Russian Women Says, Life In India Isn’t Cheap: एका रशियन तरुणीचा, तिला भारतात राहण्यासाठी किती खर्च येतो, हे सांगणारा व्हिडिओ सोशल मीड्यावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे गुरुग्राममधील महागाईबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
गुरुग्राममध्ये राहणाऱ्या व्हिक्टोरिया कोवनने सांगितले की, ती तिच्या १ बीएचके घराच्या भाड्यासाठी महिन्याला १.२ लाख रुपये खर्च करते. याचबरोबर तिने सांगितले की, तिला वीजेसाठी १५,००० रुपये, किराणा मालासाठी ४०,००० रुपये, खरेदीसाठी ३०,००० रुपये, औषधांसाठी २०,००० रुपये आणि प्रत्येक उबर ब्लॅक राईडसाठी सुमारे १,००० रुपये खर्च करावा लागतो.
इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले: “रिअल फॅक्ट्स, गुरुग्राममध्ये चांगल्या दर्जाचे आयुष्य जगण्यासाठी तुमचे खिसे तयार ठेवा.” यानंतर तरुणीच्या या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. टीका झाल्यानंतर तिने स्पष्ट केले की, “मी तक्रार करत नाहीये, मी फक्त फॅक्ट्स सांगितल्या आहे. इथे चांगले आयुष्य जगण्यासाठी, तुम्हाला तुमचे खिसे तयार ठेवावेच लागतील.”
सोशल मीडियावर या रशियन तरुणीच्या खर्चावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी असा युक्तिवाद केला की, तिच्या जीवनशैलीतील निवडी, जसे की उबर ब्लॅक वापरणे आणि आलिशान अपार्टमेंट भाड्याने घेणे, यामुळे तिचा खर्च वाढत आहे.
एका युजरने लिहिले, “उबेर ब्लॅकपेक्षा नियमित उबेरचा वापर का करू नये? जर भाडे जास्त असेल तर कमी भाडे असलेले घर घेणे योग्य नाही का? यापैकी बहुतेक गोष्टी या गरजा नाहीत, ती तुमची निवड आहे.”
दुसऱ्या युजरने म्हटले, “अति आलिशान जीवनशैली जगता आणि नंतर शहर महागडे असल्याची तक्रार करता!! खोटे बोलणे थांबवा. सर्व खर्च ७०-८० हजारांच्या आत भगवता येतात आणि यामध्येही चांगले जीवन जगू शकता.”
तिसऱ्या व्यक्तीने टिप्पणी केली, “तुम्ही भारतातील सर्वात महागड्या शहरांपैकी एका शहराचा उल्लेख करून भारत महागडा आहे म्हणत आहात.” तर, चौथ्या व्यक्तीने लिहिले, “जगात कुठेही जा, आलिशान जीवन जगणे महागडेच असते.”