेपलीकडे जाऊन समूहावरच – नट, दिग्दर्शक, संगीतकार, प्रेक्षक – अवलंबून असते.
असा स्वत:साठीचा समूह भारतातल्या इंग्रजी नाटकाला पूर्णत्वानं कधीच लाभला नाही. शिवाय सगळ्यात महत्त्वाची अडचण इंग्रजी भाषा हीच होती. अशी अडचणच होऊन बसलेल्या इंग्रजी भाषेविषयी म्हणजे तिच्या भारतातल्या वापराविषयीचं सेनगुप्तांचं पहिलं नाटक ‘मंगलम्’ आहे. हे आहे खरं तर दोन अंकी नाटक, पण पहिल्या अंकातल्या ‘प्ले विदिन अ प्ले’च्या प्रयोगामुळे त्याच्या संरचनेत एक प्रकारचे नावीन्य निश्चितपणे आलेले आहे. हे नाटक भाषेच्या प्रश्नाविषयीच आहे आणि आपल्यासारख्या बहुभाषिक, बहुसांस्कृतिक देशातल्या लोकांनी आवर्जून वाचावं (आणि पाहावंदेखील) असं आहे. भाषेच्या प्रश्नापलीकडे जाऊन हे नाटक एका कुटुंबातल्या राजकारणाविषयी, विशेषत: एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून सभोवताली पाहण्याचा प्रयत्न करतं. स्त्रीच्या असहाय्यतेचा प्रश्न अतिशय प्रभावीपणे मांडत भाषिक अंगानं हे नाटक एका तामिळ कुटुंबात शिरकाव करू पाहणाऱ्या इंग्रजी भाषेच्या मजेदार वापराबद्दल भाष्य करतं. १९९४ मध्ये या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता.
‘इनर लॉज’ हे दुसरं नाटक सासू-सुनेच्या पारंपरिक हेव्यादाव्यांवर आहे, पण हे हेवेदावे तीव्र न होऊ देता आणि विवाहाव्यतिरिक्त आपल्या अन्य सामाजिक संस्थांवरही ताशेरे ओढत हे नाटक स्त्रीमध्ये असलेली तीव्र आणि अप्रतिम विनोदबुद्धी अत्यंत कौशल्यानं उभं करतं. म्हणूनच ‘इनर लॉज’सुद्धा संहिता आणि प्रयोग या दोन्ही दृष्टींनी ‘मंगलम्’सारखंच उल्लेखनीय म्हणावं लागतं. या नाटकाच्या आशावादी शेवटामुळे सेनगुप्तांचं सुखात्मिकतेचं कसब लक्षात येतं.
‘किट्स वॉज अ टय़ुबर’ हे पुन्हा इंग्रजी भाषेबद्दलच आहे. एका छोटय़ा गावातल्या महाविद्यालयामधल्या स्टाफरूममध्ये हे नाटक घडतं. इंग्रजी भाषा, साहित्य शिकणं, आपली ती मातृभाषा नसताना इंग्रजीत का लिहिलं जातं आणि इंग्रजी काय किंवा कुठलीहीभाषा काय, ही कशी वरदानच असते, या मुद्दय़ांचा ऊहापोह या नाटकात केलेला आहे. मधनंमधनं विनोदाच्या अंगानं जात शेवटी हे नाटक गंभीर आणि अप्रतिम विधान करतं, ते असं – ‘लँग्वेज इज अ ट्रॅव्हलिंग. इट कॅन नेव्हर अराइव्ह’. या नाटकातून एका परीनं सेनगुप्तांनी स्वत: आणि इंग्रजी भाषा यांमधला संबंधच पडताळून आणि पारखून पाहिलेला आहे.
‘अलिफा’ हे चौथं नाटक विशेषत्वानं स्त्रीवादी आणि प्रयोगशील म्हणावं असं आहे. यात अक्षरं, ध्वनी आणि मानवी भावना यांचा परस्परसंबंध ज्या पद्धतीनं चित्रित झालेला आहे, तो केवळ अप्रतिम आहे. या नाटकाची संरचनादेखील अगदी लालित्यपूर्णतेनं घडवलेली आहे. दोनच पात्रं या नाटकात असली तरी वाचणारा/ पाहणारा त्यातलं तिसरं पात्र नकळत होऊन जातो. दोनपेक्षा अधिक कथानकांची सरमिसळ असूनही प्रत्येक घटक-कथानक आपलं स्वातंत्र्य टिकवून ठेवतं. ही आणखी एक महत्त्वाची बाजू.
‘दस स्पेक शूर्पणखा, सो सेड शकुनी’ हे या संग्रहातलं सगळ्यात गमतीशीर आणि उद्बोधक नाटक आहे. हे नाटक घडतं एका विमानतळावर आणि निमित्त आहे ठरलेल्या विमानाला उशीर होण्याचं. त्यातल्या रंगसूचनांच्या संदर्भातही हे नाटक आव्हानात्मक आणि लक्षणीय म्हणावं लागेल. तात्त्विक पातळीवर सूडभावनेची व्यर्थता हे नाटक सांगतं.
‘समराज् साँग’ हे संग्रहातल्या इतर नाटकांपेक्षा अगदीच वेगळ्या प्रकारचं नाटक आहे. या नाटकाला राजकीय नाटक असं आपल्याला म्हणता येईल. सत्ता, सत्तेसाठी लोकांना वापरून घेणं आणि असं वापरून घेण्यासाठी आवश्यक ती भाषा असा या नाटकाचा विषय आहे. समरा नावाची २० वर्षांची मुकी मुलगी या नाटकाची नायिका आहे. भारतीय नाटकातला सूत्रधार आणि ग्रीक नाटकातला कोरस या दोन्हींचाही सूत्रबद्ध वापर या नाटकात दिसून येतो.
हल्ली इंग्रजी नाटकं असण्यापेक्षा नसल्याचेच दिवस आहेत. पण जेव्हा अबाध स्वातंत्र्य, भाषेची उत्कृष्ट जाण, निदरेष समूहकृती, अंगभूत बुद्धिमत्ता आणि जिज्ञासा असं एकत्र असतं तेव्हा कुठल्या भाषेत कृती घडतेय याला फारसं महत्त्व राहत नाही. म्हणून सेनगुप्तांच्या या नाटय़संग्रहाचं वाचकांनी आणि निर्माते-दिग्दर्शकांनी स्वागत करायला हवं. कारण अशी नाटकं फक्त अमुक एका भाषेतल्या म्हणूनच नाही, तर देशातल्या एकंदर नाटय़परंपरेत मजेची भर घालणारी असतात. भाषेच्या आणि प्रयोगाच्या अशा दोन्ही अंगांनी.
विमेन सेंटर स्टेज – द ड्रॅमॅटिस्ट अँड द प्ले :
पॉली सेनगुप्ता,
प्रकाशक : रुटलेज,
पाने : ३४७, किंमत : ४५० रुपये.
संग्रहित लेख, दिनांक 9th Feb 2013 रोजी प्रकाशित
बुकमार्क : अस्सल भारतीय नाटकं इंग्रजीतली!
भारतीय इंग्रजीतल्या नाटकांची सगळ्यात महत्त्वाची अडचण इंग्रजी भाषाच असते. म्हणूनच अशी अडचणच होऊन बसलेल्या इंग्रजीमध्ये कथा, कादंबऱ्या, कविता लिहिणाऱ्या भारतीय लेखकांची संख्या मोठी असली तरी नाटकं लिहिणाऱ्यांची नावे मात्र फारशी दिसत नाहीत.
First published on: 09-02-2013 at 12:40 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Original indian drama in english