रस्त्यावरून चालताना गर्द केशरी फुलांनी डवरलेली बंगल्याच्या प्रवेशद्वाराची कमान अथवा कुंपणाच्या जाळीवरून झेपावणाऱ्या फुलांचे जांभळे घोस लक्ष वेधून घेतात. या फुलवेलींना बागेत मानाचे स्थान आहे. वेलींचे खोड सुरुवातीला नाजूक असते, पण तिची वाढण्याची ऊर्जा अफाट. जास्तीतजास्त सूर्यप्रकाश शोषण्याची, उंच वाढण्याची विजिगीषूवृत्ती असते. पण त्यासाठी असते आधाराची गरज! कमानीवरती, जुन्या झाडावर, कुंपणावर, जाळ्यांवर, भिंतीच्या आधारे अथवा कलात्मक स्टँडवर वेली वाढतात अन् ऋतूप्रमाणे भरभरून फुलतात. फुलवेलींचे खूप पर्याय आपल्याकडे आहेत. मोठ्या कमानी झाकण्यासाठी शक्यतो वेली जमिनीत लावाव्यात, नाहीतर मोठ्या कुंडीत सेंद्रिय माती, कोकोपीथ, पालापाचोळा, नीमपेंड एकत्र करून त्यात वेल लावावी. बहुतेक वेलींची रोपं रोपवाटिकेत मिळतात. कटींग वा कडे करून लावल्यास त्या सहज येतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दणकट प्रकृतीचा पिवळा अलमांडा कमानीवर छान फुलतो. बाराही महिने फुलतो. एकेरी व दुहेरी दोन प्रकारांत मिळतो. यातील लालुंगा जांभळा रंग दिसतो छान, पण त्याची प्रकृती जरा नाजूक. रंगांच्या वैविध्यामुळे बोगनवेलही लोकप्रिय आहे. पांढरा, जांभळा, गुलबक्षी, केशरी, फिक्का जांभळा असे अनेक रंग मिळतात. कणखर काटेरी व वजनदार बोगनवेल कुंपणासाठी उत्तम. वाढ खूप असल्याने वेळोवेळी कापून आटोक्यात ठेवावी लागते.

हेही वाचा… समुपदेशन: मुलांना परावलंबी करताय?

जानेवारी- फेब्रुवारीत केशरी फुलांच्या घोसांनी लगडलेली संक्रांत वेल नजरेचे पारणे फेडते. तिचे शास्त्रीय नाव पायरोस्टेजीया व्हेनुस्टा. म्हैसूरच्या वृंदावन गार्डनमध्ये याच्या मनमोहक भिंतीच बघायला मिळतात. बाल्कनीच्या, गच्चीच्या जाळीवर वाढवण्यासाठी थंबरजियाची निवड योग्य. नाजूक पांढऱ्या, केशरी फुलांचा थंबरजिया कुंपणावर छान वाढतो. बियांपासून सहज रुजतो. पण ग्रॅडीफ्लोरा हा मोठ्या फुलांचा वेल आक्रमकपणे वाढतो, हिरवी झोपडीच तयार करतो. यात पांढरा, जांभळा असे रंग असतात. यातील म्हैसुरेन्सी थंबरजियाचे कमानीवरून लटकणारे लालुंग्या फुलांचे लोंबते लोलक लोभस दिसतात. लसणासारख्या उग्र वासाची पाने असणारा लसण्या (अ‍ॅलिशिया) याची फुले मात्र चित्रकाराला भुरळ पाडतील अशी. सहज रुजणारा, हलक्या जांभळ्या रंगाच्या घटांसारख्या फुलांचे घोस येणारा लसण्या कम्पाऊंडसाठी उत्तम. फुले दिसतात छान, पण तोडण्याचे धाडस कोणी करत नाही.

मधुमालती या चुकीच्या नावाने प्रचलित रंगून वेल. नाजूक गुलाबी रंगाच्या फुलांचे घोस हळूहळू गर्द होत जातात. सुंदर दिसतात. मंद, सुगंध हा बोनस. मुळांपासून ही नवी रोपं उगवतात. वेलीस कमान केल्यास छान पसरते. हायड्रानजियाची वेल ही कमानीवर छान दिसते. पांढरी फुले मोहक असतात. क्लोरोडेन्ड्रॉनमध्ये फुलांची विविधता खूप आहे. पाने ही गर्द हिरवी सुंदर दिसतात. आयपोमिया कुटुंबातील फुलांच्या रंगांची विविधता खूप. मॉर्निग ग्लोरी वेल याच कुटुंबातील.

हेही वाचा… बुद्धिबळातही स्त्रियांची उपेक्षाच!

टेकोमा हा रुढार्थाने वेल नसला तरी नाजूक खोडाने उंच वाढतो. पिवळ्या, केशरी, गुलाबी रंगांत उपलब्ध असतो. गुलाबी टेकोमा सहज मिळत नाही. मिळाल्यास जरुर लावा, मोहक दिसतो. रातराणी ही मादक सुगंधाने बागांत स्थान मिळवून आहे. जरी रुढार्थाने वेल नसली तरी कटींगपासून सहज येते. रात्रीच्या वेळी दिसली नाही तरी सुगंधाने आपले अस्तित्व जाणवून देते. पॅसीफ्लोरा जातीतील कृष्णकमळ व पॅशनफ्रुटचे वेल जाळीवर छान वाढतात. निळ्या, पांढऱ्या व लाल रंगांची सुंदर फुले येतात. पॅशनफ्रुटचे सरबत छान होते.

खरखरीत पानांचा, जांभळ्या फुलांचा सँडपेपर वेल याची वाऱ्यावर भिरभिरत खाली येणाऱ्या फुलांमुळे याला ‘भिरभिरे’ असेही म्हणतात. ही फुले पुस्तकात ठेवून वाळल्य़ावर सुंदर ग्रिटींग करता येतात. अस्सल सुगंधाची, पांढुरक्या रंगाच्या फुलांची रानजाई खंबाटकी घाटात फुलली आहे. ती रोपवाटिकेतून आपल्या घरी येऊ शकते. क्लिटोरिया टर्निशिया म्हणजे गोकर्ण! आपण आणलेल्या वेलीचे शास्त्रीय नावही जाणून घ्या. या वेलींची दुनिया फार मोठी व मोहमयी. उपलब्ध जागेनुसार निवड केल्यास रंगांची व गंधाची बरसात घरात येईल, हे निश्चित!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vines grow on arches old trees fences and bloom profusely according to the season dvr