नव्या पिढीतील खासगी बँकांच्या तोडीस तोड आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ग्राहकांना गुणात्मक सेवासुविधांचा लाभ देणाऱ्या सहकार क्षेत्रातील पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेने (पीएमसी बँकेने) आपला ३० वा वर्धापनदिन बुधवारी समारंभपूर्वक साजरा केला.
८५ शाखांमार्फत कार्यरत असलेल्या या बँकेच्या सेवेत तब्बल ८० टक्के महिला कर्मचारी आणि अधिकारी यांचा भरणा असल्यानेच बँकेने ग्राहकसेवेचा आदर्श आणि अनेक पुरस्कार मिळविणारा वस्तुपाठ आजवर रचला आहे, अशी यावेळी बोलताना पीएमसी बँकेचे अध्यक्ष सरदार चरणजीतसिंग चढ्ढा यांनी मुक्त कंठाने प्रसंशा केली. बँकेचा आजवरचा लौकिक उंचावण्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे प्रशस्तीपत्रही त्यांनी दिले. म्हणूनच वर्धापनदिन सोहळा हा स्त्री कर्तृत्वाच्या सन्मानासाठीच योजण्याचा बँकेने निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी अनेक कर्तृत्त्ववान महिलांचा सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मश्री बाबा सेवा सिंगजी यांच्या हस्ते करण्यात आला. एटीएममधून खातेदारांकडून झालेल्या प्रत्येक उलाढालीमागे एक रुपया पीएमसी बँक धर्मादाय कार्यासाठी देते. गेल्या दोन वर्षांत अशा व्यवहारांतून जमा झालेले ५५ लाख रुपये या प्रसंगी क्राय आणि सेव्ह द चाइल्ड या स्वयंसेवी संस्थांना देण्यात आले.