वसंत कुळकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोअर ॲण्ड सॅटेलाइट ही गुंतवणुकीची जुनी आणि यशसिद्ध रणनीती आहे. पोर्टफोलिओ तयार करताना गुंतवणूक नियोजन प्रक्रियेच्या काळात या रणनीतीचा वापर होतो. दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी पोर्टफोलिओचे सक्रिय व्यवस्थापन आवश्यक असते. ज्यांचा जोखीमांक अधिक आहे, त्यांच्या सॅटेलाइट पोर्टफोलिओचा एक भाग म्हणून ‘यूटीआय ट्रान्सपोर्टेशन ॲण्ड लॉजिस्टिक्स फंडा’त गुंतवणूक करण्याची ही शिफारस आहे. आर्थिक आवर्तनांशी निगडित असलेल्या या फंडात गुंतवणुकीची उच्च जोखीम संभवते.

‘जे खाली जाते ते कधी तरी वर येते’ हा नियम आवर्तनांशी निगडित असलेल्या वाहन निर्मितीसारख्या उद्योग क्षेत्रांना लागू पडतो. करोनासाथीने ज्या उद्योगांची दैना केली त्यात वाहन उद्योगाचा क्रम खूप वरती लागतो. एप्रिल-जून २०२० तिमाहीत एकही वाहन न विकू शकलेला वाहन उद्योग अद्याप करोनापूर्व पातळीवर येण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून वाहन उत्पादकांनी नवीन मॉडेल बाजारात उपलब्ध करून दिली असून जुलै-सप्टेंबर या तिमाहीत सर्व वाहन उत्पादकांनी मिळून २२ मॉडेल्स उपलब्ध करून दिली आहेत. गणपती ते दिवाळी हा सणांचा कालावधी वाहन उद्योगासाठी महत्त्वाचा हंगाम समजला जातो. या येणाऱ्या सणांच्या कालावधीत वाढणारी मागणी लक्षात घेऊन वाहन उत्पादकांचा कल युटिलिटी व्हेईकल (यूव्ही) आणि व्यावसायिक वाहन (सीव्ही) याकडे असतो. या प्रकारातील नवीन मॉडेल्स विक्रीसह उपलब्ध करून देण्यात वाहन उत्पादक आघाडीवर आहेत.

आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून २०२२) विकल्या गेलेल्या नवीन वाहनांच्या संख्येवरून असा निष्कर्ष निघतो की, यूव्ही वाहन प्रकार आघाडीवर असून मागील वर्षांच्या तुलनेत त्यात २५ टक्के वाढ नोंदली गेली आहे. सर्व प्रकारच्या (दुचाकी, प्रवासी वाहने, तीन चाकी, व्यापारी वाहन आणि ट्रॅक्टरसह) नवीन वाहनांच्या संख्येत १८.६८ टाक्यांची वाढ झाली आहे (संदर्भ ‘सियाम’ आकडेवारी). आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या सहामाहीत वाहन विक्रीची घोडदौड अशीच सुरू राहण्याची शक्यता असून वाढत्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामुळे व्यापारी (लहान मध्यम आणि अवजड) वाहनांच्या विक्रीत मागील पाच वर्षांतील सर्वोच्च वाढ नोंदली जाईल असा कयास विश्लेषक मांडत आहेत. नवीन वाहनांच्या विक्रीच्या वाढीचे प्रमाण मागील तीन आर्थिक वर्षांमध्ये सातत्याने घसरत होते. हे पहिले आर्थिक वर्ष आणि एप्रिल जून ही पहिली तिमाही होती ज्या तिमाहीत नवीन विकलेल्या वाहनांची संख्या मागील तिमाहीपेक्षा अधिक नोंदली गेली.

