ठरवलं तर एखादी स्त्री कोणत्याही वयात कोणत्याही टप्प्यावर नवा मार्ग निवडू शकते. स्वत:वर विश्वास ठेवला की काहीही अशक्य नाही. याशिवाय स्वत:शीच संवाद साधणंही आहे. यामुळे नकारात्मकता टाळून ध्येय साध्य व्हायला प्रोत्साहन मिळतं.
आपलं शरीर सुदृढ, बांधेसूद असावे असे प्रत्येक स्त्री-पुरुषाला वाटत असतं. त्यासाठी आजचे तरुण-तरुणी आवर्जून स्वत:साठी वेळ देताना दिसतात. योगासनं करणं, जिमला जाणं, व्यग्र दिनचर्येतून आपल्या देहयष्टीची काळजी घेण्याकडे काही जणांचा कल असतो. मात्र लग्न झालेल्या गृहिणींची इच्छा असूनही स्वत:साठी वेळ मिळतोच असं नाही, त्यातही सर्वसामान्य गृहिणींना तर तारेवरची कसरत करत स्वयंपाक, मुलांचा सांभाळ, इत्यादी जबाबदाऱ्या सांभाळत फारच कमी वेळ मिळतो. यामुळेच त्या त्यांची देहयष्टी सुदृढ ठेवण्याकडेही पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत, पण एका गृहिणीनं इतर स्त्रियांप्रमाणे घरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत आपलं इच्छित ध्येयही साध्य केलं आहे.
किरण देंबला असं या गृहिणीचं नाव आहे. ती मूळची हैदराबादची. लहानपणापासून तिला संगीताची आवड. त्यामुळे तिनं शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. लग्नानंतर ती नोकरी न करता पूर्णवेळ गृहिणी म्हणून राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन मुलांचा सांभाळ आणि संसार यामध्येच ती इतकी गुंतून गेली की, तिला स्वत:साठी वेळच मिळत नसे. कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडत तिन स्वत:च्या शरीराची अतिशय योग्य काळजी घेतली आहे. किरण ४९ वर्षांची आहे. चाळीशीनंतर तिला काही आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्या. तिचं वजन ७४ किलो झालं. डॉक्टरांनी सांगितलं की, ‘शरीर तंदुरुस्त नसेल तर भविष्यात आजाराच्या समस्या उद्भवू शकतात.’ हे ऐकल्यावर तिनं आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं ठरवलं. पुढे हेच तिचं ध्येय बनलं. इथूनच तिच्या आयुष्यातील एका वेगळ्या प्रवासाला सुरुवात झाली.
आपलं शरीर तंदुरुस्त ठेवण्याचं रहस्य उलगडून सांगते, ‘‘२००३ मध्ये मला मुलगी झाली. त्यानंतर मुलगा. त्यानंतर मला शारीरिक समस्या भेडसावू लागल्यानं घराच्या जवळच असलेल्या एका जिममध्ये प्रवेश घेतला. सुरुवातीला शरीरावर ताण न येणाऱ्या हलका व्यायाम केला. तिथे माझी ओळख अन्य लोकांशी झाली. त्यांचे अनेक सकारात्मक अनुभव ऐकले. त्यांच्या बोलण्यातून शारीरिक व्यायाम, आहार याविषयी माहिती मिळू लागली. त्यामुळे ध्येय साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न होऊ लागले. याचा परिणाम म्हणजे वजनही हळूहळू कमी होऊ लागलं.’’
एखाद्या कार्यक्रमाला गेल्यावर लोकांकडून कौतुकाची थाप पाठीवर मिळत असल्याने तिला प्रोत्साहन मिळाल्याचेही ती सांगते. त्यामुळे काहीतरी अनोखं करून पाहूया का ? असा विचार किरणच्या मनात आला. या विचारामुळे तिनं शरीराचे स्नायू पिळदार करण्याकडे लक्ष दिले. ठरवलेल्या निश्चयामुळे काही महिन्यांतच अथक परिश्रमातून तिचं हे ध्येय साध्य झालं.एका वर्षामध्ये २४ किलो वजन कमी केलं. आणि ‘सिक्स पॅक अब्ज’ बनवले.
आज किरण देबला या भारतातील एक नामवंत फिटनेस ट्रेनर आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटिंना त्या प्रशिक्षण देतात. ‘बाहुबली’ सिनेमाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली, तमन्ना भाटिया, दीक्षा सेठ, प्रकाश राज, अनुष्का शेट्टी यांच्यासहित अनेक सेलिब्रेटिंना तिनं प्रशिक्षण दिलं आहे. बॉडीबिल्डिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये तिनं भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. यात सहावा क्रमांक पटकवला. घरगुती जबाबदाऱ्या, कौटुंबिक जीवन सांभाळून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिनं स्वत:ची फिटनेस अकॅडमी आणि जिमही स्थापन केली. ती शास्त्रीय गायिका असल्यामुळे संगीत क्षेत्रातही तिची स्वतंत्र ओळख आहे. अनेक ठिकाणी ‘मोटिवेशनल स्पीकर’ म्हणून तिला आमंत्रित केलं जातं.
आहाराविषयी ती सांगते, प्रथिनं आणि फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश आवश्यक आहे. मासे, पनीर, चिकन, अंडी, विविध प्रकारच्या डाळी यांशिवाय हिरव्या पालेभाज्या व पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश असावा. काय खायचं, किती प्रमाणात खायचं आणि कोणते पदार्थ खायचे नाहीत, याचं भान ठेवणंही आवश्यक आहे. याशिवाय किरण दररोज एक ते दोन तास व्यायाम करते.
किरणला २०१९ मध्ये सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर तेलंगणा महिला ब्रँड नेतृत्व पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. तेलंगणा चेंबर इव्हेंट इंडस्ट्रि (TCEI) कडून २०१७चा सर्वोत्कृष्ट डिजे पुरस्कारही तिला मिळाला आहे.
‘‘ठरवलं तर एखादी स्त्री कोणत्याही वयात कोणत्याही टप्प्यावर नवा मार्ग निवडू शकते. स्वत:वर विश्वास ठेवला की काहीही अशक्य नाही.’ याशिवाय स्वत:शीच संवाद साधणंही आवश्यक असल्याचं तिला वाटतं. यामुळे नकारात्मकता टाळून ध्येय साध्य व्हायला प्रोत्साहन मिळतं, असा संदेश ती तिच्याप्रमाणेच इतर गृहिणींना देते. namita.warankar@expressindia.com