गेल्या सात महिन्यांपासून उड्डाणे बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सने आपले पालकत्व असलेल्या यूबी समूहाकडून आवश्यक तो निधी मिळवून पुन्हा नव्याने सेवा सुरू करण्याबाबत परिपूर्ण पुनरूज्जीवन योजना ‘नागरी उड्डाण महासंचलानलया’कडे बुधवारी सादर केली असून, उड्डाण परवान्याच्या नूतनीकरणासाठी आर्जव केला आहे. किंगफिशर सध्याच्या सात विमानांच्या ताफ्यासह आपली सेवा पुन्हा नव्याने सुरू करू इच्छित असून, त्या संबंधाने संपूर्ण वेळापत्रक, आवश्यक ते मनुष्यबळ यासह संपूर्ण योजना सादर केली गेली आहे, अशी ग्वाही किंगफिशर एअरलाइन्सचे मुख्याधिकारी संजय अगरवाल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. नागरी उड्डाण महासंचालक अरुण मिश्रा यांना पुनरूज्जीवन योजना सादर करून आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  किंगफिशरला कर्ज देणाऱ्या धनकोंकडून प्राप्त ना-हरकत प्रमाणपत्रही या योजनेसोबत सादर करण्यात आले असल्याचे अगरवाल यांनी स्पष्ट केले. ऑक्टोबर २०१२ पासून उड्डाणे बंद असलेल्या किंगफिशर एअरलाइन्स विविध १७ बँकांनी दिलेले तब्बल ७००० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. या कर्जवसुलीसाठी एकीकडे बँकांनी बाह्या सरसावल्या असून, कर्जासाठी तारण ठेवलेल्या यूबी समूहातील कंपन्यांच्या समभागांची विक्रीही सुरू केली आहे.