बेल्ट किंवा शुद्ध मराठीतला कमरपट्टा म्हणजे काही फक्त पाटलोण जागेवर राखण्यासाठी दिलेला पट्टा नव्हे. तर ही आहे एक बहारदार अ‍ॅक्सेसरी. तो जर योग्य पद्धतीने, योग्य स्टाइलने वापरलात तर लुकला चार चाँद लावू शकतो.

बेल्ट म्हटल्यावर आपल्याला जीन्स किंवा ट्राउजरवर लटकलेला बेल्ट आठवतो. सुरुवातीला केवळ मुलांची मक्तेदारी असलेला हा बेल्ट फॅशनच्या दुनियेत मुलींच्याच कटीप्रदेशावर जास्त लटकू लागला आणि चमकलासुद्धा.

टिपिकल लेदर बेल्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण आजकालच्या फॅशन विश्वात प्लॅस्टिक आणि कापडी बेल्टचाही बोलबाला आहे. वेगवेगळ्या साइजचे, रंगाचे, डिझाइनचे बेल्ट्स मुलींना आवडतायत. अनेकदा बेल्ट टॉपमुळे झाकला जातो. पण कधी कधी टॉपच्या वर लावलेला बेल्टही एक वेगळा स्टायलिश लुक देऊ शकतो. तर कधी क्रॉप टॉपसारख्या थोडय़ा तोकडय़ा टॉपखाली हा बेल्ट एकदम अफलातून दिसू शकतो.

  • एखाद्या मस्त जॅकेटवर बेल्टचा प्रयोग करून बघा. जॅकेटची पुढची दोन्ही टोकं थोडी बाहेरच्या बाजूला दुमडा आणि त्यावर मस्त मॅच होईल अशा रंगाचा बेल्ट घाला. बघा मग कसा हटके लुक मिळेल.
  • हल्ली आपल्याकडे ओव्हर साइज, बिग साइज शर्ट असतोच. त्या शर्टवर हाय वेस्टला किंवा लो वेस्टला बेल्ट घातला तर तुम्हाला शॉर्ट वन पिसचा लुक नक्कीच मिळू शकेल.
  • ल्ल एखादा गाऊन किंवा वन पीस अगदीच लूज असेल तर त्यावर छातीच्या खाली किंवा लो वेस्टला बेल्ट घातला तर परफेक्ट फिटेड गाऊन किंवा वन पीस तयार होईल. मेटलचा बेल्ट वापरल्यास क्लासी लुक मिळेल.
  • पारदर्शक शर्ट किंवा टॉपच्या आतून स्टायलिश रंगतदार बेल्ट वापरलात तर नक्कीच बोल्ड लुक मिळेल.
  • स्कर्टवर टॉप किंवा टी-शर्ट घालून तो इन करून त्यावर वेस्टबेल्ट घालून बघा. शर्ट किंवा टॉप इन करून लो वेस्टला बेल्ट लावून थोडा इन बाहेर काढून बघा बबल टॉपसारखा लुक नक्कीच मिळेल.
  • सणाला आपण साडी नेसतो त्यावरपण नाजूक कंबरपट्टा घालता येईल. या बेल्टमुळे साडी व्यवस्थितही राहील आणि वेगळा लुकही मिळेल.

बेल्ट बांधण्याच्या वेगळ्या पद्धती

  • कापडी बेल्टला साधी गाठ बांधून शेवटी शूज लेससारखे बांधा.
  • एखाद्या बेल्टला पूर्ण किंवा अर्धी गाठ बांधून ड्रेसला आगळाच लुक मिळेल.
  • शर्टला अर्धवट इन करून त्यावर बेल्ट घातलात तर रावडी लुक मिळेल.

viva@expressindia.com