“हाऊ डेअर ही, टू आस्क धीस क्वेश्चन टू मी? समजतो कोण हा स्वतःला? अरे, मला माझी प्रायव्हसी आहे की नाही? माझ्या १२ वर्ष जुन्या मित्रासोबत मी डिनरलाही जाऊ शकत नाही? प्रत्येक गोष्ट मी याला विचारून करायची? ”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ओवीची चिडचिड चालू होती. तिचा राग शब्दांवाटे बाहेर पडत होता. ओंकार आणि ओवी यांची गेल्या २ वर्षांपासून ओळख होती. दोघंही एकाच कॉलेजमध्ये होते. दोघांचाही ग्रुप एकच असल्याने कॉलेजच्या विविध उपक्रमांच्या निमित्ताने ओळख अधिक वाढली. एकमेकांसोबत सहवास वाढला आणि दोघंही एकमेकांच्या खूप जवळ आले. कॉलेज संपलं, दोघांचंही स्वतंत्र करिअर सुरू झालं होतं, पण एकमेकांना भेटल्याशिवाय त्यांना चैन पडत नव्हती. त्यांची आता फक्त मैत्री राहिली नव्हती, तर नातं मैत्रीच्या पलीकडे गेलं होतं. दोघंही एकमेकांचे चांगले मित्र आहेत हे दोघांच्याही घरी माहिती होतं आणि त्यांचं नातं पुढं जाण्यासाठी दोन्ही कुटुंबाकडून काहीच हरकत नव्हती.

आयुष्याचा साथीदार या नजरेने आता दोघंही एकमेकांकडे पाहू लागले होते. लवकरच आपला निर्णय आपल्या आईवडिलांना सांगायचा असा विचार दोघांचाही झाला होता, पण परवाच्या घटनेनंतर ओवी चांगलीच चिडली होती. ओंकार आपल्याला आयुष्यात पुढं जाऊ देणार नाही, प्रत्येक गोष्टीत तो अडवणार, आपल्यावर संशय घेणार असं तिला वाटायला लागलं.

हेही वाचा… जी-२० परिषद: परदेशी पाहुण्यांच्या संरक्षणाची जबाबदारी महिला कमांडोंकडेही! 

त्याचं असं झालं की, ओवी रात्री तिच्या एका जुन्या मित्रासोबत डिनरसाठी बाहेर गेली होती. ती जाणार आहे याबद्दल तिनं ओंकारला काहीही सांगितलं नव्हतं आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या एका मित्राकडून त्याला ते समजलं. “मला न सांगता तू त्या मित्रासोबत एकटी डिनरला का गेलीस? किमान मला सांगायला तरी हवं होतंस,” हे ओंकारचं बोलणं तिला अजिबातच आवडलं नाही. दोघांचंही या गोष्टीवर चांगलंच वाजलं. आपलं काही चुकतंय हे दोघांनाही वाटत नव्हतं. ओवीने तर आईला सांगूनच टाकलं, “ आई, मी आता यापुढं ओंकारला कधीही भेटणार नाही. आमचं नातं इथंच संपलं. ज्या व्यक्तीला होणाऱ्या जोडीदाराबद्दल विश्वास नाही, अशा व्यक्तीसोबत आयुष्य काढण्याचा मी विचारही करू शकत नाही. मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि माझे निर्णय मी घेणार.“मी असं का केलं?” माझे आईवडील कधी मला विचारत नाहीत, आणि हा कोण आला मला विचारणारा? मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे, मी कुठं जावं? काय करावं? कुणाशी बोलावं आणि कुणाशी बोलू नये, हे माझं मी ठरवणार. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात कुणाचंही वर्चस्व मी सहन करू शकत नाही, म्हणूनच त्याच्याशी नातं कायमचं संपवायचं, असं मी ठरवलं आहे.”

ओवीचा राग आई समजू शकत होती. तिला वाढवताना त्या दोघांनी तिला आत्तापर्यंत पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. तिचे स्पोर्ट्स, ट्रेकिंग, नाटकात वेगवेगळ्या भूमिका करणं, मित्र-मैत्रिणींसोबत ट्रिपला जाणं, विविध उपक्रमात सहभागी होणं याबाबत त्यांनी कधीही तिची अडवणूक केलेली नव्हती. असं का? असा प्रतिप्रश्नही कधी केलेला नव्हता आणि ओंकार तिला असं विचारतो म्हटल्यावर तिला राग येणं साहजिकच होतं. पण दुसऱ्याच्या भावना समजावून न घेता एवढ्याशा गोष्टीवरून नातंच कायम तोडून टाकायचं हेही योग्य नाही. आयुष्यात आपल्याला हवं तसंच सगळं मिळतं असं नाही, त्यामुळं आपल्या मनाविरुद्ध कोणी वागलं तर त्याच्याशी नातं तोडून टाकण्याचा उतावीळपणा योग्य नाही आणि ही समज तिला देणं गरजेचं होतं, आईने तिच्याशी चर्चा केली.

हेही वाचा… कामजिज्ञासा: मला इच्छाच होत नाही सेक्सची काय करू? 

“ओवी बेटा, ओंकारचं वागणं-बोलणं तुला पटलं नाही, पण त्याचीही काहीतरी बाजू असेलच ना? तुमचं नातं पुढं जाण्यापूर्वी त्यानं तुझ्याबाबतीत पझेसिव्ह व्हायला नको, तुझ्यावर हक्क दाखवायला नको, हे बरोबरच आहे, पण तुला या गोष्टी आवडणार नाहीत हे तू त्याला स्पष्टपणे सांगायला हवंस तो असा का बोलला? त्यामागे त्याची काळजी आहे की हक्क दाखवणं आहे हेही तू समजावून घ्यायला हवं. तुझ्यापेक्षा वेगळ्या वातावरणात तो वाढला आहे, त्याची जडणघडण वेगळ्या पद्धतीनं झालेली आहे. एखादया घटनेवरून त्या व्यक्तीला दोष लावणं किंवा त्याच्याबद्दल पूर्वग्रह मनात बाळगणं योग्य नाही. कोणताही व्यक्ती परिपूर्ण नाही, काही दोष त्याच्यात असतील, काही तुझ्यातही असतील पण एखादया व्यक्तीला लाइफ पार्टनर म्हणून निवडायचं असेल तर त्याच्या गुण दोषांसह स्वीकारायला हवं. एकमेकांच्या चुका माफ करण्याची मानसिक तयारी व्हायला हवी. तुम्हां मुलांना नातं जोडण्याचीही घाई आणि नातं तोडण्याचीही घाई. पण नातं निभावणं म्हणजे काय ते शिकायला हवं, ‘ओंकार असाच आहे,’ असा शिक्कामोर्तब करू नकोस, त्याला समजावून घ्यायला वेळ दे.”

ओवीला आईचं म्हणणं कळतं होतं, पण वळत नव्हतं. तरीही या गोष्टीचा विचार करण्याची आणि ओंकारशी पुन्हा बोलण्याची तिची मानसिक तयारी झाली होती. ती उद्याच ओंकारशी बोलणार होती.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smita joshi606@gmail.com)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In todays scenario challenges of marriage break up and maintaining the relationships dvr