नव्या पिढीचा गायक, संगीतकार, हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!
गेले साधारण दहा महिने मी इथे दर आठवडय़ाला एक प्ले लिस्ट घेऊन येतोय. मी जे ऐकतो, किंवा लहानपणापासून जे ऐकत आलो आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. लहानपणापासूनच सतत वेगवेगळे, अनेक प्रकारचे संगीत ऐकायचा माझा प्रयत्न राहिला आहे. पण गेल्या दोन वर्षांमध्ये मी सर्वात जास्त काही ऐकले असेल, तर ते म्हणजे आजची प्ले लिस्ट आहे.
मला दोन वर्षांची मुलगी आहे. ती झाल्यापासून आजवर, तिचा मूड सुधारण्यासाठी, ती रडत असेल तर तिला शांत करण्यासाठी, तिला झोपवताना, किंवा असंच, तिच्या कानावर लहानपणापासूनच सांगीतिक संस्कार घडावेत म्हणून; आमच्याकडे रोज जी गाणी वाजत आली आहेत, ती आजच्या प्ले लिस्टमधून तुमच्यासमोर आणतोय. तसंही १४ नोव्हेंबर हा बालदिन आहे. तर सादर आहे बाल- प्ले लिस्ट.
तिचा बिघडलेला मूड जर ठीक करायचा असेल, तर ‘तारे जमीन पर’मधले ‘बम बम भोले’ हा एक चांगला पर्याय आहे. संगीत संयोजन आणि शब्दांची रचनात्मक गर्दी या गाण्यात खूप छान पद्धतीने योजली आहे. शानचे गाणे आणि आमीर खानचा रॅप अजूनच मस्त. ‘मामाच्या गावाला जाऊ या’ हे गाणेसुद्धा अशावेळी नक्कीच मदत करते. हे गाणेसुद्धा धमाल आहे, पण हे गाणे ऐकताना मला बालपणापासून एक प्रश्न पडतो; मामाची बायको जर सुगरण आहे, तर मग ती रोज रोज पोळीबरोबर अगदी शेंबडय़ा पोरालाही बनवता येईल असा पदार्थ- ‘शिकरण’ का बरे करत असेल? असो, हे एक बडबड गीत आहे, हे विसरता कामा नये. लहान मुलांचा बिघडलेला मूड ठीक करण्याचे पुण्य अजून दोन बडबड गीतांना सतत मिळते. दोन्ही गुलजारसाहेबांच्या लेखणीतून अवतरलेली. एक म्हणजे हिंदीमधील सर्वश्रेष्ठ बडबड किंवा बालगीत म्हणायला हरकत नाही असे- ‘लकडी की काठी’! ‘घोडा था घमंडी, पोहोंचा सब्जी मंडी..’ अर्थबीर्थ बाजूला ठेवून केवळ शब्दांच्या ध्वनीवर लक्ष देऊन हे गाणे लिहिले आहे. दुसरे म्हणजे ‘जंगल बुक’ या कार्टूनचे हिंदी टायटल साँग- ‘जंगल जंगल बात चली है पता चला है, चड्डी पेहेन के फूल खिला है फूल खिला है’.. चड्डी पेहेन के फूल खिला! काय धम्माल संकल्पना शोधून काढलीय! हे गाणे ऐकताना मला माझ्या बालपणीची रविवार सकाळ तर आठवतेच, पण याचे शब्द आज ऐकताना अजूनच मजा येते. एक परिंदा था शरमिंदा, था वो नंगा.. इससे तो अंडे के अंदर था वो चंगा, सोच रहा है बाहर आखिर क्यों निकला है? केवळ भारी!
कलाकार भारी असेल तर तो कुठलीही कलाकृती भारीच करतो. मग ती लहानांसाठी असो, वा मोठय़ांसाठी. असाच अजून एक भारी कलाकार म्हणजे आपले खळे काका! ‘ससा तो ससा’ हे गाणे ऐकताना काय मजा येते आजही! पण गायला गेलो तर घाम फुटतो. मुळात लहान मुलांसाठीचे गाणे अशा अवघड चालीत बांधावेसे वाटणे हेच आश्चर्यकारक आहे. खळेकाकांनी नुसती अशी अवघड चाल बांधलीच नाही, तर ती अवघड असूनही प्रत्येकाच्या ओठी ती रुळेल अशी लक्षणीय बनवली. ‘नीज माझ्या नंदलाला’! शांत झोप आणणारी सुरेल अंगाई बनवणे म्हणजे ऐऱ्यागैऱ्याचे काम नोहे. येथे पाहिजे जातीचेच! याच जातकुळीची, दिग्गजांनी जातीने लक्ष घालून केलेली अजून काही गाणी म्हणजे- इलाही राजांचे ‘सुरमई अखियोंमे’ (हे आणि ‘नीज माझ्या..’ ऐकताना डोळ्यात पाणी का येते दर वेळेस. कोण जाणे?) येसुदासांचा प्रासादिक आवाज. क्या बात! ‘हायवे’मधले ‘सोहासाहासा’ आणि ‘स्वदेस’मधले ‘आहिस्ता आहिस्ता’. ‘स्वदेस’मधलेच ‘ये तारा वो तारा’ हे गाणेसुद्धा अंगाई नसूनही उदितजींच्या आणि बासरीच्या सुरेलपणामुळे आपला असर दाखवते. असेच, अंगाई नसूनही किंबहुना बालगीत नसूनही आपला असर करणारे, माझ्या मुलीला सर्वात आवडणारे गाणे म्हणजे ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटातले अमित त्रिवेदीने संगीतबद्ध केलेले व गायलेले ‘जियरा धाकधुक होय’. माझ्या मुलीचे नाव जियरा असल्याने तिला आम्ही हे गाणे ती अगदी काही दिवसांची असल्यापासून ऐकवतोय आणि आम्हालाही हे गाणे इतक्या वेळा ऐकूनही याचा कंटाळा येत नाही! वेगळीच जादू आहे या गाण्यात. मुलगीसुद्धा हे गाणे आणि वर नमूद केलेली सगळी गाणी अगदी मन लावून, चवीने ऐकत असते. तिच्या कानावर चांगले संस्कार होत आहेत याचे आम्हालाही समाधान वाटते.
हे ऐकाच.. डॉक्टर ऑफ म्युझिक
हा प्रकार आवर्जून ऐकायचा नाही, तर ऐकवायचा, प्रयोग करून पाहायचा प्रकार आहे. आमच्या मुलीला आम्ही अंगाई गीते ऐकवतोच, पण अनेकदा बदल म्हणून तिला झोपवताना तिला तानपुरासुद्धा ऐकवतो. तानपुऱ्याच्या अनेक कॅसेट्स, सीडीज बाजारात उपलब्ध आहेतच, फोनवरसुद्धा सुरेल तानपुऱ्याचे काही अॅप्स आहेत ज्यावर आपल्याला तानपुरा (तंबोरा) लावून ठेवता येतो. या तानपुऱ्याच्या आवाजामुळे मुलांना गोड हलकी गुंगी येते आणि ती शांत झोपतात असा आमचा अनुभव आहे. तुमच्या घरी लहान मूल असेल, तर हा प्रयोग नक्की करून बघा.
viva.loksatta@gmail.com