iPhone 17 Price in India: आयफोनची मुळ कंपनी ॲपलकडून यंदाही ९ सप्टेंबर रोजी नव्या उत्पादनांची घोषणा करण्यात येणार आहे. यावर्षी आयफोन १७, आयफोन १७ प्रो, आयफोन १७ प्रो मॅक्स आणि आयफोन १७ एअर लाँच करण्याची घोषणा झालेली आहे. या उपकरणांची किंमत किती असेल, याची चर्चा सध्या सुरू आहे. माहिती बाहेर येणे आणि अफवांमुळे याबद्दल अधिक अंदाज बांधण्याची गरज नाही. भारतात आयफोन उत्पादन करण्यात येत असला तरी त्याची किंमत अधिक असेल, असे सांगितले जात आहे. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या व्यापार युद्धाची त्याला झळ बसू शकते. काहींच्या मते तर आयफोन १६ पेक्षाही आयफोन १७ महाग असू शकतो.
भारत आणि अमेरिकेत काय किंमत असेल?
फायनान्शियल एक्सप्रेसने काही लिक्सवर आधारित आयफोन १७ च्या किंमतीचा अंदाज बांधला आहे. भारतात मागच्या वर्षी ॲपलने ज्या किमती ठरविल्या होत्या, त्याप्रमाणेच यंदाही तेच धोरण असण्याची शक्यता आहे. आयफोन १७ चे १२८ जीबी स्टोरेजसह येणारे बेसिक मॉडेल भारतात ७९,९०० रुपयांपासून सुरू होण्याचा अंदाज आहे. १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट डिस्प्ले, २४ एमपी फ्रंट कॅमेरा, मोठी बॅटरी आणि नवीन ॲपल इंटेलिजेंस फीचर्स असल्यामुळे ग्राहकांना जुने मॉडेल अपग्रेड करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न दिसत आहे.
आयफोन १७ प्रो ची किंमत
आयफोन १७ प्रो ची किंमत यंदा वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेत कदाचित जवळपास १०० डॉलरने किंमत वाढणार असून एकूण किंमत १,०९९ डॉलर होण्याची शक्यता आहे. ॲपलकडून पहिल्यांदाच प्रो व्हेरिएंटची किंमत वाढवली जात आहे.
भारतात या मॉडेलची किंमत अंदाजे १,३०,००० रुपये असू शकते. माध्यमातील बातम्यांनुसार, वाढलेल्या किंमतीचे समर्थन करण्यासाठी ॲपलकडून या बेस मॉडेलला २५६ जीबी स्टोरेजपर्यंत अपग्रेड करू शकते.
आयफोन १७ प्रो मॅक्सची किंमत
टॉप मॉडेल असलेल्या आयफोन १७ प्रो मॅक्सची किंमत राहण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारपेठेत याची किंमत १,४४,९०० रुपयांच्या जवळपास राहण्याची अपेक्षा आहे. अमेरिकन बाजारपेठेसाठी १०० डॉलर्सनी त्याची किंमत वाढू शकते.
आयफोन व्यतिरिक्त ९ सप्टेंबर रोजी ॲपल वॉच सिरीज ११ मॉडेल्स, अपडेटेड एअरपॉड्स प्रो आणि नवीन ॲपल इंटेलिजेंस फीचर्सचे अनावरण केले जाण्याची शक्यता आहे.
टॅरिफचा फटका?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के आयातशुल्कानंतरही अमेरिकेत बेसिक मॉडेलची किंमत ७९९ डॉलर्सच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ॲपलकडून आयफोन १७ चे बहुतेक उत्पादन भारतात घेतले आहे, त्यातील अनेक युनिट्स अमेरिकत निर्यात करण्यात येणार आहेत.