शेअर बाजारातील मराठी माणसाच्या, प्रामुख्याने तरुण पिढीच्या, गुंतवणुकीचा टक्का हळूहळू वाढत आहे. परंपरेने चालत आलेल्या गुंतवणुकीवर मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे. उदा. मुदत ठेवींवरील व्याजदर कमी होत आहेत, त्यावर भरावा लागणारा कर आणि महागाईचा दर लक्षात घेता यातून फारच थोडे उत्पन्न मिळते. सोन्याचे भाव मागील बऱ्याच वर्षांपासून स्थिर आहेत. या सर्वाचा विचार करता शेअर्स आणि म्युचुअल फंडातील गुंतवणूक करण्याकडे सर्वसामान्यांचा कल वाढतो आहे. जे शेअर्स किंवा म्युचुअल फंडात गुंतवणूक सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी खालील माहिती उपयुक्त ठरेल. या गुंतवणुकीच्या संदर्भात प्राप्तिकराच्या काय तरतुदी आहेत याचा आढावा घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेअर्स आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवरील कर सवलत :

‘कलम ८० सी’नुसार इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) मध्ये गुंतवणूक केल्यास दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्नातून वजावट मिळू शकते. असे अनेक म्युचुअल फंड आहेत ज्यांच्याकडे ही योजना आहे. ईएलएसएसमध्ये गुंतवणूक ही किमान ३ वर्षांसाठी असली पाहिजे. ‘कलम ८० सी’च्या अंतर्गत जे इतर गुंतवणूक पर्याय आहेत त्यामध्ये ईएलएसएसचा गुंतवणूक कालावधी कमी आहे. मुदत ठेवींमध्ये किमान ५ वर्षे, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (एनएससी) साठी १० वर्षांपर्यंत गुंतवणूक धारण करावी लागते. ईएलएसएसमधील गुंतवणुकीत शेअर बाजारातील गुंतवणुकीसारखी वाढण्याची क्षमता आहे. इतर गुंतवणुकीच्या पर्यायात वाढ होत नाही. ईएलएसएसवर मिळणारा लाभांश करमुक्त आहे. तीन वर्षांनंतर ईएलएसएसमधील गुंतवणूक विकली तर त्यावर झालेल्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागत नाही, कारण ईएलएसएसच्या विक्रीवर शेअर उलाढाल कर (एसटीटी) भरलेला असल्यामुळे तो करमुक्त आहे. या सर्वामुळे ईएलएसएसमध्ये एसआयपी (सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लान) करणे सोयीस्कर ठरते.

‘कलम ८० सीसीजी’नुसार राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग्ज स्कीम : ही योजना नवीन गुंतवणूकदारांसाठी आहे. ही योजना जाहीर झाल्यानंतर उघडलेल्या डिमॅट खातेधारकांसाठी ही योजना आहे. या योजनेनुसार सूचिबद्ध इक्विटी शेअर्स किंवा सूचिबद्ध इक्विटी फंडामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीच्या ५० टक्के वजावट (परंतु २५,००० रुपयांपर्यंत मर्यादित) उत्पन्नातून मिळते. ही उत्पन्नातून वजावट प्रथम गुंतवणूक केलेल्या वर्षांपासून सलग तीन वर्षांसाठीच मिळू शकते. या कलमानुसार वजावटीसाठी काही अटी आहेत. (१) करदात्याचे एकूण उत्पन्न १२ लाख रुपयांच्या पेक्षा जास्त असू नये, (२) करदाता हा नवीन गुंतवणूकदारच असावा (३) गुंतवणूक फक्त निर्देशित केलेल्या सूचिबद्ध इक्विटी शेअर्स किंवा सूचिबद्ध इक्विटी फंडामध्येच असावी, (४) गुंतवणूक किमान ३ वर्षांसाठी असावी. या योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या योजनेअंतर्गत मिळणारी वजावट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही योजना फक्त ३१ मार्च २०१७ पर्यंतच आहे. १ एप्रिल २०१७ नंतर केलेल्या गुंतवणुकीची वजावट या कलमानुसार मिळणार नाही.

शेअर्स आणि म्युच्युअल फंडाच्या लाभांशावर कर :

शेअर्सवरील लाभांश : वैयक्तिक करदाते, हिंदू अविभक्त कुटुंब, भागीदारी संस्था, इतर करदाते (स्वदेशी कंपनी व्यतिरिक्त) यांना मिळालेला शेअर्सवरील लाभांश १० लाख रुपयांपर्यंत करमुक्त आहे. या करदात्यांना १० लाख रुपयांपेक्षा जास्त लाभांशावर १० टक्के कर भरावा लागतो. हा कर आपले इतर उत्पन्न कोणत्याही कर टप्प्यात (स्लॅब) असले तरी. उदा. एका वैयक्तिक करदात्याला १२ लाख रुपये लाभांश स्वदेशातील कंपनीकडून आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये मिळाला (१) जर त्याचे इतर उत्पन्न काहीच नाही आणि (२) त्याचे पगारातून उत्पन्न ११ लाख रुपये आहे आणि दोन्ही उदाहरणामध्ये १,५०,००० रुपये ‘कलम ८० सी’नुसार गुंतविले आहेत तर त्यावरील कर खालील तक्ता १ प्रमाणे असेल.

करपात्र लाभांशाच्या (१० लाख रुपयांपेक्षा जास्त) उत्पन्नाच्या रकमेतून कोणतीही वजावट मिळत नाही.

 म्युच्युअल फंडावरील लाभांश

इक्विटी फंडावरील लाभांश हा करमुक्त आहे. डेट फंडावरील लाभांश हा लाभांश घेणाऱ्यासाठी करमुक्तच आहे. परंतु फंडाला यावर कर भरावा लागतो आणि तो कर गुंतवणूकदाराकडून वसूल केला जातो. त्यामुळे जेव्हा डेट फंडाकडून करदात्याला लाभांश मिळतो त्यावर त्याला परत कर भरावा लागत नाही.