‘निफ्टी ऑटो इंडेक्स’मागील तीन वर्षे सपाट (क्ष अक्षाला समांतर) राहिल्यानंतर या वर्षी प्रथमच अन्य क्षेत्रीय निर्देशांकांच्या तुलनेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांपैकी एक क्षेत्रीय निर्देशांक ठरला आहे. गुंतवणूकदार बेंजामिन ग्रॅहम यांनी ‘मिस्टर मार्केट’ हे शेअर बाजारातील तर्कहीन किंवा विरोधाभासी आणि कळपाच्या विचारधारेने गुंतवणूक करणाऱ्यांसाठी धोके विशद करण्यासाठी एक रूपक तयार केले आहे. ‘मिस्टर मार्केट’ची पहिली ओळख गुंतवणूकदारांना त्यांनी त्यांच्या ‘द इंटेलिजेंट इन्व्हेस्टर’ या पुस्तकातून १९४९ मध्ये त्यांनी करून दिली. या स्तंभातील शिफारस केलेला फंड – अशा कळपाच्या विचाराने (मागील परतावा पाहून गुंतवणूक करणाऱ्या) गुंतवणूकदरांसाठी धक्कादायक असू शकेल. या फंडाची शिफारस २४ ऑगस्ट २०२० रोजी ‘लोकसत्ता अर्थवृत्तान्त’मधून सर्वप्रथम केली होती. एप्रिल-जून तिमाहीत एकही वाहन न विकलेल्या तिमाहीनंतर ही शिफारस केली होती आणि त्या दिवशी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला २० सप्टेंबर २०२२ च्या एनएव्हीनुसार वार्षिक १४.७२ टक्के परतावा मिळाला आहे. या दिवशी ‘एसआयपी’ केलेल्या गुंतवणूकदारांना २९ टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे. बाजार ऑक्टोबर २०२१ मध्ये शिखरावर असतांना वाहन आणि पूरक उत्पादनांचे उत्पादक असलेल्या १७१ पैकी ५० कंपन्या वर्षभराच्या सर्वोच्च स्थानी होत्या. आज वाहन उद्योगातील अनेक कंपन्यांचे मूल्यांकन (किंमत उत्सर्जन गुणोत्तर) त्यांच्या तीन वर्षांतील सर्वोच्च स्थानी आहे. तथापि, वाहन क्षेत्रातील आवर्तन साधारणत: दोन-तीन वर्षे टिकून राहिल्याचा इतिहास असल्याने आजही वाहन क्षेत्रात तीन ते पाच वर्षांचा दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळविता येईल. म्हणून जे जोखीम घेऊ इच्छितात ते त्यांच्या सॅटेलाइट पोर्टफोलिओमध्ये यूटीआय ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक फंडाचा समावेश करू शकतात.

सध्या या क्षेत्रात गुंतवणूक करणारा हा एकमेव सक्रिय फंड आहे. आयडीएफसी म्युच्युअल फंडही लवकरच, ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक फंड उपलब्ध करून देईल असे ऐकिवात आहे. जे गुंतवणूकदार निष्क्रिय व्यवस्थापित फंडामध्ये गुंतवणूक करू इच्छितात त्यांना आयसीआयसीआय प्रुडेन्शियल आणि निप्पॉन इंडिया ईटीएफ हे पर्याय उपलब्ध आहेत. मागील १०, ५ तसेच ३ वर्षांच्या सरासरी परताव्याचे दैनंदिन चलत सरासरी परताव्याचे विश्लेषण केले असता असे दर्शविते की, हा फंड ‘निफ्टी ५०० टीआरआय’ आणि ‘निफ्टी ऑटो टीआरआय’पेक्षा मोठय़ा फरकाने अधिक परतावा मिळविण्यात यशस्वी झाला आहे.

