दर्जेदार नाममुद्रा असलेल्या ‘टायटन आय प्लस’ने गेल्या काही महिन्यांमध्ये एक हजार रुपयांखालील चष्मे सादर करण्याच्या प्रयत्नाला चांगले यश मिळाले असून यापासून प्रोत्साहन घेत ‘टायटन इंडस्ट्रीज’ने आता नवी मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, विदर्भासह महाराष्ट्रातील निमशहरी भागांमध्ये शिरकाव करण्याचे निश्चित केले आहे.
टाटा समूहाने तीन वर्षांपूर्वी टायटनमार्फत नेत्रनिगा क्षेत्रात शिरकाव केला. डोळ्यांना लागणारे चष्मे, लेन्स आदींची निर्मिती कनार्टकातील बंगळुरूपासून ५० किलोमीटरवर असलेल्या चिकबलपूर येथील प्रकल्पात होते. येथे वर्षांला २ लाख लेन्स तयार करण्याची क्षमता आहे. सध्या येथे दररोज सरासरी एक हजार ते सात हजार लेन्स तयार केले जातात. कंपनीने काही महिन्यांपूर्वीच कम्प्युटरच्या माध्यमातून स्वत:चे डोळे स्वत: तपासण्याची सुविधा परिचित केली होती. ‘शंकर नेत्रालया’च्या सहकार्याने कंपनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक तरुणांना दीड महिन्याच्या कालावधीत नेत्रनिदान तज्ज्ञ बनविते.
काही महिन्यांपूर्वी एक हजार रुपयांच्या आतील चष्मे सादर करण्याच्या मोहिमेला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळताच कंपनीने आता महाराष्ट्रातील निमशहरांमध्ये अधिक दालने खुली करण्याचा चंग बांधला आहे. याबाबत ‘टायटन इंडस्ट्रिज’च्या पश्चिम परिमंडळाचे सहयोगी उपाध्यक्ष के. एस. घई यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, कंपनीची देशभरात सध्या २३५ टायटन आय प्लस दालने आहेत. पैकी ७२ ही पश्चिम भारतात आहेत. एकटय़ा मुंबईत २८ ‘टायटन आय प्लस’ आहेत. कंपनी आता निमशहरांमध्येही विस्तार करत आहे. याअंतर्गत महाराष्ट्रातील नवी मुंबई, अहमदनगर, अमरावती, अकोला, सांगली, सातारा, जळगाव येथे नवीन दालने अस्तित्वात येत आहेत. येत्या दोन वर्षांमध्ये ७० ते ८० अधिक ‘टायटन आय प्लस’ दालने होतील.
टायटन या ब्रीदअंतर्गत घडय़ाळे आणि दागिने (तनिष्क) दालनांची संख्याही देशभरात अनुक्रमे ३४० व १३८ आहेत. ती नजीकच्या कालावधीत अनुक्रमे २५ आणि ३० ने वाढविण्यात येणार आहेत. कंपनीचा व्यवसाय वार्षिक ५० टक्क्याने वाढत आहे. संगणकामार्फत स्वत: डोळे तपासण्याच्या या क्षेत्रात प्रथमच विकसित केलेल्या पद्धतीबद्दलही घई यांनी या योजनेला विशेषत: ३० ते ३५ वर्षे वयोगटातील वर्गाचा चांगला प्रतिसाद लाभला असे नमूद केले. कंपनीच्या मार्गदर्शनाखाली तयार होत असलेल्या नेत्र तज्ज्ञ तरुणांमुळे या क्षेत्राची गरज पूर्ण होत असून रोजगारनिर्मितीही होते, असाही दावा त्यांनी केला.
संग्रहित लेख, दिनांक 28th Mar 2013 रोजी प्रकाशित
‘टायटन आय प्लस’ची नजर महाराष्ट्रातील निमशहरी क्षेत्रांवर
दर्जेदार नाममुद्रा असलेल्या ‘टायटन आय प्लस’ने गेल्या काही महिन्यांमध्ये एक हजार रुपयांखालील चष्मे सादर करण्याच्या प्रयत्नाला चांगले यश मिळाले असून यापासून प्रोत्साहन घेत ‘टायटन इंडस्ट्रीज’ने आता नवी मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, विदर्भासह महाराष्ट्रातील निमशहरी भागांमध्ये शिरकाव करण्याचे निश्चित केले आहे.

First published on: 28-03-2013 at 12:35 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Titan eye plus in small city