“राकेश, मला तुझं अजिबात पटलेलं नाहीये, आत्ता कर्ज काढून नवीन कार घेण्याची काहीच आवश्यकता नव्हती, तुला कसेही आणि कुठेही पैसे खर्च करण्याची वाईट सवय आहे.” “ मी कधीही फालतू खर्च करत नाही, गाडीचं नवीन मॉडेल खरेदी करायचं, हे मी केव्हापासून ठरवलं होतं, माझं स्वप्न होतं ते, तुला तो फालतू खर्च वाटतो.” “तुझं स्वप्न तू नक्की पूर्ण कर, पण कर्ज काढून कशाला?” “मिनू तू वेडी आहेस का? अगं असं सगळं पैसे साठवून खरेदी करायचं म्हटलं तर, आपलं आयुष्य असंच जाईल. हल्ली सर्वचजण घर, कार आणि किंमती वस्तू कर्ज काढूनच घेतात आणि माझ्याकडं कर्ज फेडण्याची क्षमता आहे, म्हणून मी कार लोन घेतलं आहे आणि ते मीच फेडणार आहे, तू त्याची काळजी करू नकोस. ” हेही वाचा - Gitika Talukdar : पुरुषांची मक्तेदारीअसलेल्या क्षेत्रात गीतिकाची भरारी; Paris Olympic कव्हर करणारी ठरली भारतातील पहिली महिला फोटोग्राफर! “अरे, आपली सरकारी नोकरी नाही, आपल्या आयटी क्षेत्रात कधी मंदी येईल आणि केव्हा आपली नोकरी जाईल हे काही सांगता येतं का? उद्या नोकरी गेलीच, तर तू लोन कसं फेडणार?” “मिनू, एक नोकरी गेली तरी दुसरी मिळतेच, मी काय तसाच बसून राहणार आहे का?” “कपडे बदलावेत, तशा तू नोकऱ्या बदलल्या आहेस. एका ठिकाणी टिकत नाहीस. म्हणूनच तर मला भीती वाटते.” “जर मला वेगवेगळ्या संधी मिळाल्या तर त्याचा उपयोग का करायचा नाही? आणि असं एकाच नोकरीत राहणं म्हणजे डबक्यात राहण्यासारखं आहे.” “मी एकाच नोकरीत आहे म्हणजे मी डबक्यात आहे, ऋण काढून सण करण्याची तुझी सवय ती चांगली, सतत अस्थिर आयुष्य जगण्याची तुझी सवय चांगली, इन्व्हेस्टमेंट करताना मी ज्या माझ्या मुदतठेव वाढवते ते अयोग्य आणि सट्टा जुगार खेळल्यासारखे शेअर मार्केटमधील तुझी इन्व्हेस्टमेंट योग्य. मला काही कळत नाही. सगळं काही तुलाच कळतं. आपले विचार फारच वेगळे आहेत. कायम मतभेद होत असतात आपल्यात. आपण एकत्र न राहिलेलं चांगलं.” “मिनू मलाही तुझ्यासोबत राहणं अवघड वाटतंय. सुतावरून स्वर्ग गाठण्याची तुला सवयच लागली आहे.” दोघांचे वाद चालूच होते तेवढ्यात शुभा मावशी घरात आली, तिनं दोघांचंही बोलणं ऐकलं होतं. ती आल्याबरोबर राकेश तिला म्हणाला, “बघितलंस मावशी, आज पुन्हा मिनू माझ्याशी भांडली. कोणत्याही कारणावरून चिडते.” “मी उगाचंच चिडत नाही, राकेश वागतोच तसा म्हणून मला चीड येते.” “अरे, काय हे लहान मुलांसारखं भांडता? तुमच्या भांडणाला कोणतंही कारण पुरतं. आता जरा जबाबदारीनं वागायला शिका.’’ मावशी समजावून सांगत होती. शुभा मावशीनं समजावून सांगितलं की, दोघांना पटायचं. पुन्हा कधीही क्षुल्लक कारणावरून भांडायचं नाही असं दोघेही ठरवायचे, पण पुन्हा काही न काही करणावरून वाद व्हायचेच. म्हणून आज राकेशन विचारलं, “मावशी, आमच्यात अशी वारंवार भांडण का होतात?” शुभा मावशीला हे दोघांशी एकदा बोलायचंच होतं. “राकेश आणि मिनल, अरे प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. प्रत्येकाच्या स्वभावाचे स्ट्रक्चर वेगळं तयार झालेलं असतं. बालपणी झालेलं संगोपन, संस्कार आणि अनुभव यामुळं काही गोष्टी मनात घट्ट रुजून रहातात आणि त्यातून एक मनोधारणा तयार झालेली असते. आता तुमच्या आजच्या भांडणाबाबत विचार केला तर ‘कर्ज काढणं वाईट असतं,’ असे संस्कार मिनल तुझ्या मनात घट्ट रुजलेले आहेत आणि ‘आयुष्यात पुढं जायचं असेल तर धोका पत्करावा लागतो,’ असे संस्कार राकेश तुझ्या अबोध मनात घट्ट रुजलेले आहेत. व्यक्तीचे वर्तन आणि पॅटर्न तसाच घडत गेल्याने आपल्या अपेक्षेला दुसऱ्याच्या वागण्याने छेद दिला की संघर्ष होतो.” “मग अशावेळी काय करायला हवं?” “दोघांनी एकमेकांच्या स्वभावाचे स्ट्रक्चर ओळखून माझ्यापेक्षा जोडीदाराचे विचार वेगळे असू शकतात, याचा स्वीकार केला पाहिजे आणि त्याचा आदरही केला पाहिजे. ‘आपलंच ऐकायला हवं’ हा हट्ट सोडायला हवा आणि महत्वाचं म्हणजे सध्याच्या परिस्थितीत कोणता निर्णय घ्यायचा याबाबत एकमेकांशी संवाद साधून भावनांमध्ये न अडकता व्यवहारिक निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे म्हणजे मतांतरे असली तरी वाद कमी होतील. थोडक्यात, मिनलचं म्हणणं तिच्या धारणेनुसार बरोबर असलं तरी सद्य परिस्थितीत कर्ज घेणं महत्वाचं आणि फायद्याचं कसं आहे हे शांतपणे राकेशनं मिनलला समजावून सांगायला हवं.’’ हेही वाचा - कर्णम मल्लेश्वरी ते मनू भाकर! ऑलिम्पिकमध्ये ‘या’ ८ महिला खेळाडूंनी देशाला जिंकून दिली पदकं मनोव्यवहारांचं विश्लेषण कसं करायचं? हे शुभा मावशी दोघांना समजावून सांगत होती. मिनल आणि राकेशच्या लक्षात आलं की, आपल्यातील पूरक संवाद हरवले आहेत आणि केवळ छेदक संवाद वाढलेले आहेत. खरं तर त्यामुळंच भांडण होतात. यापुढं तरी दोघांनी एकमेकांच्या स्वभावाचे स्ट्रक्चर समजावून घ्यायला हवं असं त्यांनी ठरवलं. (लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.) (smita joshi606@gmail.com)