* मुंबईत विक्री कार्यालय
* वर्षभरात मनुष्यबळ दुपटीने वाढणार
गेल्या वर्षांत लार्सन अॅण्ड टुब्रोबरोबर सुरू असलेल्या वितरणविषयक सामंजस्य संपुष्टात आल्यानंतर, इलेक्ट्रिकल स्विचगीयर्समधील फ्रान्सची जागतिक कंपनी ‘हेगर’ने भारतात स्वतंत्रपणे वाटचाल सुरू केली असून, नवी दिल्लीपाठोपाठ मुंबईत अलीकडेच कंपनीच्या विक्री कार्यालयाचे उद्घाटन झाले. चालू वर्षांत बंगळुरू आणि चेन्नई येथेही कंपनीची विक्री कार्यालये सुरू होऊ घातली असून, कोलकाता व अन्य मुख्य महानगरांमध्ये छोटी कार्यालये सुरू करण्याचे नियोजन आहे. एमसीबी, आरसीसीबी आणि एफसीसीबी अशी उच्च श्रेणीतील अत्याधुनिक इलेक्ट्रिकल स्विचगीयर्सची निर्मिती करणाऱ्या हेगरने भारतात २००७ साली पुण्यात लोणीकंद येथे आपला उत्पादन प्रकल्प सुरू केला आणि २०१२ पासून भारतात स्वतंत्र व्यावसायिक आराखडा आखून वाटचाल सुरू केली आहे. भारतातील बदलती जीवनशैली, तंत्रज्ञानात्मक अवलंबित्व आणि त्यासंबंधाने लोकांच्या वाढत्या अपेक्षा लक्षात घेता, आपल्या उत्पादनांना देशात प्रचंड मोठी मागणी दिसून येते, असे हेगर इंडियाचे विक्री व विपणन प्रमुख प्रवीण नायर यांनी सांगितले. येत्या वर्षभरात देशातील विक्री व विपणन विभागातील मनुष्यबळ दुपटीने वाढून १००वर नेण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कंपनीने आखलेल्या व्यवसाय आराखडय़ानुसार, २०१५ पर्यंत भारतातील विक्री उलाढाल सध्याच्या जवळपास १०० कोटींवरून, ३०० कोटी रुपयांवर जाईल, असे नायर यांनी स्पष्ट केले.