लॅक्मे फॅशन वीक हा वर्षातून दोन वेळा होणारा फॅशनचा सोहळा. समर सीझन आणि विंटर वेडिंग ही त्याची ओकेजन्स. लग्नसराई केंद्रस्थानी ठेवून होणारे हे फॅशनचे उत्सव त्या त्या सीझननुसारही डिझाइन्समध्ये व्हरायटी घेऊन येतात. आतापर्यंतच्या पंचवीस वर्षांत शेकडो डिझायनर्सनी या उत्सवात मनापासून आपलं कॉन्ट्रिब्युशन दिलं आहे, अनेकांनी आपली करियर घडवली, अनेकांनी रेकॉर्डब्रेक डिझाइन्स केली, तर अनेकांनी स्वत:चा हटके युनिकपणा दाखवून दिला. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही लॅक्मे विंटर फेस्टिव्ह सीझन दिल्लीमध्ये मोठ्या उत्साहात आणि जोशात पार पडला, मात्र या वेळी फॅशन वीकच्या सोहळ्याला वेगळीच चमक होती, वेगळाच झगमगाट होता.
लॅक्मे फॅशन वीकचा हा सीझन वेडिंग फेस्टिव्ह सीझन असल्याने कोणत्याही रंगाच्या फॅब्रिकला झगमगाटाचा टच होता. ब्लॅकपासून ते व्हाइटच्या ह्यूजपर्यंत सगळ्या रंगांना सिक्वेन्सची जोड मिळाली. नेटपासून ते सिल्कपर्यंत सगळ्या फॅब्रिक्सनी सिक्वेन्स, बादला वर्क या सगळ्याशी कॉम्बिनेशन करून लॅक्मे फॅशन वीकला चकाकी आणली. साडी, ब्लाऊज, गाऊन, लहंगा, वेस्टर्न, वेस्टर्न फॉर्मल, सगळ्यावरच यावेळी सिक्वेन्स चकाकत होते. केवळ सिंगल सिक्वेन्स स्टोन्स नाही तर सिक्वेन्सच्याच साहाय्याने केलेली एम्ब्रॉयडरी हा यावेळच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. नेटचे ब्लाऊज आणि सिक्वेन्सचे वेगवेगळे पॅटर्न्स हे यावेळचं विशेष पाहायला मिळालेलं डिझाइन.
या फॅशन वीकमध्ये सादर केलेल्या कलेक्शन्समध्ये सिक्वेन्सचे केवळ बूंद किंवा सिंगल स्टोनच्या ऐवजी सुरेख फ्लोरल पॅटर्न्स पाहायला मिळाले. फॅब्रिकवरही फ्लोरल प्रिंट आणि त्यावर फ्लोरल सिक्वेन्स अशा डिझाइन्सनी फॅशन वीक झळाळत होता. नेट किंवा शीअर फॅब्रिकवर प्रिंटच्या ऐवजी नुसतेच सिक्वेन्सचे पॅटर्न्स उठून दिसत होते. सॉलिड फॅब्रिकवर प्रिंट्सच्या अगदी सोबत जाणारे सिक्वेन्स किंवा प्रिंटपेक्षा पूर्णपणे वेगळे असणारे मिसमॅच सिक्वेन्स पॅटर्न्स असे डिझाइन्स असलेले कलेक्शन पाहायला मिळाले.
सिक्वेन्सना सूट होणारे असे काही ठरावीक रंग असतात, हा समज मात्र यावेळच्या फॅशन वीकने मोडून काढला. पेस्टल कलर्सवरही सिक्वेन्स अगदी जडाव केल्यासारखे शोभून दिसत होते. मात्र गेले काही सीझन्समध्ये पाहायला मिळालेला पेस्टल वेडिंग ड्रेसेसचा ट्रेण्ड साधारणत: यावेळी मागे पडलेला दिसला. यावर्षी अधिक ब्राइट कलर्स, रॉयल शेड्सचे कलेक्शन पाहायला मिळाले. रेड ग्लॅम, सफायर ब्लू, एमरल्ड ग्रीन आणि खासकरून ब्लॅक या रंगांना या कलेक्शनमध्ये विशेष पसंती दिली गेली. ब्राऊन, कॉफी, वाइन अशा शेड्समध्येही वेडिंग गाऊन्स सिक्वेन्सनी चकाकताना दिसले. डार्क शेड्समधल्या साड्या, ड्रेप्स आणि गाऊन्स हा जुनाच ट्रेण्ड नव्याने सीझनमध्ये सेट होऊ पाहत होता.
