अजय वाळिंबे

काही कंपन्यांच्या बाबतीत गुंतवणूक सुचविताना खूप सुरक्षित वाटते. ओरॅकल फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस सॉफ्टवेअर लिमिटेड ऊर्फ ओएफएसएस ही त्यातलीच एक. १९८९ मध्ये स्थापन झालेली ओरॅकल फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस सॉफ्टवेअर (ओएफएसएस) नावाप्रमाणेच आर्थिक उद्योगांना विविध सेवा प्रदान करते. स्थापनेदरम्यान कंपनीचे नाव सिटीकॉर्प माहिती तंत्रज्ञान उद्योग असे ठेवले गेले आणि नंतर हे नाव बदलून आय-फ्लेक्स सोल्यूशन्स केले गेले. कंपनीत ओरॅकल कॉपरेरेशनची ७४ टक्के हिस्सेदारी आहे. ओरॅकल ही सर्वात मोठी एंटरप्राइझ सोल्यूशन्स कंपनी असून, कंपनीचे जगभरातील १४५ देशांमध्ये पसरलेल्या ८५०० पेक्षा जास्त वित्तीय सेवा ग्राहक आहेत.

ही कंपनी अमेरिकेत आय-फ्लेक्स सोल्युशन इन्क, नेदरलँड्समधील आय-फ्लेक्स सोल्युशन बीव्ही, सिंगापूरमधील आय-फ्लेक्स सोल्युशन पीटी आणि भारतात आयपीएसएल अशा चार सहाय्यक कंपन्या चालविते. या सहाय्यक कंपन्यांच्या माध्यमातून ती २७ पेक्षा जास्त ठिकाणी विक्री आणि विपणन क्षेत्रात मजबूत उपस्थिती मिळविण्यास सक्षम आहे.

कंपनीची भारत, सिंगापूर आणि अमेरिकेत १४ विकास केंद्रे असून कंपनीची हुलेट पॅकार्ड, आयबीएम, इंटेल, मायक्रोसॉफ्ट आणि सन मायक्रोसिस्टमसारख्या मातब्बर कंपन्यांशी युती/भागीदारी आहे.

कंपनीच्या प्रमुख उत्पादनात आणि सेवांमध्ये भांडवल बाजार, अनुपालन, कॉपरेरेट बँकिंग, सीआरएम, इस्लामिक बँकिंग, विमा, खासगी बँकिंग, रिटेल बँकिंग आणि जोखीम व्यवस्थापन यासारख्या विभागांना पूरक विविध सेवांचा समावेश होतो. कंपनीने फ्लेक्सक्यूब, प्राइम सोर्सिंग, रेव्हेलियस, आय-फ्लेक्स कन्सल्टिंग, मँटास, इन्शुअर, आय-फ्लेक्स बीपीओ ही उत्पादने यशस्वीरीत्या विकसित केली आहेत.

गेली अनेक वर्षे कंपनी सातत्याने उत्तम कामगिरी करत असून नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता देखील कंपनीने अपेक्षित कामगिरी करून दाखवली आहे. मार्च २०२१ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने ४,९८४ कोटी (गेल्या वर्षी ४,८६१ कोटी) रुपयांच्या उलाढालीवर १,७६२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो २० टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांकरिता ४००० टक्के लाभांश जाहीर केला आहे. आगामी वर्षांत कंपनीकडून बोनस वाटपदेखील अपेक्षित आहे. सध्याच्या अनिश्चित काळात गुंतवणूकयोग्य क्षेत्रातील, केवळ ४३ कोटी रुपये भांडवल असलेली, कुठलेही कर्ज नसलेली ही अल्प बीटा बहुराष्ट्रीय कंपनी तुमच्या पोर्टफोलियोसाठी एक मोलाची खरेदी ठरू शकेल.

ओरॅकल फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस सॉफ्टवेअर लि.

(बीएसई कोड – ५३२४६६)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ३,६६०/-

उच्चांक/ नीचांक : रु. ३,७९५ / २,२९५

बाजार भांडवल :

रु. ३१,५३३ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. ४३.०३ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  ७३.२६

परदेशी गुंतवणूकदार      १०.६१

बँक/ म्यु. फंड/ सरकार   ८.०१

इतर/ जनता     ८.११

संक्षिप्त विवरण

* शेअर गट    : लार्ज कॅप

* प्रवर्तक       : ओरॅकल कापरेरेशन

* व्यवसाय क्षेत्र  :  आयटी/सॉफ्टवेअर

* पुस्तकी मूल्य : रु. ७९६

* दर्शनी मूल्य : रु. ५/-

* गतवर्षीचा लाभांश     : ४०००%

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न : रु. २०४.७२

*  पी/ई गुणोत्तर :      १७.९

*  समग्र पी/ई गुणोत्तर : २७.२

*  डेट इक्विटी गुणोत्तर :       ०.०१

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :    १३०

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : ३६.७

*  बीटा :      ०.३

 सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.