केतकी जोशी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्यापैकी बहुतेकांनी लहानपणी काठीचा घोडा करुन खेळ खेळला असेल. मोठं झाल्यावर घोडेस्वार होण्याचं स्वप्नंही अनेकांनी पाहिलं असेल. मात्र नंतर शिक्षण, नोकरी, करियरमध्ये तो घोडा हरवून जातो. घोड्यावर बसण्याची हौसही कधीतरी फिरायला जाण्यापुरतीच मर्यादित राहते. पण राजस्थानच्या एका तरुणीनं मात्र आपली घोड्यावर बसण्याची, घोडेस्वारीची आवड अशी जोपासली, की त्यातल्या कामगिरीमुळे तिनं आपल्या देशाचं नाव जगभरात उंचावलं आहे. ती आहे दिव्यकृती सिंह. दिव्यकृती हिचं नाव भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं आहे, कारण घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवलेली ती पहिला महिला खेळाडू ठरली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनातील भव्य सोहळ्यात दिव्यकृतीला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गेल्या काही वर्षांपासून भारताच्या अनेक महिला खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेत. पण घोडेस्वारीसारख्या खेळात मात्र महिला फारशा पुढे येताना दिसत नाहीत. दिव्यकृतीनं हा अवघड खेळप्रकार आत्मसात केला आहे. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर दिव्यकृतीनं आशियाई गेम्समध्ये भारतासाठी घोडेस्वारीमध्ये सुवर्णपदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली. तिच्या या सुवर्णपदकामुळे भारताचा घोडेस्वारीमधील ४१ वर्षांचा दुष्काळ संपला. याच दैदीप्यमान कामगिरीमुळे तिला मानाचा अर्जुन पुरस्कार देण्यात आला.

आणखी वाचा-जागतिक दर्जाची टेनिसपटू ते अनेक कंपन्यांची ब्रॅण्ड अम्बॅसिडर, सानिया मिर्झाची संपत्ती माहितीय का?

दिव्यकृती सिंह ही मूळची राजस्थानची. राजस्थानमधील डीडवाना-कुचामन जिल्ह्यातील पीह हे तिचं गाव. घोडेस्वारीची आवड आणि त्यातील नैपुण्य या दोन्हीचा वारसा तिला तिच्या वडिलांकडून मिळाला. तिचे वडील विक्रम सिंह राठोड राजस्थानच्या पोलो संघाशी निगडित आहेत. अजमेरच्या मेयो कॉलेज गर्ल्स स्कूलमधून दिव्यकृतीनं शालेय शिक्षण, तर दिल्ली विद्यापीठाच्या जीझस अँड मेरी कॉलेजमधून तिनं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. आपल्या मुलीची घोडेस्वारीमधील आवड पाहून तिच्या वडिलांनी तिला रीतसर प्रशिक्षण द्यायचं ठरवलं. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर घोडेस्वारीच्या प्रशिक्षणासाठी दिव्यकृती युरोपमध्ये गेली. नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रिया इथं तिनं घोडेस्वारीतील प्रशिक्षण घेतलं. गेल्या तीन वर्षांपासून दिव्यकृती जर्मनीत घोडेस्वारीचं प्रशिक्षण घेत आहे. तिनं सौदी अरेबियात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वैयक्तिक गटामध्ये दोन रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवलं आहे. त्यामुळे आशियाई स्पर्धेच्या आधी तिचा आत्मविश्वास वाढला होता. मार्च २०२३ पर्यंत आंतरराष्ट्रीय घोडेस्वार संघटना व फेडरेशनच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या ग्लोबल रिसर्च रँकिंगमध्ये तिला आशियातील क्रमांक एक आणि जागतिक स्तरावर १४ वं स्थान देण्यात आलं होतं. २०२२ च्या आशियाई गेम्ससाठी दिव्यकृतीची निवड झाली नव्हती, त्यामुळे ती निराश झाली. पण तिनं हार मानली नाही. सराव सुरुच ठेवला. २०२३ च्या आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावून आपली योग्यता तिनं दाखवून दिली.

आणखी वाचा-तब्ब्ल ‘१६’ सरकारी नोकऱ्या नाकारून, पहिल्याच फटक्यात UPSC परीक्षेत उत्तीर्ण होणारी ‘ही’ IPS अधिकारी कोण? जाणून घ्या…

दिव्यकृती खेळत असलेला खेळ हा अवघड आणि अजून तरी महिला खेळाडूंसाठी फारसा लोकप्रिय आणि सरावाचा नाही. त्यासाठी लागणारा खर्च ही महत्त्वाची बाब आहेच, पण त्याशिवाय कुटुंबाचा पाठिंबा आणि त्यांचा विश्वास हेही महत्त्वाचं आहे. घोडेस्वारी करताना लागलं तर काय, असा विचार अजूनही अनेक घरांत केला जातो. त्यामुळे इच्छा असूनही अनेक मुलींना हा खेळ पुढे खेळता येत नाही. दिव्यकृती याबाबत सुदैवी आहे. पण तरीही तिलाही अनेकदा वैयक्तिक पातळीवर संघर्ष, तडजोड करावी लागली आहे. तिच्या घरच्यांचा तिला भक्कम पाठिंबा आहे. त्यामुळे ती खेळावर लक्ष केंद्रित करु शकते. तिच्या खेळासाठी लागणारं अत्याधुनिक प्रशिक्षण तिला मिळावं यासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी तिच्या वडिलांनी त्यांचं राहतं घरही विकलं होतं असं सांगितलं जातं. मात्र आपल्या आईवडिलांचा विश्वास आणि संघर्षाचं दिव्यकृतीनं चीज केलं. प्रशिक्षणातील सातत्य तिनं कायम ठेवलं आणि कौशल्य सुधारण्यावर भर दिला. त्याचाच परिणाम म्हणजे जागतिक स्तरावर घोडेस्वारीमध्ये भारताचं नाव चमकू लागलं आहे.

दिव्यकृतीचा अर्जुन पुरस्कारापर्यंतचा प्रवास हा फक्त तिच्या एकटीचा नाही, तर तो प्रवास आहे आपल्या मुलीच्या खेळातील ‘पॅशन’ला करियरमध्ये रुपांतरित करण्यासाठी मिळणाऱ्या कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्याचा. प्रवास आहे चिकाटीचा, मेहनतीचा, सरावाचा, सातत्याचा आणि अनवट वाटेवर चालूनही आपण आपल्या देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करु शकतो या विश्वासाचा!

lokwomen.online@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Divyakriti singh is the first woman athlete to win the arjuna award in equestrian mrj