|| समीर नेसरीकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या प्रत्येकाच्या जन्मापासून आपल्याला पडलेला हा प्रश्न आहे की, ‘कोऽहम’, ‘मी कोण आहे?’ अगदी आयुष्याच्या संध्याछायेत असलेल्यांनाही हे कोडे खूप वेळा अखेपर्यंत अनुत्तरितच राहते. अनेक वादळे अंगावर झेलत आपली नाव हळूहळू पुढे जात राहते आणि किनाऱ्यावर पोहोचल्यावर ईप्सित स्थळी पोहोचल्याच्या आनंदापेक्षा प्रवासातले निसटून गेलेले क्षणच जास्त आठवत राहतात. जेव्हा समुद्राला भरती असते तेव्हा काही माणसे गांगरून जातात, किनाऱ्याला लागल्यावरच त्यांना हायसे वाटते. तर काही जण समुद्राच्या अस्थिरतेचा आनंद लुटतात, आपला प्रवास संस्मरणीय करतात. समुद्र एकच असतो, पण प्रत्येकाच्या मानसिक स्थितीप्रमाणे आपण परिस्थितीला वेगवेगळा प्रतिसाद देत राहतो. गुंतवणुकीच्या प्रवासाबद्दलही असेच काहीसे आहे, आपल्या प्रत्येकाच्या काही धारणा, समजुती, मान्यता असतात. आपण सर्व जण भावनाशील (‘भावनाविवश’ हा नकारात्मक शब्द टाळला आहे) असतो आणि या भावनिकतेचा आपल्या वित्तीय निर्णयांवर परिणाम होतो. आपल्या मूळ स्वभावामुळे प्रभावित होणारे आपले आर्थिक निर्णय याचा अभ्यास वर्तणूक वित्त (बिहेव्होरिअल फायनान्स) शाखेत होतो असे सोप्या शब्दांत म्हणता येईल. यातील काही मुद्दे विषय समजण्यासाठी मांडतो.

आज गुंतवणुकीपूर्वी आपण ‘ग्राहकाला ओळख’ (नो युअर क्लायंट – केवायसी) नावाची प्रक्रिया पूर्ण करतो. इथे आवर्जून सांगणे हेच की, त्याचसोबत प्रत्येकाने ‘स्वत:ला ओळख’ (नो युअरसेल्फ – ‘केवायएस’) हा अभ्यासही जरूर करावा.

कळप मानसिकता (हर्ड मेन्टॅलिटी)

आपण नेहमी तुलना करत जगत असतो. समोरच्याला जो फायदा होत आहे किंवा होणार आहे, तो आपल्यालाही व्हावा अशी आपली इच्छा असते. त्यानुसार नकळतपणे आपण दुसऱ्यांचे गुंतवणूक निर्णय आपल्यालासुद्धा लागू असतील या भावनेतून गुंतवणूक करतो आणि तिथेच फसतो. बाजारामध्ये सर्व काही आलबेल चालू असते, तेव्हा काही काळ आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. मात्र जेव्हा बाजार पडतो तेव्हा आपल्याला वास्तवाचे भान येते. प्रत्येक माणसाची स्वत:ची अशी जोखीमक्षमता असते, त्याचा विचार करूनच गुंतवणूक करावी. अतिउत्साह आणि फाजील आत्मविश्वास हे एक धोकादायक कॉकटेल आहे, ते नेहमी वर्ज्य मानावे. हे झुगारून देणे अवघड असले तरी जिथे आपण कष्टाची कमाई गुंतवितो तिथे स्वत:ला किंवा आपल्या गुंतवणूक सल्लागाराला जास्तीत जास्त प्रश्न विचारून गुंतवणूक योजना समजून घेणे गरजेचे आहे, याचे भान ठेवणे आवश्यक आहे.

नुकत्याच घडून गेलेल्या घटनेचा परिणाम (रिसेन्सी इफेक्ट)

आपल्याला नुकत्याच घडून गेलेल्या घटना जास्त लक्षात राहतात आणि नकळतपणे आपण त्यालाच जास्त महत्त्व देतो. उदाहरणादाखल, म्युच्युअल फंडांचा विचार करता आपण मागील सहा महिने, एक वर्षांचा परतावा लक्षात घेऊन निर्णय घेतो आणि दीर्घकालीन कामगिरी नजरअंदाज करतो. भांडवल बाजाराचे उदाहरण घ्यायचे तर आपल्याला पक्की खात्री पटते की, अमुक-अमुक कंपनीचा समभाग वरच जाणार आहे. कारण, बाजार गेले दोन महिने तेजीत आहे. काही वेळा एकदिशात्मक वाटचाल आपल्याला कायमस्वरूपी वाटते आणि तिथेच आपण चुकतो. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना गतकामगिरीव्यतिरिक्त काही बाबींचा विचार अत्यंत आवश्यक आहे. केवळ एका घटकावर आधारित गुंतवणूक ‘सुयोग्य’ ठरणार नाही. एक सर्वंकष विचार करून, प्रसंगी या क्षेत्रातील व्यावसायिक सल्ला घेऊन पुढे जावे.