शेअर्स आणि म्युच्युअल फंडाच्या विक्रीवरील भांडवली नफ्यावर कर :

शेअर्स आणि म्युच्युअल फंड यांच्या विक्रीवर होणारा भांडवली नफा हा दोन प्रकारचा आहे. एक लघु मुदतीचा आणि दुसरा दीर्घ मुदतीचा. या दोन प्रकारावरील नफा हा त्याच्या धारण काळावर अवलंबून आहे.

 सूचिबद्ध शेअर्स/ इक्विटी फंड :

सूचिबद्ध शेअर्स आणि इक्विटी फंड युनिट्स हे खरेदी केल्याच्या तारखेपासून १२ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी धारण केल्यास त्यावर होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा होतो आणि १२ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी धारण केल्यास त्यावर होणारा भांडवली नफा हा लघु मुदतीचा होतो. ज्या सूचिबद्ध शेअर्स आणि इक्विटी फंडाच्या युनिट्सच्या विक्रीवर शेअर उलाढाल कर (एसटीटी) भरला गेला आहे असा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा हा करमुक्त आहे आणि अशा लघु मुदतीच्या भांडवली नफ्यावर १५ टक्के इतक्या सवलतीच्या दरात कर भरावा लागतो.

सूचिबद्ध शेअर्स जर खासगीरीत्या विकले किंवा शेअर्स कंपन्यांना बाय-बॅक योजनेअंतर्गत विकले तर त्यावर होणारा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा हा करपात्र आहे. कारण त्यावर एसटीटी भरला जात नाही. या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर भरण्यासाठी दोन पर्याय आहेत. एक म्हणजे महागाई निर्देशांकानुसार खरेदी किंमत विचारात घेऊन भांडवली नफा गणणे आणि त्यावर २० टक्के इतका कर भरणे किंवा महागाई निर्देशकानुसार खरेदी किंमत विचारात न घेता भांडवली नफा गणणे आणि त्यावर १० टक्के इतका कर भरणे. या दोन्ही पद्धतीने देय कर किती आहे ते पाहणे आणि जी पद्धत करदात्याला फायदेशीर आहे ती पद्धत वापरून त्यावर कर भरणे. उदा. (सोबतचा तक्ता पाहा)

करदात्याला त्याच्या फायद्याचा पर्याय निवडण्याची मुभा आहे. त्यामुळे तो महागाई निर्देशकानुसार खरेदी किंमत विचारात घेऊन २० टक्के इतका कर भरणे पसंत करेल.

अशा करपात्र दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर जर कर भरावयाचा नसेल किंवा कमी भरावयाचा असेल तर ‘कलम ५४ एफ’नुसार घरामध्ये शेअर्सच्या विक्री किमतीएवढी किंवा ‘५४ ईसी’नुसार भांडवली नफ्याएवढी गुंतवणूक रोख्यांमध्ये (कमाल मर्यादा ५० लाख रुपये) करता येते.

सूचिबद्ध शेअर्स जर खासगीरीत्या विकले किंवा शेअर्स कंपन्यांना बाय-बॅक योजने अंतर्गत विकले तर त्यावर होणारा लघु मुदतीचा भांडवली नफा हासुद्धा करपात्र आहे. यावर आपल्या स्लॅबप्रमाणे कर भरावा लागतो.

 डेट फंड

डेट फंड अर्थात रोखेसंलग्न फंडाचे युनिट्स हे खरेदी केल्याच्या तारखेपासून ३६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी धारण केल्यास त्यावर होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा होतो आणि ३६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी धारण केल्यास त्यावर होणारा भांडवली नफा हा लघु मुदतीचा होतो. डेट फंडाच्या युनिट्सच्या विक्रीवर शेअर उलाढाल कर (एसटीटी) भरला जात नसल्यामुळे दीर्घ मुदतीचा किंवा लघु मुदतीचा भांडवली नफा हा करपात्र असतो. दीर्घ मुदतीचा भांडवली नफा गणताना महागाई निर्देशकानुसार खरेदी किमतीचा फायदा घेता येतो आणि त्यानुसार गणलेल्या नफ्यावर २० टक्के इतका कर भरावा लागतो. अशा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर वाचवायचा असेल किंवा कमी भरावयाचा असेल तर कलम ५४ एफ नुसार किंवा ५४ ईसी नुसार गुंतवणूक करता येते.

लघु मुदतीच्या भांडवली नफ्यावर आपल्या स्लॅबप्रमाणे कर भरावा लागतो.

खासगी कंपन्यांचे शेअर्स  

सूचिबद्ध नसलेले खासगी कंपन्यांचे शेअर्स हे खरेदी केल्याच्या तारखेपासून २४ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी धारण केल्यास त्यावर होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा होतो आणि २४ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी धारण केल्यास त्यावर होणारा भांडवली नफा हा लघु मुदतीचा होतो. दीर्घ मुदतीचा भांडवली नफा गणताना महागाई निर्देशकानुसार खरेदी किमतीचा फायदा घेता येतो आणि त्यानुसार गणलेल्या नफ्यावर २०% इतका कर भरावा लागतो. अशा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर वाचवायचा असेल किंवा कमी भरावयाचा असेल तर ‘कलम ५४ एफ’ नुसार किंवा ‘५४ ईसी’ नुसार गुंतवणूक करता येते.

लघु मुदतीच्या भांडवली नफ्यावर आपल्या स्लॅबप्रमाणे कर भरावा लागतो.

(लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार)

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mutual fund investments and tax provisions
First published on: 20-03-2017 at 01:01 IST