बॅकपॅकिंगचं तंत्र जसं बदलत राहतं तसंच त्यासाठीची फॅशन, खास त्या वेळी वापरल्या जाणाऱ्या अॅक्सेसरीज, बॅग्ज या सगळ्यांत वैविध्य आलं असून या सगळ्या गोष्टी सध्या बॅकपॅकिंगच्या फॅशन सदरात गणल्या जातायेत..
आपल्याला कुठेही जायचं असलं की, आपल्याला बॅकपॅक करावी लागते. वन डे ट्रिप असू दे किंवा जास्त दिवसांची.. कुठेही बाहेर जायचं म्हटलं की, बॅकपॅकिंग आलंच. बॅकपॅकिंग म्हणजे आपण बाहेर जाताना भरलेली बॅग. यात नवं असं काही नाही, परंतु हे बॅकपॅकिंग प्रत्येक वेळी सेमच असतं असं नाही. बॅकपॅकिंगचं तंत्र जसं बदलत राहतं तसंच त्यासाठीची फॅशन, खास त्या वेळी वापरल्या जाणाऱ्या अॅक्सेसरीज, बॅग्ज या सगळ्यांत वैविध्य आलं असून या सगळ्या गोष्टी सध्या बॅकपॅकिंगच्या फॅशन सदरात गणल्या जातायेत..
तुम्ही बाहेर भटकं तीसाठी निघायचं ठरवलं, की कपडे, सामान यासोबत कोणती बॅग घ्यायची याचा विचार नक्की करता. हाच विचार आजकाल अनेक फॅशन डिझायनर, फॅशन ब्रँड करताना दिसतायेत. यंदाच्या ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये खडऊक या फॅशन ब्रँडने ‘कप्रेसी’ या बॅगच्या ब्रँडसोबत टायअप करून कलेक्शन सादर केलं. यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बॅकपॅक बघायला मिळाले. तुम्ही फिरत असलात तरी तुमचा लुक चांगला आणि फॅशनेबल दिसण्यासाठी हा सगळा खटाटोप अनेक डिझायनर करत आहेत. त्यामुळे आपल्याला बाहेर जाताना कोणत्या कपडय़ासोबत कोणती बॅग जाईल आणि फॅशनेबल लुक मिळेल हे एकाच छताखाली पाहायला मिळते. ‘कप्रेसी’सारखेच अमेरिकन टुरिस्टर, स्कायबॅग्ज, वाइल्डक्राफ्ट, प्युमा, फास्टट्रॅक, नाईके, व्हीआयपी, टॉमी हिलफिगर हे ब्रँडसुद्धा खूप फेमस आहेत आणि हेच ब्रँड सध्या बॅकपॅकचे अनेक ट्रेंड सेट करताना दिसतात. निव्वळ कपडे भरून घेऊन जाण्यासाठी गरजेची वस्तू म्हणजे बॅग हा दृष्टिकोन मागे टाकत बॅकपॅककडे एक स्टाइल स्टेटमेंट म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. यंदा बॅग्जमध्ये फ्रेश आणि ब्राइट कलर, फ्लोरल प्रिंट, जिओमॅट्रिक प्रिंटचा ट्रेंड आहे.
