रिलायन्स फार्मा फंड
अमेरिकेच्या प्रगत भांडवली बाजारात अनेक सिद्धांतनी असे सिद्ध केले आहे की गुंतवणुकीत ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट’ रणनीतीचा अवलंब केल्यास निर्देशांकाहून अधिक परतावा मिळविता येतो. एखाद्या समभागाच्या बाजारात उपलब्ध असलेल्या किंमतींपेक्षा त्या समभागाचे मोल अधिक असते त्यावेळी गुंतवणूक केल्यास अधिक फायदा होतो, असे हा सिद्धांत सांगतो. थोडक्यात गुंतवणुकदारांची तत्कालीन पसंती गमावलेल्या क्षेत्रात गुंतवणूक केल्यास नफा होण्याची संधी अधिक असते. म्युच्युअल फंडातील बिझनेस सायकल फंड हे भविष्यात अव्वल कामगिरी करणाऱ्या उद्योगात गुंतवणूक करतात. सध्या आरोग्य निगा व औषध निर्माण क्षेत्र नियंत्रक व सरकारी विपरीत धोरणांचा सामना करीत आहे. या उद्योग क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे समभाग २—३ वर्षांंच्या तळाला आहे आहेत. म्हणूनच या उद्योग क्षेत्रात नवीन गुंतवणुकीची संधी उपलब्ध आहे. विविध कारणांनी औषध निर्माण व आरोग्य निगा क्षेत्राकडे गुंतवणूकदारांनी पाठ फिरविण्यास सुरुवात केली आणि त्याला आता दोन अडीच वर्षे होत आहेत. अनेक कारणांनी हे क्षेत्र व्हॅल्यू इन्व्हेस्टरनां खुणावू लागले आहे. अनेक व्हॅल्यू फंडात दोन अडीच वर्षांंनी भांडवली वृद्धीची संधी असल्याने या उद्योग क्षेत्रातील समभागांचा समावेश होऊ लागला आहे. सेन्सेक्सने ३१ हजाराचा टप्पा पार केला असताना आणि नव्याने गुंतवणूक करण्यात धोका वाढत असतांना कमी जोखीम पत्करून चार—पाच वर्षे थांबण्याची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर १५ ते २० टक्के भांडवली वृद्धी मिळण्याची क्षमता असलेले हे क्षेत्र आहे. या क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या चार उपलब्ध पर्यायांपैकी रिलायन्स फार्मा फंडाचा म्युच्युअल फंड गुंतवणूकदार विचार करू शकतात.
फंडाची पहिली एनएव्ही ५ जून २००४ रोजी जाहीर झाली मागील आठवडय़ात या फंडाला अस्तित्वात येऊन १३ वर्षे पूर्ण झाली. फंडाच्या पहिल्या दिवशी फंडात गुंतविलेल्या एक लाखाचे ७ जूनच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्ही नुसार १२.५५ लाख रुपये झाले असून परताव्याचा वार्षिक दर २१.५६ टक्के आहे. फंडात दरमहा ५,००० रुपये नियोजनबद्ध गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांच्या ७.८५ लाखाचे ७ जूनच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्ही नुसार ३०.५२ लाख रुपये झाले असून परताव्याचा वार्षिक दर १९.२४ टक्के आहे. फंडाच्या गुंतवणुकीत १६ कंपन्या असून औषध निर्माण कंपन्यांच्या बरोबरीने अपोलो हॉस्पिटल, नारायणा हृदयालय सारखी रुग्णालये, थायरोकेअरसारखी निदानपूर्व चाचणी व्यवसायातील आणि हेल्थकेअर ग्लोबलसारखी कर्करोगावर उपचार करणारी कंपनी आदींचा समावेश आहे. फंडाच्या गुंतवणुकीत कॅडिला हेल्थकेअर, ऑरबिंदो फार्मा, अॅबट इंडिया, सॅनोफी इंडिया, डॉ. रेड्डी या आघाडीच्या पाच गुंतवणुका आहेत. पहिल्या दहा गुंतवणुका एकूण गुंतवणूक मूल्याच्या ७० टक्कय़ांदरम्यान असल्याने हा फंड समभाग केंद्रित जोखीम स्वीकारून परतावा मिळविणारा फंड आहे.
