चैतन्य हरपलेल्या भांडवली बाजारामुळे म्युच्युअल फंड कंपन्यांनीही गेल्या आर्थिक वर्षांत काढता पाय घेतला असून विविध कंपन्यांचे २३,००० कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत. गेल्या १२ वर्षांतील ही सर्वाधिक रक्कम आहे.
२०१२-१३ आर्थिक वर्षांमध्ये सेन्सेक्सच्या परतावा अवघा ८ टक्के राहिला आहे.
२०१२-१३ या आर्थिक वर्षांत ४० हून अधिक म्युच्युअल फंडांनी भांडवली बाजारात समभाग विक्रीच्या रूपाने मोठय़ा प्रमाणात निधी काढून घेतला आहे. मार्च २०१३ अखेर ही रक्कम २३,००० कोटी रुपये होते. २०००-०१ नंतरही ही सर्वात मोठी रक्कम आहे. तर गेल्या सलग तीन वर्षांतील एकूण रक्कम ३३,००० कोटी रुपयांहूनही अधिक आहे, तर चार वर्षांतील मिळून रक्कम तब्बल ५५,००० कोटी रुपये होते.
२०१२-१३ दरम्यान म्युच्युअल फंडांनी विकलेल्या समभागातील रक्कम २२,७४९ कोटी रुपये होती. यापूर्वीचा सर्वाधिक विक्री आकडा, २०००-०१ मधील २७,६७० कोटी रुपये आहे. गेल्या आर्थिक वर्षांत ११ ही महिन्यात म्युच्युअल फंड कंपन्यांनी समभागांची निव्वळ विक्री केली. केवळ जूनमध्ये त्यांनी २९६ कोटी रुपये विविध समभागांमध्ये गुंतविले. म्युच्युअल फंडांच्या ३४७ ग्रोथ/ इक्विटीशी निगडित योजनांमध्ये १.७९ लाख कोटी मालमत्ता होती.