संगीतात असलेल्या षड्जया सुराबद्दल ऋग्वेद सांगतो, ‘दाही दिशा, पंचमहाभूतं, सर्व स्वर अशा सगळ्यांना पिळलं तर त्यातून एक थेंब बाहेर पडेल तो म्हणजे षड्ज’.

घराणेशाही ही नेहमी नकारात्मक दृष्टिकोनातूनच पाहिली जाते, मात्र मनाला भावणारी आणि सदैव हवीहवीशी वाटणारी घराणी असतात त्यातील एक म्हणजे ‘मंगेशकर’ कुटुंबीय.. मा. दीनानाथ मंगेशकर यांच्यापासून सुरू झालेली ही सुरांची परंपरा त्यांच्या मुलांनी म्हणजेच मंगेशकर भावंडांनी वारसा हक्काने पुढे नेली. आता तिसऱ्या पिढीकडे ही सूत्रं आहेत. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची मुलगी राधा मंगेशकर ही या तिसऱ्या पिढीची प्रतिनिधी. वयाच्या आठव्या वर्षी गायन क्षेत्रात पाऊल ठेवलेल्या राधाने सरधोपट वाट कधीच स्वीकारली नाही. अनवट वाटा नेहमीच तिला आपल्याशा वाटत गेल्या. एकटीने जग फिरण्यापासून ते चौकटीबाहेरचं संगीत असलेल्या ‘रवींद्र संगीता’चे कार्यक्रम करण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी तिने तिचं वेगळेपण जपलं आहे. अशा व्यक्तिमत्त्वाला ऐकायची आणि जाणून घ्यायची संधी ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’च्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाद्वारे रसिकांना मिळाली. विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघात पार पडलेल्या केसरी प्रस्तुत, लागू बंधू सहप्रयोजित ‘व्हिवा लाउंज’ कार्यक्रमात ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम आणि प्रतिनिधी स्वाती केतकर-पंडित यांनी राधाशी संवाद साधला.

रवींद्र संगीताची आवड

घरात सहज चित्रपट संगीत आणि इतर विषयांवर बोलता-बोलता विषय निघाला तेव्हा मी रवींद्र संगीताबद्दल इतरांकडून जे ऐकलं होतं त्याच्या आधारे माझं मत व्यक्त केलं आणि ते नकारात्मक होतं. त्या वेळी बाबांनी मला आधी ते संगीत समजून घेण्याचा आणि मग त्यावर मत बनवण्याचा सल्ला दिला. तत्त्वज्ञान शिकतानाही रवींद्रनाथ टागोर थोडेफार अभ्यासले होते. मात्र बाबांच्या या सल्ल्यानंतर मी स्वत: रवींद्र संगीताची सर्व गाणी ऐकली. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की, याबद्दल गैरसमजच अधिक आहेत. रवींद्र संगीताचे नियम फार कडक आहेत, त्याला एक चौकट आहे ज्यात कोणीही फेरफार करू शकत नाही. कोणतेही नवीन बदल करायला रवींद्र संगीतात परवानगी नाही. संगीत ही एक स्वतंत्र परंपरा आहे. मुळात महाराष्ट्राला शास्त्रीय संगीताची स्वत:ची परंपरा नाही. कर्नाटकी संगीत महाराष्ट्रात अगदी सहजपणे मिसळून गेलं मात्र रवींद्र संगीत महाराष्ट्राला विशेष माहितीही नाही. काही गाणी लोकांना वाटतात तशी थोडीशी उदास आणि कंटाळवाणी आहेत, मात्र अनेक गाण्यांची बांधणी उत्तम आहे पण लोकांपर्यंत हे संगीत फारसं पोहोचलेलंच नाही. त्यामुळे रवींद्र संगीत आपल्याकडे फारसे रुळले नाही. मला मात्र ऐकण्यातून रवींद्र संगीत आवडत गेलं.