दर्जेदार मिडकॅप कंपन्यांचा अभाव असलेल्या आरोग्य निगा व औषध निर्माण उद्योगातील सर्व कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य ८ लाख कोटी असणे ही गुंतवणुकीसाठी असलेली मर्यादा लक्षात घेता निधी व्यवस्थापकाने स्वीकारलेली जोखीम अवाजवी म्हणता येणार नाही. १२ वर्षांंपूर्वी जेव्हा फंड सुरू झाला तेव्हा या फंडाच्या गुंतवणुकीत केवळ औषध उत्पादक होते. उद्योगाच्या बदलत्या रुपानुसार व उपलब्धतेनुसार आरोग्य निगा क्षेत्रातील सेवा पुरवठादार (रुग्णालये, निदानपूर्व चाचण्या, आरोग्य विमा इत्यादी) कंपन्यांचा समावेश गुंतवणुकीत झाला आहे.
आरोग्य निगा सेवा क्षेत्र वार्षिक १५ ते १८ टक्के दराने वाढत आहे. एकूण भारतातील औषध निर्माण उद्योगाचा विचार केल्यास साधारण ६०—६५ टक्के विक्री निर्यातीतून व ३५ ते ४० टक्के विक्री देशांतर्गत होते. भारतीय औषध कंपन्यांकडून प्रामुख्याने बल्क ड्रग, फॉम्र्युलेशन, व हर्बल उत्पादनांची निर्यात केली जाते. भारताच्या औषध निर्यातीचा वृद्धीदर मागील दहा वर्षे २० ते २२ टक्कय़ांदरम्यान आहे. हा वृद्धीदर गाठण्याला, मुखत्त्वे अमेरिकेतील नागरिकांना वाजवी दरात आरोग्य निगा मिळविण्याच्या उद्देशाने अमेरिकेत ढं३्रील्ल३ ढ१३ीू३्रल्ल ंल्ल िअऋऋ१िंु’ी उं१ी अू३ या नावाचा कायदा कारणीभूत ठरला. हा कायदा ‘ओबामा केअर’ या नावाने ओळखला जातो. दरम्यानच्या काळात मोठय़ा निर्यातदारांना अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने अनियमितेबद्दल कारणे दाखवा नोटीसा दिल्या. या नोटीशींना उत्तरे देण्याची व अनियमितता दूर करून निर्यातीला चालना देण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या दोन ते तीन तिमाहीत निर्यातीला सुरुवात होईल अशी आशा आहे.
मागील दोन वर्षांंपासून औषध निर्यातदार कंपन्या सालाना २,००० कोटीचा खर्च औषध वितरणासाठी, पेटंट अर्ज दाखल करण्यासाठी करीत आहेत. मुख्यत: अमेरिकेच्या व अन्य देशातील अन्न व औषध प्रशासनाच्या मान्यतेअभावी बाजारपेठेत नवीन औषधे दाखल होण्याचे प्रमाण घटले आहे. परिणामी या कंपन्यांच्या उत्सर्जनातील (प्रति समभाग मिळकत —अर्निंग पर शेअर) वाढीला खीळ बसली आहे. आरोग्य निगा विेषकांच्या मते ही कोंडी फुटण्यास १८ ते २४ महिन्यांचा कालावधी लागेल. अमेरिकेतील नागरिकांना वाजवी दरात आरोग्य निगा मिळविण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर ही कोंडी फुटणे अमेरिकेतील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. आर्थिक वर्ष २०१९ मध्ये नवीन औषधांच्या उपलब्धतेमुळे या कंपन्यांचे उत्सर्जन वाढेल. २०१९च्या उत्सर्जनाचा विचार करता आरोग्यनिगा क्षेत्रातील कंपन्यांच्या आजचा बाजारभाव गुंतवणुकीसाठी रास्तच म्हणायला हवा.