सरासरीइतके झालेले पर्जन्यमान आणि पीक, कृषी-वस्तूंच्या आधारभूत किमतीत झालेली वाढ तसेच पीएम गतिशक्ती उपक्रमाचा फायदा व्यापारी वाहनांची विक्री वाढण्यात होणार आहे. ‘क्रिसिल पॅन इंडिया फ्रेट इंडेक्स’द्वारे असे दिसून आले की, रस्ते वाहतुकीसाठी मालवाहतुकीचे दर वाढले असूनही मालवाहतुकीची मागणी वाढत आहे. सरकारचा विद्युतशक्तीवरील वाहने अर्थात ‘ईव्ही’चा वापर वाढविण्याचे धोरण पाहता बहुतेक वाहन निर्माते आणि पुरवठादार या बदलासाठी तयारी करत आहेत. मिड- आणि स्मॉलकॅपपूरक उत्पादने पुरवठादारांनी या बदलावर लक्ष केंद्रित केले आहे, परिणामी मार्च २०२१ पासून वाहन आणि वाहनपूरक क्षेत्रातील कंपन्यांच्या बाजारभावात वाढ झाल्याचे दिसत आहे.

वाहन उद्योगातील सूचिबद्ध असलेल्या १७१ समभागांपैकी, ८ लार्जकॅप, १४ मिडकॅप आणि उर्वरित १४९ स्मॉलकॅप आहेत. फंडाच्या गुंतवणुकीत ३० ते ३५ कंपन्या निवडण्याचे कसब निधी व्यवस्थापक सचिन त्रिवेदी उत्तमपणे पार पाडत आहेत. फंडाच्या गुंतवणुकीत ६६ टक्के लार्ज कॅप, २३.६०टक्के मिडकॅप, ८.८६ टक्के स्मॉलकॅप कंपन्यांचा समावेश आहे. फंडाच्या गुंतवणुकीत मारुती सुझुकी, मिहद्र, बजाज ऑटो, टाटा मोटर्स आणि आयशर मोटर्स या वाहन निर्मात्या कंपन्यांचा ८ ते १८ टक्के समावेश असून या कंपन्यांच्या बरोबर पोर्टफोलिओमधील िमडा कॉर्पोरेशन, संधार टेक्नॉलॉजीज आणि जमना ऑटो या वाहनपूरक उत्पादक स्मॉलकॅपचा समावेश आहे. मागील काही महिन्यांत अशोक लेलँडमधील हिस्सा वाढविण्यात आला असून व्यापारी वाहनांच्या वाढलेल्या मागणीचा फायदा होऊ शकेल. दुचाकी वाहनांची मागणी स्थिर असल्याने हिरो मोटोकॉर्पमधील गुंतवणूक कमी केली आहे. निधी व्यवस्थापकांनी एन्डय़ुरन्स टेक्नोलॉजीचा नव्याने समावेश केला असून, टीमकेम आणि बाळकृष्ण इंडस्ट्रीज वर्षभरापूर्वी उच्च मूल्यांकनामुळे वगळण्यात आले आहे.

वाहन उद्योगातील कंपन्यांच्या मागील तीन वर्षांच्या ताळेबंदाचे विश्लेषण केले असता, मागील दोन वर्षे विक्री वाढून देखील नफा न वाढल्याचे दिसून आले. लोखंड, शिसे, अॅल्युमिनीयम या सारख्या जिन्नसांच्या किमतीत वाढ झाल्याने नफ्याच्या प्रमाणात वाढ झाली नसल्याचे दिसून आले. जिन्नसांच्या किमतीत आता घट झाल्याने आणि उत्पादकांनी वाहनांच्या किमतीतील येत्या वर्षांत अस्थिरता शिगेला पोहोचली असल्याने वर्षभरात दोन किंवा तीन टप्प्यांमध्ये एकरकमी गुंतवणुकीचा सल्ला देण्यात येत आहे. प्रत्येक गुंतवणुकीची एक उत्तम वेळ यावी लागते. ऑटो क्षेत्रात गुंतवणूक करण्याची हीच वेळ आहे.

shreeyachebaba@gmail. Com
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Core and satellite investment strategy portfolio arrangement uti transportation and logistics fund amy
First published on: 26-09-2022 at 00:09 IST