|| डॉ. आशीष थत्ते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दैनंदिन जीवनातील व्यवहारासह कोणत्याही व्यवसायात किंवा उद्योगामध्ये उत्पादन घटकांची जशी किमान पातळी राखावी लागते तशी कमाल पातळीसुद्धा राखणे गरजचे असते. अन्यथा वापराचे ठोकताळे न बांधता भरमसाट खरेदी करून ठेवणारे महाभागही कंपन्यांमध्ये पाहिले आहेत. स्वस्तात मिळते व कधी ना कधी वापर होणारच आहे असे सांगून घ्या खरेदी करून! पुढे जाऊन टंचाई होणार आहे किंवा आता स्वस्त मिळते आहे म्हणून खरेदी केल्याचे आठवते का हो? पहिल्या टाळेबंदीच्या वेळी खरेदी केलेल्या किती वस्तू फुकट गेल्या याचे मोजमाप कदाचित केले नसावे. एका प्रसिद्ध किराणामालाच्या साखळीच्या मालकाने कबूल केल्याप्रमाणे, त्यांच्या कंपनीने केलेल्या नफ्याचे गणित यावर तर अवलंबून होते. नाशवंत वस्तू तर नक्कीच आपण खूप आणत नाही. मात्र साठा करायच्या वस्तू जसे की, गहू, तांदूळ वगैरे उन्हाळय़ाचा आधी भरून ठेवणे नक्की करतो. पण हेदेखील गृहिणी त्याच्या वापराचा अंदाज घेऊनच करत असतात. अन्यथा कुठलाही डब्बा उघडावा तर तांदूळच दिसायचे.

कंपन्यांमध्येदेखील कमाल पातळीवर लक्ष ठेवले जाते. याला मॅक्सिमम लेव्हल किंवा साठय़ाची कमाल पातळी असे म्हणतात. उगाचच साठा करून ठेवणे म्हणजे त्यात बरेचसे पैसे व जागा अडकून राहतात. पुन्हा विकत घेतलेली वस्तू अप्रचलित होण्याचा धोकासुद्धा असतोच. औषधांच्या बाबतीत घरी हे नक्की होतेच. म्हणून अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला वस्तूंचे विकत घेण्याचे प्रमाण ठरवावे लागते ‘अति तेथे माती’ असे उगाचच म्हणत नाहीत. नुकत्याच एका घटनेमध्ये घरात खूप प्रमाणावर असणारा रोख स्वरूपातील पैसा हा राष्ट्रीय चर्चेचा विषय झाला होता. तेव्हा प्रत्येक गोष्टीची कमाल पातळी ठरवावी लागते. अगदी जसे आपल्याला समारंभात वगैरे कप किंवा ग्लास भेटवस्तू म्हणून मिळतात, त्या पुढे कुणाला तरी भेटवस्तू म्हणूनसुद्धा दिल्या जातात. कारण त्यांनी कमाल पातळी गाठलेली असते. तथापि घरातील गृहिणींना साडय़ा या विषयाची मात्र कमाल पातळी नसते आणि माझा सल्ला ऐकाल तर याची कमाल पातळी ठरवूदेखील नका.

कंपन्यांमध्ये या सगळय़ा पातळय़ा ठरवताना एक गणित मांडले जाते, घरात मात्र गृहिणींना गणित डोक्यात मांडावे लागते. त्यांना अनुभवावरून कमाल किंवा किमान पातळीचा चांगला अंदाज असतो. म्हणूनच सामाजिक शास्त्रे घरात वापरताना कलात्मक असतात तर व्यावसायिक उपयोग करताना वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा लागतो. बाकी प्रेम, माया, राग, लोभ, द्वेष, मत्सर, लालसा वगैरे यांची कमाल पातळी गाठली जाऊ नये याची काळजी प्रत्येकाने घ्यावी.

लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत /

ashishpthatte@gmail.com

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Determination of the maximum investment maximum iinvestment amount akp
First published on: 24-01-2022 at 00:28 IST