बाबा उत्तम गुरू

मी कायम बाबांकडेच शिकले आणि अजूनही त्यांच्याकडेच रियाज करते. त्यांना पहिल्यांदा भेटणाऱ्या माणसाला अनेकदा त्यांची भीती वाटते. मात्र बाबांकडे कमालीचा संयम आहे. एकच चूक कितीही वेळा केली तरी ते कोणालाही ओरडत नाहीत. आजपर्यंत कधीही त्यांनी माझ्यावर आवाजही चढवला नाही. कोणालाही ओरडणं हे त्यांच्या स्वभावातच नाही. तरीही गुरू म्हणून त्यांचा दबदबा, प्रभाव इतका आहे की अजूनही त्यांच्यासमोर पहिल्यांदा गाताना मला थोडीशी भीती वाटतेच. मात्र मला माणूस म्हणून जगातलं जे काही कळतं आणि गाण्यातलं जे काही येतं ते सगळं केवळ बाबांमुळेच!

संगीत आणि तत्त्वज्ञान

भारतीय तत्त्वज्ञानात महत्त्वाचं स्थान आहे ते म्हणजे चार वेदांना. त्यात ‘सामवेद’ हा संगीताचा मानला जातो, मात्र ‘ऋग्वेदा’तही संगीताचे काही उगम सापडतात. संगीतात असलेल्या ‘षड्ज’ या सुराबद्दल ऋग्वेद सांगतो, ‘दाही दिशा, पंचमहाभूतं, सर्व स्वर अशा सगळ्यांना पिळलं तर त्यातून एक थेंब बाहेर पडेल तो म्हणजे ‘षड्ज’. तो षड्ज म्हणजे ‘सा’ ‘आदी’स्थानावर असल्याने तो स्थिर आहे, शाश्वत आहे. ‘सा’ कधीच कोमल किंवा मध्यम वगैरे लावला जात नाही, तो कायम त्याच्या स्थानावरच असतो. भारतीय तत्त्वज्ञान हे अनादी-अनंत काळापासून चालत आलेलं असल्याने त्याचा आणि संगीताचा खूप जवळचा संबंध सापडतो ज्याने दोन्ही गोष्टींची एकमेकांना मदत होते.

मी कधी गायचं ठरवलं नव्हतं..

गाण्यात करिअर करायचं असं मी कधीच ठरवलं नव्हतं. लहानपणापासून सतत गाणं कानावर पडलं म्हणून गाणी तोंडी असायची. मला अनेक गाणी पाठ होती आणि मी गाणी गुणगुणायचे. बाबांनी माझ्यातलं गाणं ओळखून मला शिकवायचं ठरवलं असावं. मी सात किंवा आठ वर्षांची असताना एक दिवस बाबांनी मला सहज म्युझिक रूममध्ये बोलावलं. आमच्या घरात एक म्युझिक रूम आहे, सगळे मंगेशकर तिथेच गाण्याचा सराव करतात. त्यांनी मला म्युझिक रूममध्ये बोलावून थेट शिकवायलाच सुरुवात केली. तेव्हापासून माझ्या गाण्याला आपोआप सुरुवात झाली.

गाण्याच्या आठवणी

मला गाणं ऐकायला किंवा ते जगायला कधी कष्ट पडले नाहीत. घरात सतत गाणंच असायचं. त्या वेळी लतादीदी नेहमी कार्यक्रमांसाठी परदेशप्रवास करत असायच्या आणि बाबा महाराष्ट्रभर दौरे करायचे. त्या वेळी त्यांच्यासोबत मीही फिरत असायचे. बाबांचं गाणं आणि लतादीदींचं गाणं सोडून तिसरं कोणतं गाणं ऐकलं असेल तर ते दूरदर्शनवरचं ‘छायागीत’. त्या वेळी मॅडम नूरजहाँ लतादीदींना त्यांच्या गाण्याच्या व्हिडीओ पाठवायच्या. तेही मी नेहमी ऐकत असे. त्यामुळे लहानपणी माझ्यावर मॅडम नूरजहाँ यांच्या गायकीचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव जास्त होता.

एकटीने जगभ्रमंती

मी कधीच संगीत शिकण्यासाठी किंवा केवळ संगीताचा अनुभव घेण्यासाठी कुठे गेलेय असं केलेलं नाही. जिथे जाते तो प्रदेश बघणं, तिथली सामाजिक स्थिती पाहणं, लोकांना भेटणं, राहणीमान अनुभवणं हा माझा उद्देश असतो. त्यामुळे मला सिंगापूर, दुबई वगैरे बघण्यात रस नाही; त्यापेक्षा रोमन देश, तिथली संस्कृती वगैरे असे पैलू जाणून घेण्याची माझी इच्छा असते. मला एकटीलाच फिरायला आवडतं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इतर लोक असले की होणारी मतं-मतांतरं, कुठे जायचं, काय बघायचं, शॉपिंग करायचं वगैरे या सगळ्या गोष्टीत आपल्याला जे पाहायचंय, अनुभवायचंय ते सगळं निसटूनच जातं. एकटीने फिरताना मला कधीच कोणाचीच भीती वाटत नाही. ही गोष्ट बाबांनी मला शिकवली. कधी कशाला घाबरू नकोस हे बाबांनी मला नेहमीच सांगितलं आहे.