ब्लाऊज किंवा टॉप्स हे ऑफ-शोल्डर किंवा नो-स्लीव्हज प्रकारात जास्त करून पाहायला मिळाले. सिंगल शोल्डर ऑफ हा तर यावेळी अगदीच कॉमन पाहायला मिळालेला पॅटर्न ठरला. स्ट्रीप स्लीव, स्ट्रगिं स्लीव, ब्रेडेड स्लीव अशा अनेक प्रकारच्या स्लीव्हजचे पॅटर्न्सही पाहायला मिळाले. साडी किंवा ड्रेप्स हे यावेळी अधिक ट्रेण्डमध्ये दिसून आले. लहंगाच्या दुपट्ट्यालासुद्धा ड्रेप्समध्ये वापरलं गेलं होतं आणि दुपट्ट्यालासुद्धा सिक्वेन्सचा पॅटर्न होताच. यावेळच्या डिझाइन्समध्ये ड्रेप्स आणि ऑफ-शोल्डर हा खास डिझाइन पॉइंट पाहायला मिळाला. सर्वसाधारणपणे ड्रेप्स हा प्रकार वेस्टर्न किंवा फ्युजन प्रकारासाठी सर्रास वापरला जातो. मात्र, वेडिंगसाठीच्या भरजरी कलेक्शनमध्येही ड्रेपिंगचा झालेला शिरकाव हा नवाच प्रयोग म्हणायला हवा. अनेकदा वेडिंग कलेक्शनवरही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या फॅशनचा प्रभाव पाहायला मिळतो. यंदा सिक्वेन्स, ड्रेपिंग यांचा वेडिंग कलेक्शनवरचा प्रभाव पाहता त्याची पुन्हा प्रचीती आली.
मेन्स कलेक्शननेसुद्धा यावेळी सिक्वेन्स पाहिले. मेन्स कुर्ता, बॉटम्स, जॅकेट्स, फेस्टिव्ह शर्ट्स अशा सगळ्यावर सिक्वेन्स वर्क पाहायला मिळाले. कधी अॅबस्ट्रॅक्ट पॅटर्न तर कधी जिओमेट्रिक पॅटर्नमध्ये सिक्वेन्स हे मेन्स वेअर डिझाइनमध्ये शिरले आहेत. मेन्सच्या कॅज्युअल – फॉर्मल बॉटम्स किंवा शर्ट्सवरही कमी अधिक प्रमाणात सिक्वेन्स दिसून आले. फॉर्मलचा एलिगन्स कायम ठेवायचा, तरीही त्याला फेस्टिव व्हाइब्स देण्यासाठी केलेला हा सिक्वेन्सचा उपयोग काही वेगळेच कॉम्बिनेशन ठरला आहे. यावेळच्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये मेन्स वेअरची डिझाइन्स नेहमीपेक्षा अधिक रॅम्पवर पाहायला मिळाली.
या सगळ्या कलेक्शनमध्ये अत्यंत महत्त्वाचा कॉमन धागा होता तो म्हणजे विचारपूर्वक केलेल्या डिझाइन्सचा. मेन्स वेअर असो, विमेन्स वेअर असो, हेअरस्टाइल असो, अॅक्सेसरीज असोत, सगळ्याच्या मागे यावेळी डिझायनर्सनी खूप जास्त विचार केल्याचं आपसूकच लक्षात येत होतं. सस्टेनेबिलिटी, ड्युरेबिलिटी, वेअरेबिलिटी या सगळ्याचा संपूर्ण विचार करून डिझाइन्स केली गेल्याचं यावेळी दिसून आलं. वेअरेबल नसलेली किंवा इम्प्रॅक्टिकल डिझाइन्स केवळ रॅम्पवर सादर करण्यापुरती म्हणून अशी या सीझनला केली गेली नाहीत. कन्झ्यूमर बेसचा विचार करून, प्रॅक्टिकॅलिटी लक्षात घेऊन डिझायनर्सनी यावेळी लॅक्मे फॅशन वीकमध्ये अधिक वेअरेबल डिझाइन्स आणली. या विचारांचा प्रभाव लॅक्मे फॅशन वीकच्या सर्वच डिझायनर्सवर दिसून आला. वेडिंग किंवा फेस्टिव्ह व्हाइब्स देणारे ब्राइट आणि डार्क कलर्स यावेळी वापरून डिझायनर्सनी संपूर्ण सीझनची कलर थीमच बदलून टाकली. अनेक डिझायनर्सनी आपले ट्रॅडिशन्स लक्षात घेत, त्यांचा विचार करत, त्यांना जपत, त्यांचा वापर करत आपल्या कलेक्शनची थीम ठरवली होती.
डिझायनर्सनी केलेला विचार, त्यातून बदललेले ट्रेंड्स आणि त्यातून तयार होणारं नवीन सीझनचं मार्केट या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन लॅक्मे फॅशन वीकला सोहळा, उत्सव हे म्हणणं अगदी सयुक्तिक ठरतं.
viva@expressindia.com
