Viral Photo : सध्या प्रयागराजमध्ये मोठ्या उत्साहाने महाकुंभ मेळा सुरु आहे. हा महाकुंभ मेळा १४४ वर्षांनंतर होत आहे त्यामुळे यंदाच्या महा कुंभमेळ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. १३ जानेवारी ते २६ जानेवारी पर्यंत हा सर्वात मोठा धार्मिक उत्सव चालणार आहे.महाकुंभ मेळ्यादरम्यान त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केल्याने आशीर्वाद मिळतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी दररोज लाखो लोकांची गर्दी दिसून येत आहे .
काही लोक इच्छा असूनही महा कुंभमेळ्यात जाऊ शकत नाही. अशा लोकांसाठी सध्या एक जाहिरात व्हायरल होत आहे. ही जाहिरात पाहून कोणीही थक्क होईल. सध्या या जाहिरातीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या जाहिरातीमध्ये नेमकं काय लिहिलेय?

जे लोक प्रत्यक्ष कुंभमेळ्यात जाऊ शकत नाही ते फक्त ५०० रुपयांमध्ये फोटो स्नान करू शकतात, असे या जाहिरातीमध्ये सांगितले आहे. जाहिरातीमध्ये धार्मिक स्थळ दाखवणारा एक फोटो लावला आहे. या फोटोच्या वर मोठ्या अक्षरात “महाकुंभ २०२५” असे लिहिलेय. त्यानंतर फोटो खाली लिहिलेय, “१४४ वर्षातून एकदा येणारी संधी. पवित्र महाकुंभ स्नान करण्याची ही तुमची शेवटची संधी आहे. चुकवू नका. तुमचा फोटो आम्हाला व्हॉट्सअॅप नंबर वर पाठवा. आम्ही तुमचा फोटो घेऊ. तुम्ही पाठवलेल्या फोटोची फोटोकॉपी आम्ही काढू आणि तुमच्या फोटोसह पवित्र पाण्यात स्नान करू”

या जाहिरातीमध्ये पुढे त्यांनी याचे फायदे सुद्धा सांगितले आहे.
“तुमच्या आत्माला शुद्ध करा, तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळेल आणि तुमचे पूर्वज तुम्हाला महाकुंभात स्नान करण्यासाठी आशीर्वाद देतील.
हा क्षण तुमच्या आयुष्यात पुन्हा कधी येणार नाही.
फक्त ५०० रुपये.”
त्याखाली संपर्क करण्यासाठी नंबर दिला असून “#MAHAKUMBH #Lastchance #Holysnan” असे इंग्रजी हॅशटॅग सुद्धा लिहिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील संजय हेगडे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून या जाहिरातीचा फोटो शेअर केला आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलेय, “जर मी ५०० रुपयांच्या नोटचा फोटो पाठवला तर..?

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ते तुम्हाला स्नान करतानाचा एआय इमेज पाठवतील.” तर एका युजरने लिहिलेय, “फक्त १४४ रुपये घ्यायला पाहिजे होते” आणखी एका युजरने लिहिलेय, “सर तुम्हाला फक्त ई-मोक्ष मिळेल” एक युजर लिहितो, “महाकुंभाचे चेष्टेमध्ये रुपांतर झाले आहे. तरुण पिढी हे सर्व चुकीच्या पद्धतीने लक्षात ठेवेन.” तर एक युजर लिहितो, “हे फक्त भारतात होऊ शकतं”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha kumbh 2025 photo snan we will dip in the holy river with your photo in just 500 rupees advertisement pamphlet goes viral ndj