आरोग्यनिगा क्षेत्राच्या भारतातील बाजारपेठेचा विचार केल्यास या क्षेत्रातील कंपन्यांच्या देशांतर्गत विकल्या जाणाऱ्या औषधांची संख्या ९ ते १२ टक्के वार्षिक दराने वाढत आहे आणि औषधांच्या किंमतीचा विचार केल्यास विक्री १२ ते १५ टक्कय़ांनी वाढत आहे. या वाढीला प्रामुख्याने आरोग्य विम्याबाबत जागरुकतेमुळे आरोग्य विमाछत्र असलेल्या रुग्णांच्या संख्येत (जेणेकरून आरोग्यावरील खर्चात) होत असलेली वाढ आणि उपचार पद्धतीतील बदल हे दोन घटक कारणीभूत आहेत. या उद्योगाच्या देशांतर्गत वाढीला खीळ बसेल असे सरकारचे धोरण आहे. वैद्यकीय व्यावसायिकांनी रुग्णांना औषधे सर्वसाधारण नावांनी (जेनेरिक) द्यावी असा फतवा काढला आहे. कर्करोग थायरॉइड, मधुमेह या सारख्या आजारांवर घेतली जाणाऱ्या औषधांना सर्वसाधारण गटातील औषधे पर्याय ठरू शकणार नाहीत. भारतातील बाजारपेठेत नाममुद्रांकित औषधांचे प्रमाण पाहता सरकारच्या या धोरणामुळे, आरोग्यनिगा क्षेत्राचा वृद्धीदर २ ते ३ टक्कय़ांपेक्षा अधिक मात्रेने घटणार नाही.
दुसरी महत्वाची गोष्ट अशी की, ८ लाख कोटींचे एकत्रित बाजारमूल्य असलेल्या या उद्योगाचा २००७—०८ मध्ये निर्देशांकात ३ टक्के प्रभाव होता. २०१४—१५ मध्ये हा प्रभाव १४—१५ टक्कय़ांदरम्यान गेला होता. सध्या हा प्रभाव पुन्हा ६ टक्के इतका कमी झाला आहे. मागील तीन वर्षांत या उद्योगाच्या बाजारमूल्यात १० ते १५ टक्के घट झाली आहे. एखादे उद्योगक्षेत्र जेव्हा या प्रकारच्या संक्रमण अवस्थेतून जाते तेव्हा समभागांचे भाव कमी झाल्यामुळे त्यांचा निर्देशाकातील प्रभाव कमी होतो त्याच वेळी आकर्षक मूल्यांकनामुळे नव्याने खरेदी करण्याची संधी उपलब्ध असते. अशी संधी आरोग्य निगा क्षेत्रातील घटनांमुळे नव्याने गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना उपलब्ध झाली आहे. ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड’ यादीतील मागील एका वर्षांतील गुंतवणुकीवर नकारात्मक परतावा देणारा एकमेव फंड आरोग्य निगा क्षेत्रातील आहे. भारतातील लोकसंख्येचे प्रमाण व मानवी आरोग्याबाबतची चिंताजनक स्थिती लक्षात घेता या क्षेत्रातील कंपन्यांना व्यवसाय विस्तारास मोठी संधी उपलब्ध आहे. व्यवसायातील चढ उतार कुणालाच चुकत नसतात. वॉरेन बफे यांनी कंपन्यांना कठीण काळ असतांना त्यांत गुंतवणूक केली. बफे यांच्यामते कंपन्यांना कठीण काळात मूल्यांकन गुंतवणुकीसाठी आकर्षक असते. आरोग्य निगा क्षेत्रातील कंपन्यांचे मूल्यांकन अशा पातळीवर आहे. या संधीचे सोने करू पाहणाऱ्या आणि मध्यम जोखीम स्वीकारून तीन ते पाच वर्षांत मोठय़ा भांडवली वृद्धीची अपेक्षा असलेल्या गुंतवणूकदरांसाठी आजची ही शिफारस.
वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com
(अस्वीकृती: या स्तंभात वापरलेली माहिती व आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)