संपदा सोवनी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूर्वी ‘क्रॉप टॉप’ अर्थात उंचीला बऱ्यापैकी आखूड असलेले टॉप्स घालणं हे केवळ ‘फॅशन फॉरवर्ड’ लोकांचंच काम, असं समजलं जायचं. जीन्स, वाईड लेग्ड पँट, पलाझो किंवा ट्राउझरवर क्रॉप टॉप घालून एक छान ‘लूक’ मिळतो, हे खरं आहे. पण आखूड टॉप घातल्यावर पोट दिसतं आणि अशी फॅशन सर्वजणींनाच आवडेल किंवा कम्फर्टेबली मिरवता येईल असं नाही. त्यामुळे अनेक मुली आणि स्त्रिया क्रॉप टॉप या प्रकारापासून सहसा दूरच राहायच्या. आता मात्र क्रॉप टॉप हा केवळ जीन्स किंवा पँटवर घालायचा टॉप राहिलेला नाही. त्यानं साडी, लेहंगा आणि स्कर्टवर घालण्यासाठी स्थान मिळवलं असून ही फॅशन सध्या ‘ट्रेन्डिंग’मध्ये दिसते.

क्रॉप टॉपचं वैशिष्ट्य काय?

क्रॉप टॉप हे उंचीला ‘क्रॉप्ड’ असले, तरी त्यांचं फिटिंग साडीवरच्या ब्लाउजसारखं अंगाबरोबर घट्ट बसणारं नसून टॉपसारखं असतं. शिवाय त्यांची उंची साडीवर शिवून घेतल्या जाणाऱ्या ब्लाउजपेक्षा निश्चतच थोडी अधिक असते, शिवाय कमी पोट दिसणारे क्रॉप टॉपही मिळतात. अनेक क्रॉप टॉप्सचा मागचा गळा पूर्ण बंद असतो. काही वेळा शिवून घेतलेल्या ब्लाउजचं अस्तर टोचतं. ज्या नव्या मुलींना साडी नेसणं फारसं कम्फर्टेबल वाटत नाही, त्यांना हे क्रॉप टॉप साडीवर घातल्यावर कम्फर्ट मिळतो. लेहंगा किंवा स्कर्टचंही तेच. या टॉप्सचं काकणभर ‘लूज’ असलेलं फिटिंग लेहंगा आणि स्कर्टवर घातल्यावरही उत्तम दिसतं. लेहंग्यावर शिवले जाणारे ब्लाउजसुद्धा घट्ट असतात. त्यामुळे काहीजणी लेहंगा-चोळीवर ओढणी घेतात. क्रॉप टॉपवर ओढणी घ्यायची गरज नसते आणि आधुनिक-पारंपरिक असा मिश्र लूक मिळतो.

क्रॉप टॉप्समध्ये प्रकार अनेक

क्रॉप टॉपमध्ये कापडानुसारच नव्हे, तर इतरही अनेक विशेष प्रकार मिळतात आणि त्यामुळेच ते ‘ट्रेन्डी’ दिसतात.
उदा.

  • स्मॉकिंगचे क्रॉप टॉप- हे गरजेनुसार अंगाबरोबर बसतात आणि फारच छान दिसतात. साध्या ब्लाउजमध्ये स्मॉकिंगचं काम फारच क्वचित दिसतं.
  • टीशर्टच्या कापडाचे क्रॉप टॉप अथवा टीशर्टसारख्याच ‘रिब्ड’ कापडाचे क्रॉप टॉप- हेही अंगाबरोबर बसतात आणि साडीवर उत्तम दिसतात. फक्त साडीची पिन जरा काळजीपूर्वक लावावी लागते.
  • गळ्यांचे चौकोनी आकार किंवा मँडरिन कॉलर- असे गळे साडी वा लेहंग्यावरच्या ब्लाउजमध्ये कमी प्रमाणात शिवले जातात.
  • बारडॉट क्रॉप टॉप- याच्या बाह्या खांद्यावर उरलेल्या असतात. ही फॅशन फारच स्टायलिश दिसते आणि तुलनेनं कम्फर्टेबल आहे.
  • टॉपच्या मागच्या गळ्यांमध्ये विविध प्रकार मिळतात. उदा. बंद गळा, ‘स्टाइल्ड बॅक’ किंवा मागे ‘नॉट’ बांधण्याची फॅशन.
  • शर्ट स्टाईल- स्टायलिश लूक देणारा.

किंमत हा महत्त्वाचा मुद्दा

साडीवर किंवा लेहंग्यावर ब्लाउज शिवून घेताना जराशी वेगळी फॅशन करायला सांगितली, पुढचा किंवा मागचा गळा स्टायलिश शिवला किंवा अस्तर लावून ब्लाउज शिवला, तर त्याची शिलाई भरपूर होते. क्रॉप टॉप मात्र ऑनलाइन शॉपिंग साइटस् वर अगदी २००-३०० रुपयांपासून मिळतात. कॉटनचे चांगल्या दर्जाचे साडी, लेहंग्यावर कम्फर्टेबल होतील असे क्रॉप टॉपसुद्धा ३०० ते ३५० रुपयांपासून आहेत. त्यामुळे एकाच ब्लाउजच्या शिलाईवर खूप पैसे घालवण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळे क्रॉप टॉप ‘ट्राय’ करू शकता.

नवरात्रीचं निमित्त!

नवरात्रीत गरबा, दांडिया कार्यक्रमांना अनेक मुली, स्त्रिया आवर्जून लेहंगा-चोळी, चनिया-चोळी घालतात. या नऊ दिवसांत रोज साडी नेसणाऱ्याही खूपजणी आहेत. क्रॉप टॉप घालून वेगवेगळ्या प्रकारे फॅशन करण्यासाठी हे उत्तम दिवस आहेत. लेहंग्यावरच नव्हे, तर दांडिया कार्यक्रमांना जाताना स्कर्टवरही क्रॉप टॉप घालता येईल. पलाझोवर तर क्रॉप टॉप छान दिसतातच. मग काढा तुमचे ठेवणीतले लेहेंगे, स्कर्ट आणि साड्या. नवीन क्रॉप टॉप्स त्यावर ‘मिक्स अँड मॅच’ करा, म्हणजे नवरात्रीतल्या कार्यक्रमांसाठी तुम्ही तयार!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crop top on saree and lehenga dpj