तोटा टाळण्याकडे कल  (लॉस अ‍ॅव्हर्जन)

माझे भांडवल कमी न होता परताव्याची हमी असलेली योजना असेल तर सांगा, अशी विचारणा वारंवार होत असते. मला कोणत्याही परिस्थितीत तोटा होता कामा नये, या अटीवरच गुंतवणूकदार अडून बसतात. आपल्याला १,००० रुपयांचा तोटा २,००० रुपयांच्या फायद्यापेक्षा जास्त सलतो. या अशा मानवी स्वभावामुळे आपण नेहमी तोटा दूर लोटतो आणि संपत्तीनिर्मितीला मुकतो. तुमचे एक सकारात्मक पाऊल आर्थिक पुनर्वसन करू शकते हे लक्षात घेतले पाहिजे. निश्चित उत्पन्न देणाऱ्या योजना या महागाईवर मात करू शकत नाहीत. महागाईचा दर हा इंधन, वैद्यक, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत वेगवेगळा असतो. अशा वेळी जर आपले वित्तीय ध्येय १०/१५/२० वर्षे लांबचे असेल तर नियमितपणे समभागसंलग्न आणि दीर्घकालीन गुंतवणूक करणे गरजेचे आहे, जेणेकरून दररोज घडणाऱ्या चढ-उतारांचा मानसिक दबाव आपल्यावर नसेल आणि तर्कशुद्ध निर्णय प्रक्रियेचा चांगला परिणाम दिसून येईल.

निवडलकवा (चॉइस पॅरालिसिस)

आपल्या लहानपणी दूरदर्शनवर खूप मर्यादित कार्यक्रम असायचे. ते ‘कृष्णधवल’ युग असल्यामुळेच की काय जीवनातल्या वेगवेगळय़ा रंगांचा आनंद आपण अगदी मनसोक्त अनुभवला. वर्षांकाठी एक-दोनदाच नवीन कपडे घेतले जायचे म्हणून त्याबद्दल अप्रूप होते. आज प्रत्येक खरेदीत, अगदी कपडय़ांपासून ते मोबाइल फोनपर्यंत असंख्य पर्याय आपल्यापुढे उभे ठाकतात. या विपुलतेच्या भूलभुलैयातून खरेदी करताना दमछाक होते. अल्पकालीन किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीच्या म्युच्युअल फंड योजना अभ्यासताना अशीच निवड हतबलता जाणवते. दररोज वेगवेगळय़ा स्वरूपांत प्रदर्शित होणाऱ्या माध्यमातील जाहिरातींमधून आपल्याला लागू होणारी नेमकी योजना कोणती, यात गोंधळ होऊ शकतो. यावरील उपाय म्हणजे आपल्या उद्दिष्टाधारित गुंतवणुकीच्या दृष्टीने, आपल्या जोखीम क्षमतेनुसार योजना पारखून घेणे. आपल्याला हा अभ्यास शक्य नसेल, तर या क्षेत्रातील जाणकाराचा सल्ला घ्यावा. लक्षात ठेवा, तुमची एक छोटीसी चूकसुद्धा तुम्हाला तुमच्या वित्तीय ध्येयापासून दूर घेऊन जाईल.

जसे दररोजच्या जेवणात पोळी, भाजी, आमटी, भात, लोणचे, कोिशबीर अशा सर्व पदार्थाचा समावेश आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असतो. त्याचप्रमाणे आर्थिक आरोग्य उत्तम ठेवायचे असल्यास वेगवेगळय़ा मालमत्ता वर्गात (अ‍ॅसेट क्लास) ध्येयावधीप्रमाणे केलेली गुंतवणूक फायद्याची ठरते. प्रत्येक मालमत्ता वर्गाचा परतावा कालानुरूप वेगवेगळा असतो. एक चांगला पोर्टफोलिओ आपल्या एकत्रित गुंतवणुकीचा समतोल राखण्याचे काम करतो. प्रत्येकाने वेळ काढून नियमितपणे आपल्या कुटुंबाचा वित्तीय आढावा जरूर घ्यावा. गुंतवणूक आपल्याकडून अंतर्मुखता मागते, ती प्रत्येकाने सुरुवातीपासूनच जाणीवपूर्वक रुजवल्यास ‘कोऽहम’पासून ‘सोऽहम’पर्यंतचा दुवा सांधला जाईल. मन अस्थिर, चंचल आहे. सुधीर मोघे यांच्या कवितेत त्यांनी म्हटलंय की, ‘मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल’ आहे. शाश्वत संपत्तीनिर्मितीच्या वाटेवर चालताना आपल्या मनातल्या सैतानाला वाढू द्यायचे की मनातल्या देवाच्या पावलांवर फुले वाहायची हे आपल्याला ठरवावे लागेल.

(लेखक मुंबईस्थित गुंतवणूकविषयक अभ्यासक)

sameernesarikar@gmail.com

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know your customer know your client process know yourself akp
First published on: 24-01-2022 at 00:31 IST