WhatsApp new feature for community : मेटाच्या मार्क झुकरबर्गने नुकतीच व्हॉट्सॲपच्या एका नवीन फीचरबद्दलची घोषणा केली आहे. हे फीचर व्हॉट्सॲपवरील कम्युनिटी ग्रुप्ससाठी बनविण्यात आले आहे. या नव्या फीचरद्वारे कम्युनिटी ग्रुप्समध्ये कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी परवानगी मिळणार आहे. तसेच या फीचरच्या मदतीने अॅडमिनने पाठविलेल्या अशा घोषणांना ग्रुपमधील इतर वापरकर्ते उत्तरदेखील देऊ शकतात, अशी माहिती द हिंदूच्या एका लेखावरून मिळते आहे.

व्हॉट्सॲप कम्युनिटीचा भाग असलेले ग्रुप्स आता कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन व्हॉट्सॲपच्या मदतीने अगदी सहज करू शकतात. त्याचा वापर प्रत्यक्ष भेटण्यासाठी किंवा ऑनलाइन भेटींसाठी वापरकर्त्यांना करता येणार आहे, असे समजते.

हेही वाचा : स्कॅम कॉल करणाऱ्यांना तुमचा नंबर कसा मिळतो? स्वतःच्या सुरक्षेसाठी ‘ही’ माहिती जाणून घ्या…

या फीचरमुळे वापरकर्त्यांना सहज आणि सोप्या पद्धतीने कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन हे व्हॉट्सॲपवरच करता येणार असून, ग्रुपमधील इतरांना त्या कार्यक्रमासाठी RSVP करता येऊ शकते. म्हणजेच त्यांना कार्यक्रमाला यायला जमणार आहे किंवा नाही याबद्दल सांगता येऊ शकते. इतकेच नाही, तर ग्रुपच्या माहिती पेजवर या कार्यक्रमाबद्दल ग्रुपमधील लोकांना माहिती मिळू शकते. तसेच त्यांना वेळोवेळी याबद्दलचे नोटिफिकेशनदेखील देण्यात येणार आहे. सुरुवातीला केवळ कम्युनिटी ग्रुपसाठी असलेले हे फीचर हळूहळू इतर सर्व ग्रुप्ससाठी उपलब्ध होईल.

याव्यतिरिक्तही कम्युनिटी ग्रुपसाठी व्हॉट्सॲपने अजून एक फीचर आणले आहे. कम्युनिटीमध्ये ‘अनाउन्समेंट ग्रुप’ [Announcement Groups] या फीचरच्या मदतीने, ग्रुपमधील अभिप्राय हे एकत्रित करून, ते थेट अॅडमिनपर्यंत पोहोचविले जातील. तसेच याचे नोटिफिकेशनदेखील सर्वांच्या सोईसाठी बंद [mute] करता येऊ शकेल. या फीचरमुळे ग्रुपमध्ये सलग आणि सोप्या पद्धतीने संवाद साधण्यास मदत होईल.

हेही वाचा : ‘गुड मॉर्निंग’च्या फोटोने गॅलरी फुल? WhatsApp सेटिंगमधील ‘हा’ एक बदल करील तुम्हाला मदत; पाहा टिप्स….

“जर तुम्ही व्हॉट्सॲप कम्युनिटीचा भाग असाल, तर आता तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन करू शकता आणि अॅडमिनच्या घोषणांना उत्तर देऊ शकता. पुढच्या काही महिन्यांत इतर ग्रुप्सदेखील या फीचरचा लाभ घेऊ शकतात,” असे झुकरबर्ग यांनी व्हॉट्सॲप चॅनेलवरून या नव्या फीचरची घोषणा देताना म्हटले आहे.