वसंत माधव कुळकर्णी
नवीन वर्षांच्या आगमनाबरोबर शिफारसपात्र फंडांची यादी तयार होत असते. ‘अर्थवृत्तान्त’नेही यापूर्वी ‘कर्ते म्युच्युअल फंडा’तून अशी यादी वाचकांपुढे ठेवली आहे. मध्यंतरी ‘सेबी’ने म्युच्युअल फंडाचे सुसूत्रीकरण लागू केले, त्यानंतर प्रसिद्ध होणारी ही पहिली यादी आहे. या वर्षीच्या शिफारसप्राप्त फंडांची यादी आणि जानेवारी २०१८ ची यादी यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. मागील यादीतील शिफारसप्राप्त फंडांच्या कामगिरीत घसरण झाल्याने वगळल्या गेलेल्या फंडांची संख्या अधिक आहे.
यादी बनविण्यास सुरुवात केली तेव्हा पाच वर्षे पूर्ण झालेले आठ हजारांहून अधिक फंड उपलब्ध होते. मागील अनेक वर्षांच्या निकषात मामुली बदल करत शेवटच्या टप्प्यात २५६ फंड सखोल विश्लेषणासाठी शिल्लक राहिले. या वर्षीच्या यादीत अनेक फंडांचा पहिल्यांदाच समावेश झाला आहे. लार्जकॅप गटात पीजीआयएम इंडिया लार्जकॅप, एलआयसी एमएफ लार्जकॅप फंड आदींचा समावेश आहे.
या फंडांच्या संभाव्य तारांकित सुधारणेची शक्यता ‘लोकसत्ता अर्थवृत्तान्त’मध्ये (११ नोव्हेंबर २०१९) व्यक्त केली होती. प्रत्यक्षात जानेवारीत ‘मॉर्निंगस्टार’ने या फंडाची पत एका ताऱ्याने वाढवून या फंडांच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब केले आहे.
यापूर्वी जानेवारी २०१२ मध्ये बनलेल्या पहिल्या यादीपासून समावेश असलेल्या आदित्य बिर्ला फ्रंटलाइन इक्विटी फंड गचाळ कामगिरीमुळे या यादीतील स्थान गमावून बसला. मल्टीकॅप गटात यूटीआय इक्विटी फंडाचा पहिल्यांदाच समावेश झाला. उद्योग क्षेत्रीय फंड गटांमध्ये बँकिंग फंड गटात टाटा बँकिंग अॅण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड, ‘कन्झम्प्शन’ गटात कॅनरा रोबेको कन्झ्युमर ट्रेंड फंड, या यादीचा पहिल्यांदा भाग बनले. एलआयसी एमएफ इन्फ्रास्ट्रक्चर फंडांची निवड वाचकांसाठी सर्वात धक्क्का देणारी असली तरी निकषांच्या आधारे या फंडाची निवड झाली. तर २०१५ मध्ये यादीतील स्थान गमावून बसलेल्या निप्पॉन इंडिया फार्मा फंडाची चार वर्षांनंतर घरवापसी झाली आहे. स्मॉलकॅप गटात अॅक्सिस स्मॉलकॅप आणि एल अॅण्ड टी इमर्जिंग इक्विटी फंड यांचादेखील या यादीत पहिल्यांदाच समावेश झाला.
मागील वर्षभरात मोठी मालमत्ता बाळगणाऱ्या एचडीएफसी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, एसबीआय, आदित्य बिर्ला सन लाइफ या सारख्या फंड घराण्यांच्या फंडांच्या कामगिरीतील घसरणीमुळे या यादीवर या फंड घराण्यांचा दबदबा नसेल ही अटकळ खरी ठरली. सर्वाधिक मालमत्ता असणाऱ्या पहिल्या चार फंड घराण्यांपैकी एकाही फंड घराण्याच्या फंडाचा या यादीत समावेश नाही. ‘एसआयपी’ किंवा एकरकमी गुंतवणुकीच्या परताव्याच्या क्रमवारीत या फंड घराण्यांचे फंड तळाला आहेत.
