अग्रीम कर भरण्याची मुदत संपण्यास पाच दिवसांचा कालावधी उरूनही अपेक्षित करवसुली होत नसल्याने सरकारने सोमवारी देशभरातील करदात्यांना कारवाईचा इशारा दिला. करदात्यांनी आपल्या उत्पन्नाचे योग्य विवरण देऊन देय असलेला आगाऊ कर भरावा अथवा कारवाईला तोंड देण्याची तयारी ठेवावी, अशी तंबी सरकारने करदात्यांना दिली.
करदात्यांनी आपले खरे उत्पन्न जाहीर करून देय असलेला कर विहित मुदतीत भरावा, यासाठी सरकार सर्व करदात्यांना विनंती करत आहे. आपले उत्पन्न कमी दाखवून अथवा करभरणा टाळून कोणाचाच लाभ होणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय महसूल सचिव सुमीत बोस यांनी पत्रकारांशी बोलताना केले. अग्रीम कर भरण्यासाठी उद्योजकांना असलेली मुदत १५ डिसेंबरला संपत आहे, तसेच सर्वसाधारण करदात्यांनी अग्रीम कराचा दुसरा हप्ता भरण्यासाठीची मुदतही त्याच दिवशी संपत आहे, त्या पाश्र्वभूमीवर ते बोलत होते. खरे उत्पन्न लपविण्याचे प्रकार आपल्या देशात सर्रास चालतात. चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत केवळ १४ लाख ६२ हजार उद्योजक व व्यावसायिकांनी आपले १० लाख रुपयांच्या पुढील करपात्र उत्पन्न घोषित केले आहे, सारासार विचार करणाऱ्या कोणालाही ही आकडेवारी खूपच कमी असल्याचे जाणवेल, मात्र करपात्र उत्पन्न दडविणाऱ्यांना आज ना उद्या कर भरावाच लागणार आहे, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, हे त्यांनी ध्यानात घ्यावे, असे ते म्हणाले.
मंडळी, सावध..!
* बँकेतील बचत खात्यात १० लाख व त्यापेक्षा अधिक रक्कम असणारे
* क्रेडिट कार्डावरील विनिमय किमान दोन लाखांच्या घरात असणारे
* ३० लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या मालमत्तेची खरेदी-विक्री उलाढाल केलेले.
अर्थमंत्र्यांचेही आवाहन
वेळेवर योग्य कर भरणे, हे सुजाण नागरिक असल्याचे लक्षण आहे, असे सांगत केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनीही अग्रीम कर भरण्यासाठी नागरिक व उद्योजकांना आवाहन केले आहे. जास्तीत जास्त कर भरणाऱ्यांनी खूप समाधानी असायला हवे, कारण ज्या अर्थी ते अधिक कर भरतात, त्या अर्थी त्यांचे उत्पन्नही त्याच प्रमाणात असते, असे ते म्हणाले.