सोसायटीतील सर्वांनी एकत्र येऊन यंदाही कोजागिरी साजरी करायची, असं एकमतानं ठरलं होतं, आपल्या चालीरीती परंपरा नवीन पिढीला समजाव्यात म्हणून विविध कार्यक्रम करायचेच असं सोसायटीच्या कार्यकारी मंडळानं ठरवलं होतं त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेसाठी सर्वजण उत्साहाने तयार झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरं तर सोसायटीतल्या सगळ्यांच कार्यक्रमात सुनंदाताई मोठ्या उत्साहाने सहभागी होतात, परंतु यावेळी तेवढ्या उत्साहाने त्यांचा सहभाग नाही हे अनिताताईंच्या लक्षात आलं, म्हणूनच त्या म्हणाल्या

“सुनंदा, अगं आज तू नेहमीसारखी कार्यक्रमात भाग घेत नाहीयेस. काय झालंय? अशी उदास का?”

“अनिता, तू फक्त माझी शेजारीण नाहीस तर माझी जवळची मैत्रीणही आहेस, म्हणून तुला सांगते. सोसायटीतील सर्वांशी मी कशी वागते हे तुलाही चांगलंच माहिती आहे, सोसायटीतील, नातेवाईकांमधील कोणताही कार्यक्रम माझ्याशिवाय पूर्ण होत नाही, प्रत्येक कार्यक्रमात माझा सहभाग असतोच,सर्वजण आवर्जून मला बोलावतात, पण माझी सून नेहा, हिचं म्हणणं मी सर्वांच्या फार पुढंपुढं करते, नाटकी वागते. तिचे नातेवाईकही माझ्याशी चांगले वागतात, मला आवर्जून फोन करतात. तेही तिला आवडत नाही. स्वयंपाक, घरकाम यात तिची मदत नसते, सर्वकाही मीच पाहते, तरीही हिच्या तक्रारी असतातच. असंच एका किरकोळ गोष्टीवरून वाद झाला आणि आता ती वेगळंच राहायचं, असा हट्ट धरून बसली आहे. सौम्या अजून छोटी आहे, नेहा स्वतःचा जॉब करून सौम्याला कशी सांभाळणार? असं घर तोडलं तर लोक काय म्हणतील? नातेवाईकांमध्ये काय चर्चा होईल? तूच सांग, मी एवढी वाईट सासू आहे का? सगळं तिच्या कलानं घेऊनही ती अशी का वागते? माझा एकुलता एक मुलगा ती माझ्यापासून तोडू पाहते आहे, किती कष्ट करून,कर्जपाणी करून नवीन घर बांधलं, नितीनला चांगलं शिक्षण दिलं, मोठा खर्च करून लग्न करून दिलं आणि आता मुला-नातवंडांसोबत आनंदानं दिवस काढायचे असं स्वप्न बघितलं तर ही घर फोडायला निघाली आहे, मी नितीनला सांगितलं आहे, ‘तुझ्या आईला सोडून जाऊ नको’ आणि ती म्हणते, ‘आपण वेगळं घर केलं तरच मी तुझ्यासोबत राहीन.’आता त्याला आई महत्वाची की बायको हे त्यानेच ठरवायचंय.”

हेही वाचा… जोडीदाराची उत्पन्न क्षमता आणि देखभाल खर्च

“सुनंदा, तू समजूतदार आहेस, मग हा हट्ट कशासाठी करतेस? हे बघ, प्रत्येक स्त्रीला स्वतःचं घर हवं असतं, स्वतःचा संसार तिला स्वतः फुलवायचा असतो. थोडं स्पष्टचं बोलते,पण तुझ्या किचनमध्ये कुणीही लुडबूड केलेली तुला अजूनही चालत नाही. सर्वकाही तुझ्याच पद्धतीनं हवं असतं त्यामुळं तू घरातील- विशेषतः किचनमधील सर्व जबाबदाऱ्या, तुला कितीही त्रास झाला तरीही स्वतःकडेच घेतेस. त्यामुळं नेहा तुला मदत करण्याच्या भानगडीत पडत नाही, सर्व कामं परस्पर होतात, तिच्याही पथ्यावरच पडतं ते. पण जेव्हा सर्वजण तुझंच कौतुक करतात, तेव्हा कळत नकळत तिचंही मन दुखावलं जातं. आपल्यासमोर दुसऱ्या स्त्रीचं कौतुक झालं, की आपलं मन दुखावलं जातं हा स्त्रीसुलभ स्वभाव आहे, त्यामुळं तिलाही तिचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं आहे. मुलगा तुझ्यापासून लांब राहिला तर, लोक काय म्हणतील? सासूने सुनेला समजावून घेतलं नाही, असं समजून तुला दोष लावतील, असं तुला वाटतंय आणि म्हणून तू एकत्रच राहण्याचा अट्टाहास करत आहेस. तुम्ही दोघीही वेगळ्या राहिलात, तर तुलाही तुझं स्वातंत्र्य मिळेल आणि तिलाही तिचं स्वातंत्र्य मिळेल. ‘नेहाला काय वाटेल?’ याचा विचार करून कित्येक गोष्टी तुलाही करता येत नाहीत, एक प्रकारचं दडपण तुझ्या मनावरही असतं, त्यामुळं मुलांचा निर्णय आता मुलांना घेऊ देत. त्यांच्या मुलीची जबाबदारी त्यांना घेऊ देत. जबाबदारीची जाणीव त्यांनाही होऊ देत.”

हे बघ सुनंदा, आता त्यांनाही जबाबदारीची जाणीव नको का व्हायला? नितीननं यापुढंही एकत्रच राहण्याचा निर्णय घेतला तरीही किचनपासून अलिप्त होण्याचा प्रयत्न कर. हे घरं आपलंही आहे, याचा फिल नेहलाही येणं गरजेचं आहे आणि नितीनला असं कोंडीत पकडू नकोस. त्यानं नेहासोबत स्वतंत्र राहाण्याचा निर्णय घेतला तरीही त्याला अडवू नकोस. लांब राहून नाती तुटत नाहीत, शरीराने लांब गेलं तरी मनं जवळ येतात. माणसाची किंमत कळते. कोणत्याही गोष्टीचा मनाला त्रास करून घेऊ नकोस. मुलांना त्यांचे निर्णय घेऊ देत.”

अनिताताईंच्या बोलण्याचा सुनंदाताईं अंर्तमुख होऊन विचार करीत होत्या. मुलांनी आपल्या सोबतच राहावं असा आग्रह धरून नितीनला वेठीस धरण्यात आपण चुकतो आहोत आणि याचा त्यालाही त्रास होत असणार याची जाणीव त्यांना झाली आणि हसतमुखाने या प्रसंगाला सामोरं जायचं असं त्यांनी मनोमन ठरवलं.

(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत.)
(smitajoshi606@gmail.com)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Counselling relation between daughter in law and mother in law responsibility of kitchen house and relatives dvr