वॉटर हीटर निर्मात्री असलेल्या राकोल्ड थर्मोमार्फत ऊर्जा संवर्धनाच्या प्रोत्साहनार्थ सहकारी संस्थांमधून ऊर्जाविषयक स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, विजेत्या फ्लॅटधारकांला दोन लाख रुपयांपर्यंतची घसघशीत रक्कम मिळणार आहे.
भारतासारख्या देशात घरांमध्ये थेट विजेचा वापर होण्याचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत आहे. तर वाणिज्यिक वापराद्वारे ७० टक्के वीज उपयोगात आणली जाते. मागणी आणि पुरवठय़ातील तफावतीमुळे ऊर्जा संवर्धन गरजेचे असल्याचे मानून राकोल्ड थर्मो कंपनीने या विषयातील स्पर्धा सर्वप्रथम पुण्यात घेण्याचे ठरविले आहे.
याबाबत कंपनीचे जॉन मॅथ्यूज यांनी सांगितले की, शहरातील निवडक १०० इमारतींमधून याबाबतची स्पर्धा घेण्यात येणार असून यात ९०० सदनिकाधारक सहभागी होत आहेत. ऊर्जा संवर्धनाच्या क्षेत्रात जागरुकतेसाठी अशीच मोहीम राज्यातील अन्य शहरांमध्येही राबविण्यात येईल, असेही ते म्हणाले. सुरुवातील मोठी शहरे व दुसऱ्या टप्प्यात निमशहरांमधून हा प्रकल्प होईल; वैयक्तिक घरांसाठी (बंगले, रो हाऊस) तसेच वाणिज्य वापरासाठीदेखील असाच उपक्रम राबविण्याचा कंपनीचा विचार असल्याचेही मॅथ्यूज यांनी सांगितले. या उपक्रमाला अपेक्षित प्रतिसाद मिळतानाच अशा मोहिमेसाठी खास राजदूत नेमण्याची तयारीही कंपनीने दाखविली आहे. इटलीच्या समूहाचा भारतीय भाग असलेल्या राकोल्ड थर्मो ही देशातील सर्वाधिक वॉटर हीटर निर्मिती आणि विक्रेती कंपनी आहे.