ग्लॅमर विरुद्ध साधेपणा

लतादीदींचं राहणीमान हे नेहमीच खूप साध्या पद्धतीचं असायचं आणि अजूनही आहे. ऐंशीच्या दशकात मॅडम नूरजहाँ त्यांची व्हिडीओ रेकॉर्डिग्स स्वत: दीदींना पाठवत असत. रंगीत टीव्ही त्या वेळी पाकिस्तानमध्ये पहिल्यांदा आला होता. त्यामुळे त्यांचे कलर व्हिडीओज होते. त्यात त्यांच्या चकचकीत साडय़ा आणि त्यांचं भरजरी तयार होणं मला भुरळ घालायचं. खूप दागिने आणि डोळ्यात भरेल असा मेकअप त्यांनी केलेला असायचा. आणि दुसरीकडे होत्या लतादीदी ज्या नेहमी पांढऱ्या रंगाची क्वचित पिवळ्या रंगाची साडी नेसून, कानात कुडय़ा, हातात चार बांगडय़ा आणि एक अंगठी या गोष्टींव्यतिरिक्त कधी नटायच्या नाहीत. मला मॅडम नूरजहाँचं असं राहणं आणि असं दिसणं प्रचंड आवडायचं आणि मी नेहमी त्यांच्यासारखं राहण्याचा माझ्या परीने प्रयत्न करायचे. माझी आई भारती मंगेशकर खास त्यासाठी क्रॉफर्ड मार्केटमधून त्यांच्या पद्धतीचं चकचकीत कापड घेऊन त्याचे फ्रॉक शिवून द्यायची.

शाळेचे दिवस

मंगेशकर म्हणून शाळेत आणि महाविद्यालयातही फार वाईट वागणूक मिळाली. त्या आठवणी फारशा चांगल्या नाहीत. सगळ्या शिक्षकांना मंगेशकरांची मुलगी म्हणून विशेष कौतुक होतं असं नव्हे; तर उलट ‘मोठय़ा घरची मुलगी’ असल्याचा मत्सर किंवा हेवा त्यांच्या वागण्यात दिसत असायचा. इतर मुलांच्या वागण्यातही त्यांना माझ्याबद्दल काही प्रॉब्लेम आहे असं नेहमी वाटायचं. मंगेशकरांची मुलगी म्हणून त्यांनी मला काही विशेष वागणूक दिली असेल तर ती काही फार कौतुकाची आणि प्रेमाची नव्हती.

विज्ञान आणि गणिताचे सूर जुळलेच नाही

शाळेत मला हिंदी आणि इतिहास सोडता कोणतेच विषय आवडले नाहीत. विज्ञान आणि गणित तर माझ्या डोक्यावरूनच जायचे. मला हिंदी आवडायचं म्हणून मी हिंदीत बी. ए. केलं, त्यानंतर तत्त्वज्ञान विषयात बी. ए. आणि एम. ए. केलं आणि आता तत्त्वज्ञानातच पीएच. डी. करते आहे. ‘भारतीय तत्त्वज्ञान’ हा माझा आवडता विषय आहे. कदाचित बाबांच्या सगळ्या दिग्गज मित्रांच्या सहवासात राहिल्याने माझ्यात थोडासा गंभीरपणा आला असावा आणि कदाचित त्यामुळे मला तत्त्वज्ञानासारखा गंभीर आणि गहन विषय आवडायला लागला.

