आळंदीहून पंढरीला निघालेला पालखी सोहळा शनिवारी (२१ जून) पुण्यात येत असून पुणे महापालिकेतर्फे पालख्यांचे स्वागत आणि वारकऱ्यांची व्यवस्था यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. पुण्यातील मुक्कामात वारकऱ्यांना सर्व प्रकारच्या सेवा-सुविधा मिळाव्यात यासाठी महापालिकेची अनेक खाती काम करत असून शेकडो कर्मचाऱ्यांची नियुक्ती विविध कामांसाठी करण्यात आली आहे.
पालख्यांच्या आगमन प्रसंगी महापौर चंचला कोद्रे आणि अन्य पदाधिकारी तसेच नगरसेवक कळसगाव म्हस्के वस्ती येथे तसेच बोपोडी चौकात पालख्यांचे स्वागत करतील. तसेच दिंडी प्रमुख, वीणेकरी यांचा सन्मानही या वेळी केला जाईल. पालखी आगमन, मुक्काम व प्रस्थान अशी तीन टप्प्यातील तयारी महापालिकेने केली आहे. त्यासाठी पाणीपुरवठा, विद्युत, वाहन, आरोग्य, उद्यान, अग्निशमन, अतिक्रमण, आपत्ती व्यवस्थापन आदी अनेक खात्यांना कामे वाटून देण्यात आली आहेत आणि या खात्यांनी त्यांची तयारी पूर्ण केली असल्याचे गुरुवारी सांगण्यात आले. विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३८ शाळांमधील ११२ खोल्यांमध्ये वारकऱ्यांसाठी मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.
वारकऱ्यांचा मुक्काम असणाऱ्या सर्व शाळांमध्ये टँकरद्वारे जो पाणीपुरवठा केला जाणार आहे, ते पाणी शाळांच्या टाक्यांमध्ये चढवण्यासाठी अग्निशमन दलाचे पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालखी मार्गावरील स्वच्छतेचेही नियोजन पूर्ण झाले असून सार्वजनिक स्वच्छतागृह सतत स्वच्छ करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व रस्ते, शाळा व त्यांचे परिसर, हौद, नळकोंडाळी आदींचीही स्वच्छता केली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व उपक्रम बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palkhi pmc readiness welcome