ChatGPT CEO Sam Altman Reacts On iPhone 17 Series: स्मार्टफोन क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲपलने काल म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी त्यांच्या ‘अवे ड्रॉपिंग’ कार्यक्रमात आयफोन १७ सिरीज लाँच केली आहे. कंपनीने ही सिरीज ५ रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केली आहे. यावेळी आयफोन १७ सह ॲपल वॉच अल्ट्रा ३ व सिरीज ११ आणि तिसऱ्या पिढीतील एअरपॉट प्रो ही लाँच करण्यात आले. दरम्यान ॲपलची ही नवी उपकरणे १९ सप्टेंबरपासून अमेरिका, भारत, युनायटेड किंग्डम, जपान, युरोपियन देश आणि यूएईसह ५० हून अधिक देशांमध्ये उपलब्ध होणार आहेत.
दरम्यान ॲपलने लाँच केलेल्या या नव्या उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत असून, कालपासून सोशल मीडियावर फक्त नव्या आयफोनचीच चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देणाऱ्यांमध्ये ओपनएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांचाही समावेश आहे.
सॅम ऑल्टमन यांनी नवीन आयफोनबद्दलचा उत्साह व्यक्त करण्यासाठी एक्सवर एक पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टमध्ये सॅम म्हणाले, “नवा आयफोन खूप छान दिसत आहे. खूप दिवसांपासून मला आयफोनमध्ये हेच बदल हवे होते.”
ऑल्टमन कोणता आयफोन खरेदी करणार
यावेळी सॅम ऑल्टमन यांनी ते आयफोनच्या कोणत्या मॉडेलचा विचार करत आहे हे देखील सूचित केले. ओपनएआयचे कर्मचारी एडविन आर्बस यांनी अल्टमन यांना कमेंटमध्ये विचारले की, तुमच्या पोस्टचा अर्थ तुम्ही आयफोन एअर खरेदी करणार असा आहे का, तेव्हा ऑल्टमन यांनी फक्त “होय” असे उत्तर दिले.
अल्टमन यांच्या पोस्टवर केलेल्या कमेंटमध्ये हायपरबोलिक लॅब्सचे सह-संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी युचेन जिन यांनी असे सुचवले की ॲपलने सिरी ऐवजी चॅट जीपीटीच्या व्हॉइस असिस्टंटचा वापर करावा. ऑल्टमन यांनीही यावर लगेचच सहमती दर्शवत लिहिले: “ही कल्पना खूप चांगली वाटते, माझा याला पाठिंबा आहे.”
एआय क्षेत्रातून आयफोन १७ सिरीजचे कौतुक
अॅपलने लाँच केलेल्या आयफोन १७ सिरीजमध्ये प्रो, प्रो मॅक्स, एअर आणि स्टँडर्ड मॉडेलचा समावेश आहे. याचे गेल्या काही वर्षांमध्ये अॅपलच्या सर्वात मोठ्या अपग्रेडपैकी एक म्हणून वर्णन केले जात आहे. यामध्ये, डिझाइन, हार्डवेअर आणि विविध प्रकारच्या सुधारणांचा समावेश आहे. याचबरोबर एआय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांनी या सिरीजचे कौतुक केले आहे.