जागेनुसार आणि सीझननुसार आपली बॅकपॅकिंगची स्टाइल बदलते. आताच्या काळात यूटय़ूबवर ब्लॉगिंग करण्याचा खूप ट्रेंड आहे. ब्लॉगिंग करत असल्यामुळे यूटय़ूबरला अनेक ठिकाणी फिरावं लागतं. मग तेव्हा ते कशी बॅकपॅकिंग करतात याविषयी ‘व्हिवा’ने एका यूटय़ूबरला बोलतं केलं. ‘जीवन कदम व्लॉग’ या यूटय़ूब चॅनेलचा जीवन कदम हा तरुण अनेक गड, किल्ले, छोटय़ामोठय़ा जागा फिरून व्लॉगिंग करतो. ‘‘मी किती दिवसांसाठी बाहेर जातो आहे आणि कुठे जातो आहे यानुसार मी माझी बॅग निवडतो. एका दिवसासाठी जायचं असेल तर मी छोटी बॅग घेतो. गड-किल्ले चढताना मला माझ्या बॅगबरोबर माझा कॅमेरा सांभाळत शूटिंग करायचं असतं. अशा वेळी मी उगाचच मोठी बॅग घेऊन त्याचंही ओझं वाढवून घेत नाही. माझी कॅमेऱ्याची बॅग ही नेहमीच वेगळी असते. त्यामध्येच मी माझे दोन कॅमेरे आणि शूटिंगचं गरजेचं सामान उदा. पॉवर बॅक, बॅटरी घेतो. माझ्या मेन बॅकपॅकमध्ये पहिल्यांदा मोठय़ा पाण्याच्या बाटल्या, फस्टएड बॉक्स, चाकू, दोरी आणि एक जोडी कपडे असतातच. याव्यतिरिक्त एनर्जी ड्रिंकची बॉटल, खाण्यासाठी थोडे पदार्थ असतात. जर मी वन डे ट्रिपसाठी जाणार असेन तर माझ्यासोबत खाण्यासाठी फळे आणि ओव्हरनाइट भिजवून ठेवलेली कडधान्ये, ड्रायफ्रूट असतात ज्यामध्ये काही अंश पाण्याचा असतो जो आपल्याला उपयोगी येतो. अशा ट्रिपला कधीही खाण्यासाठी बिस्किट, वेफर घेऊ नयेत. जास्त दिवसांच्या ट्रिपला जाताना माझ्या बॅकपॅकमध्ये स्लीपिंग बॅग, टेंट, सीझननुसार गरम, पावसाळी कपडे, जेवण बनवण्यासाठी अगदी छोटी आणि गरजेपुरती भांडी असतात. जास्त दिवसांच्या ट्रिपसाठी ठरलेल्या खाण्यासोबतच पटकन आणि कमी वस्तूंमध्ये शिजणारे पदार्थ उदा. तांदूळ असतात, असं तो सांगतो. बॅकपॅकिंगसाठी शक्यतो चांगल्या ब्रँडच्या मजबूत अशा बॅगाच वापराव्यात, कारण आयत्या वेळी बॅग फाटली तर खूप त्रास होतो, असं जीवनने सांगितलं. अशाच पद्धतीने नेहमी रोडट्रिप करणारा गंधार पटवर्धन सांगतो की, ‘‘मी रोड ट्रिप बाइकवरच करतो. त्यामुळे मी बॅग निवडताना छोटी आणि वापरण्यासाठी इझी असणारी बॅग निवडतो. बॅकपॅकिंग करताना मी अगदीच आटोपशीर पद्धतीने करतो. उगाचच गरजेच्या नसलेल्या गोष्टी मी चुकूनही घेत नाही. मी डेस्टिनेशननुसार कपडे भरतो. ट्रिपच्या दिवसानुसार मी पॉवर बॅक, ब्लूटूथ स्पीकर, पाण्याच्या बाटल्या, फर्स्टएड बॉक्स, कॅमेरा, इमर्जन्सीसाठी टायर, पंचर किट घेतो. मोठय़ा उदा. लेह-लडाखसारख्या ठिकाणी बाकीच्या गोष्टींसोबत एक्स्ट्रॉ टायर, इंजिन तेल, ब्रेक तेल, रस्ट स्प्रे, ब्रेक पॅड आवर्जून बॅकपॅक करतो.’’
रोड ट्रिपसोबतच अनेक तरुण-तरुणी हमखास ट्रेकिंगला जातात. मग ते त्यांची बॅकपॅकिंग कशी करतात याविषयी बोलताना ट्रेकिंगसाठी शूज, कपडे यासोबतच आपली बॅग हीच आपली सखासोबती असते, असं रोहन खांदारे सांगतो. ही बॅग आपल्याला वेळोवेळी साथ देते. त्यामुळे त्याचा दर्जा हा उत्तमच हवा. बॅकपॅकिंग करताना त्यामध्ये जेवण बनवण्याचे सामान टिकणारे आणि बनवण्यास सोप्पे खाण्याचे पदार्थ उदा. मॅगी, भात असे पदार्थ घेतो. सोबतच टॉवेल, कपडे, स्लीपिंग बॅग, चाकू, दोरी, बॅटरी, काठी हेसुद्धा एका ट्रेकरच्या बॅकपॅकिंगमध्ये असावेतच, असं रोहन आग्रहाने सांगतो. काय मग, काही आयडिया आली का तुम्हाला कुठे जाताना कोणत्या बॅकपॅक वापरायच्या? बॅकपॅकिंग कशी करायची, त्यात काय काय असणं गरजेचं आहे, हे सगळं लक्षात घेऊन तुमची बॅगवती तयार करत तुमचं स्टाइल स्टेटमेंट चोख करा!