जागेच्या मर्यादेमुळे यादीतील फंडांची संख्या २५ ठेवावी असे ठरले. त्यामुळे सीमारेषेवरील मिरॅ लार्जकॅप सारख्या फंडांना यादीतील समावेशापासून मुकावे लागले. मिरॅ लार्जकॅप हा फंड मागील सहा वर्षांपासून या यादीचा भाग होता. या फंडाचे वगळणे चटका लावून गेले. पुढील तिमाहीत या यादीचे पुनरावलोकन होईल तेव्हा या फंडांचा समावेश होण्याची शक्यता फंडाच्या त्रमासिक कामगिरीवर ठरेल आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडाला २०१६ मध्ये रजा देण्यात आली. सर्वाधिक वेगाने मालमत्ता वाढत असणाऱ्या फंडाला तेव्हा वगळण्याचा निर्णय त्या फंड घराण्याला रुचला नव्हता. मात्र प्रत्यक्षात तेव्हापासून आजपर्यंत फंडाच्या कामगिरीत सातत्याने झालेली घसरण यादीसाठी निश्चित केलेल्या निकषांचा दर्जा अधोरेखित करते.
सरलेले वर्ष नि:संशय अॅक्सिस आणि मिरॅ फंड घराण्यांचे होते. साहजिकच या यादीत सर्वाधिक फंड अॅक्सिस फंड घराण्याचे आहेत. अॅक्सिस फंड घराण्याच्या दोन फंडांनी आपले स्थान कायम राखले तर दोन फंडांचा नव्याने समावेश झाला. मिरॅ फंड घराण्याचे फंड एलएसएस आणि कंझ्युमर फंड यांचा समावेश होऊ शकला नाही. या यादीची अद्ययावत स्थिती महिन्याच्या शेवटच्या सोमवारी या सदरातून प्रसिद्ध होईल. पंगतीत जेवल्याशिवाय आणि संगतीत राहिल्याशिवाय माणूस ओळखता येत नाही. आजवर जे फंड यादीत होते त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना वगळण्यात आले. ‘आजवर ज्यांची वाहिली पालखी’ अशा फंडांना निरोप देण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला.
शिफारसपात्र फंड
लार्जकॅप
अॅक्सिस ब्ल्यूचिप फंड
कॅनरा रोबेको ब्ल्यूचिप लिक्विटी फंड
डीएसपी टॉप १०० फंड
एलआयसी एमएफ लार्जकॅप फंड
पीजीआयएम इंडिया लार्जकॅप फंड
लार्ज अॅण्ड मिडकॅप
मिरॅ इमìजग ब्लूचीप
टाटा लार्ज अॅण्ड मिडकॅप
मिडकॅप फंड
अॅक्सिस मिडकॅप
एल अॅण्ड टी मिडकॅप फंड
फोकस फंड
अॅक्सिस फोकस्ड २५ फंड
डीएसपी फोकस्ड फंड
स्मॉलकॅप फंड
अॅक्सिस स्मॉलकॅप फंड
डीएसपी स्मॉलकॅप फंड
एल अॅण्ड टी इमìजग बिजनेसेस फंड
मल्टीकॅप
पराग पारिख लाँग टर्म इक्विटी फंड
यूटीआय इक्विटी फंड
ईएलएसएस फंड
अॅक्सिस लाँगटर्म इक्विटी फंड
बीओआय अॅक्सा टॅक्स सेव्हर फंड
डीएसपी टॅक्स सेव्हर फंड
सेक्टोरल फंड
कॅनरा रोबेको कंझ्युमर फंड
निप्पॉन इंडिया फार्मा फंड
सुंदरम फायनान्शियल सर्व्हिसेस अपॉच्र्युनिटीज फंड
एलआयसी एमएफ इन्फ्रास्ट्रक्चर फंड
फ्रँकलिन इंडिया टेक्नोलॉजी फंड
व्हॅल्यू फंड
एल अॅण्ड टी इंडिया व्हॅल्यू फंड
* म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर
shreeyachebaba@gmail.com