टीसीएस (बंद भाव)  रु. १,५३० २.२%
इन्फोसिस (बंद भाव)  रु. २,८१३१.७%
बीएसई आयटी निर्देशांक        २.०५%
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी इन्फोसिस सरलेले आर्थिक वर्ष २०१२-१३ची चौथी तिमाही आणि संपूर्ण वर्षांचे निकाल शुक्रवार, १२ एप्रिलला जाहीर करणार आहे. या निकालाबरोबरच आगामी वर्षांच्या वाटचालीबाबत कंपनी संकेत देत असते. परंतु गेल्या काही तिमाहींपासून या संकेतांबाबत बदललेला मतप्रवाह पाहता यंदा असे कोणते संकेत कंपनी देईल, याबाबत साशंकता असून एकूणच तिमाही निकालांच्या हंगामाची इन्फोसिसच्या निकालाने खऱ्या अर्थाने होणारी सुरुवात ही कशी असेल, याबद्दल वेगवेगळी मतमतांतरे आहेत.
इन्फोसिसने सरलेल्या आर्थिक वर्षांसाठी महसुली वाढीचे अपेक्षित लक्ष्य गाठण्यासाठी चौथ्या तिमाहीत अडीच ते तीन टक्क्यांची वाढही पुरेशी ठरेल. त्यामुळे सरलेल्या आर्थिक वर्षांचे उद्दिष्ट इन्फोसिसकडून सहजपणे गाठले जाईल, अशी बहुसंख्य विश्लेषकांना खात्री आहे. प्रामुख्याने माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या आगामी वाटचालीविषयी प्रश्नार्थक स्थिती मात्र कायम आहे. या पाश्र्वभूमीवर चालू वर्षांत इन्फोसिसचा रुपयातील उत्पन्न १५ टक्के आणि नफा ८ ते १० टक्क्यांहून अधिक असण्याचे संकेत अपेक्षित आहेत. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची शिखर संघटना असलेल्या ‘नॅसकॉम’ने २०१३-१४मध्ये भारताचा माहिती-तंत्रज्ञान व्यवसाय १२-१४ टक्के दराने वाढणे अपेक्षित असल्याचा कयास व्यक्त केला आहे.
सरलेल्या आर्थिक वर्षांच्या चौथ्या तिमाहीत सशक्त बनलेल्या डॉलरमुळे इन्फोसिसची डॉलर या चलनातील विक्री पाच टक्क्यांपेक्षा जास्त असणार नाही, असा अंदाज विश्लेषक वर्तवीत आहेत. मागील वर्षी इन्फोसिसने लोडस्टोन या स्विस कंपनीचे अधिग्रहण केल्यामुळे त्याचे परिणाम चालू आर्थिक वर्षांतील कामगिरीत दिसून येतील. रुपयातील वार्षिक विक्री १८ टक्के तर डॉलरमधील विक्री १२ टक्क्याने वधारेल, असे सकारात्मक संकेत इन्फोसिसकडून येत्या शुक्रवारी दिले जातील, अशी अपेक्षा आहे. या आशेवरच सध्या इन्फोसिसच्या समभागांची जोरदार खरेदी सुरू असल्याचे विश्लेषक सांगत आहेत. ‘येत्या वर्षांसाठी इन्फोसिस विक्रीत १२% तर नफ्यात १६% हून अधिक वाढ दर्शविण्याचे संकेत देईल,’ असा कयास स्टर्न कॅपिटल या गुंतवणूक संस्थेच्या आयटी विभागाच्या उपाध्यक्षा सुमेधा जोशी-आरोसकर यांनी व्यक्त केला.