मीरा-सूर-कबीर आणि संगीत

मीरा, सूरदास आणि कबीर या तिघांची भक्ती वेगळी होती, मार्ग वेगळे होते आणि साध्यही वेगळं होतं. तिघांच्या संस्कृती वेगळ्या होत्या आणि प्रवृत्तीही वेगळ्या होत्या. प्रत्येकाच्या सभोवतालची सामाजिक, राजकीय, भौगोलिक आणि ऐतिहासिक परिस्थिती निराळी होती. मीरा ही कधीच कोणी तत्त्वज्ञ नव्हती. तिच्या रचना या अत्यंत सरल आणि तरल आहेत. तिच्या रचना या राजस्थानी खडी बोली या भाषेतल्या आहेत तर सूरदासाच्या रचना ब्रिज भाषेतल्या आहेत. कबिराची मुख्य भाषा अवधी असली तरी त्यावर उर्दू आणि फार्सीचाही प्रभाव आहे. या तिघांना एकत्र सादर करायचं आणि त्यासाठी त्यांना एका सूत्रात बांधायचं ही एक मोठी जोखीम होती, एक मोठं आव्हान होतं.

आजकालचं संगीत आणि रसिकता

आजकालच्या संगीताबद्दल आणि लोकांच्या बदललेल्या रुचीबद्दल माझं एकच म्हणणं आहे ते म्हणजे ‘नो कॉमेंट्स’! लोकांची वेगळं काही स्वीकारायची तयारी नाही आणि जी बदललेली रसिकता दिसते त्यात बसणारं काहीच मला करता येणं शक्य नाही. तुम्ही काय ऐकता हे मला माहितीये आणि नवीन काही चौकटीबाहेरचं सादर केलेलं तुम्हाला झेपत नाही, आवडत नाही. माणसांचा ‘इंटलेक्ट’च कमी झाल्यासारखं माझं मत आहे. हल्ली तर लोकांशी काय बोलावं हासुद्धा प्रश्नच पडतो त्यामुळे तर संगीतातले वेगळे प्रयोग स्वीकारले जाण्याची आणि लोकांना आवडण्याची शक्यता जवळजवळ नाहीच!

मुलगी नाही, माणूस म्हणून जग!

बाबांनी मला कधीच मुलगी म्हणून वेगळी वागणूक दिली नाही की कोणती गोष्ट करण्यापासून मला कधी अडवलं नाही. स्त्री म्हणून जन्माला आल्याने ज्या गोष्टी उपजत असतात त्यातल्या काही गोष्टींबाबत काळजी घ्यायला मात्र त्यांनी मला नक्की सांगितलं. कधीही कोणाचा हेवा करू नकोस, दागिन्यांसारख्या कोणत्याही भौतिक गोष्टींमध्ये जीव अडकवू नकोस, कसलीही भीती बाळगू नकोस आणि इकडची गोष्ट तिकडे करत जाऊ  नकोस, अशा खूप महत्त्वाच्या मूलभूत गोष्टी त्यांनी मला सांगितल्या.

प्रतिक्रिया

मतं भावली

मी खास राधाताईंसाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. मला त्यांच्या गाण्याची पद्धत खूप आवडली. त्यांची प्रत्येक मत खूप वेगळे होते आणि त्यातून मीही माझा पुढच्या वाटचालीसाठी काही गोष्टी शिकेन, काळजी घेईन.

जगजिद नेवरेकर

साधी राहणी उच्च विचारसरणी

मला कार्यक्रम खूप आवडला. राधाताईने तिच्या वडिलांना गुरुस्थानी मानलं. ती एवढय़ा मोठय़ा घरातून असूनही तिची राहणी, स्वभाव खूप साधा आहे आणि तिचे विचार खूप मोठे आहेत. तिच्यामध्ये मला कुठेही आत्मप्रौढी जाणवली नाही. उलट मला तिचा आत्मविश्वास खूप आवडला.

तन्वी दांडेकर

सर्वसामान्य लोकांना समजतील असे बोल

‘व्हिवा’मुळे राधाताईंना ऐकायची संधी मिळाली. आम्हा तरुणांना, सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत मीराबाईंच्या रचना, काही अभंग त्यांनी सांगितले. जे सहजच आमच्या पिढीलाही आकर्षित करू शकतात. सोबत त्यांचे अनुभवही बरंच शिकवून गेले.

आशुतोष वेलणकर

नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या

राधाताईच्या बोलण्यातून जगण्याचा नवीन दृष्टिकोन मिळाला. तिच्या अनुभवातून नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. मोठय़ा घरातील राधाताई खूप साधी वाटली आणि हेच मला जास्त आवडलं.

भार्गवी पवार