आजच्या धकाधकीच्या जीवनात हस्ताक्षरी पत्रे लिहितोय कोण? एसएमएस, ई-मेल, स्काइप अशा तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे पत्रसंवाद अन् तो सुद्धा हस्ताक्षरी, हा प्रकार अपवादात्मकच होऊ लागला आहे. पण असे असले तरीही एखाद्या चित्रपटात आईने मुलाला लिहिलेले किंवा प्रियकर आणि प्रेयसी यांच्यातील संवाद दर्शविणारी पत्रे पाहिली की कुठेतरी आपल्यालाही कोणीतरी पत्रं लिहावं असं क्षणभर तरी वाटल्याशिवाय राहात नाही.
इतिहासातील महनीय व्यक्तींचे समान वैशिष्टय़ कोणते असा अभ्यास करायचा म्हटला तर, ज्या काही समान बाबी पुढे येतील त्यापकी एक म्हणजे अशा सर्व व्यक्तींची पत्रलेखनावर उत्तम पकड असते. भारताला औद्योगिक विश्वात सन्मानाचे स्थान मिळवून देणारे जे.आर.डी. टाटा हेदेखील असेच व्यक्तिमत्त्व. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक पत्रे लिहिली. पुण्याच्या ‘टाटा सेंट्रल आरकाईव्हज’ या संस्थेत त्यापकी ४० हजारांहून अधिक पत्रांचा संग्रह उपलब्ध आहे.
टाटा म्हणजे सचोटी, टाटा म्हणजे माणुसकी, टाटा म्हणजे स्वदेशाभिमान, टाटा म्हणजे उत्तम दर्जा या आपल्या मनात रुजलेल्या संकल्पनांमागील टाटांची मेहनत या पत्रांमध्ये दडलेली आहे. मेहता प्रकाशनाने त्यापकीच काही पत्रांचा संग्रह ‘जे.आर.डी. टाटा यांची पत्रं’ या नावाने प्रकाशित केला आहे. आपल्या आई-वडिलांपासून ते महात्मा गांधींपर्यंत, अमेरिकेचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री किसिंजर यांच्यापासून ते बाटा या पादत्राणांच्या विश्वातील अग्रगण्य कंपनीच्या संचालकांपर्यंत, आपल्याच कंपनीतील पार्टीला कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण न देणाऱ्या व्यवस्थापकांपासून ते कामगार युनियनच्या प्रमुखांपर्यंत टाटा यांनी विविध स्तरांवर पत्रव्यवहार केला. ही सगळी पत्रे मूळातून वाचावीत अशी आहेतच, पण त्याबरोबरीने या माणसाची ‘दृष्टी’, त्यांची झेप, त्यांना असलेलं जागतिकतेचं भान, त्यांची सूक्ष्मातील सूक्ष्म बाबींकडे लक्ष देण्याची वृत्ती अशा गुणांचीही आपल्याला या निमित्ताने जाणीव होते.
हैद्राबाद येथील ज्योत्स्ना नावाच्या एका महाविद्यालयीन मुलीने टाटांना एक पत्र लिहून, ‘आपण या देशात का राहता?’ असे विचारले होते. त्या पत्राला टाटांनी लिहिलेले उत्तर प्रत्येकाने आपल्या अंत:करणावर कोरून ठेवावे असे आहे. मी या देशात राहतो कारण हा देश ‘माझा’ आहे, मी भारतीय आहे आणि माझे त्यावर प्रेम आहे.. हे जे.आर.डींचे शब्द! याच पत्रात आपला समानतेच्या तत्त्वावरील विश्वास, तरुण पिढीला देशातील अराजकता जेव्हा अस्वस्थ करते तेव्हा त्या तरुणाईबद्दल वाटणारी आपुलकी, स्त्रियांबद्दल साठ-सत्तरच्या दशकांत टाटांचा असलेला दृष्टिकोन या सर्व बाबी स्पष्ट होतात. विशेष म्हणजे या मुलीच्या २९ ऑगस्टच्या पत्राला ‘जेआरडीं’नी ७ सप्टेंबरला उत्तर लिहिले आहे. अत्यंत व्यग्र माणसाच्या आयुष्यातील सर्वसामान्य माणसाचे स्थान यातून समोर येते.
भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील सचिवांना जे.आर.डींनी एक पत्र लिहिले आहे. पारपत्र वितरीत करताना पाश्चिमात्य देशांच्या आणि आपल्या देशाच्या पद्धतीतील फरक सामान्य प्रवाशांना किती त्रासदायक ठरू शकतो आणि त्यावर काय करायला हवे, हे त्यात नमूद केले आहे. आपल्या विमान कंपनीच्या व्यवस्थापकांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी विमानातील पडद्यांचे आकारमान, त्यांची उंची, विमानातील ‘साइन बोर्डा’ची जागा नेमकी कोठे असावी, याबाबत अनुभवांतून सूचना करणारे एक पत्र विमानात बसूनच लिहिले होते, त्याचा या संग्रहात समावेश आहे.
पुस्तकाच्या उत्तरार्धात भारतीय पोलाद उद्योगाची जाणीव करून देणाऱ्या एका पत्राचा समावेश आहे. ज्यांचा भारतीय पंचवार्षकि योजनांवर प्रचंड प्रभाव होता त्या जॉन गालब्रेथ यांना जेआरडींनी पत्राद्वारे सौम्य पण सडेतोड उत्तर दिले आहे. भारतीय असल्याचा टाटा यांना किती अभिमान होता ते या पत्रातून जाणवते. किसिंजर यांनी लिहिलेल्या पुस्तकाबद्दल अभिप्राय कळविताना टाटा यांनी त्यांना, ‘आजवर आपण वाचलेले सर्वात हलके जड पुस्तक’ असा गमतीशीर अभिप्राय कळविला आहे. गांधीजींशी असलेली मतभेद अत्यंत मृदू शब्दांत पण ठामपणे आणि योग्य त्या ताíकक भूमिकांसह नमूद करणारे, पण त्याच वेळी गांधीजींबद्दल आदरभाव व्यक्त करणारे पत्र असो किंवा आईला-बाबांना आठवण आल्याचे, तब्येतीची काळजी घेण्याविषयी सुचविणारी, आपली खुशाली कळविणारी पत्रे असोत, टाटांचा स्वभाव आपल्याला भावल्यावाचून राहात नाही.
व्यक्तिमत्त्व विकास या संकल्पनेबद्दल आपण अनेकदा बोलतो, वाचतो, ऐकतो, पण व्यक्तिमत्त्वाची उंची किती वर नेता येऊ शकते किंवा निदान आपण किती खुजे आहोत याचे भान डॉ. कलाम, जे.आर.डी. टाटा यांसारख्या व्यक्तींची पुस्तके वाचताना पदोपदी येत राहते. बहुधा हाच आपला विकासाकडील प्रवास ठरू शकतो…
पुस्तक – जे.आर.डी. टाटा यांची पत्रे
प्रकाशन – मेहता प्रकाशन
पृष्ठसंख्या – ५०९
मूल्य – ४५०/-