बाजाराचा तंत्र-कल : ये लाल रंग कब मुझे छोडेगा

सरलेल्या सप्ताहात निफ्टी निर्देशांकाने १५,९००चा ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ तोडल्याने ३०० अंशाच्या परिघात निफ्टी निर्देशांकाची घसरण सुरू झाली.

stock market
(संग्रहित छायाचित्र)

आशीष ठाकूर

सरलेल्या सप्ताहात निफ्टी निर्देशांकाने १५,५०० चे खालचे लक्ष्य साध्य केले. पण याचे भाकीत हे वर्षांरंभाच्या ३ जानेवारीच्या लेखातच केले होते. तेव्हा तर रशिया-युक्रेन युद्ध, इंधन, खाद्य तेलाचे गगनाला भिडणारे भाव, देशांतर्गत व परदेशात महागाई, ती नियंत्रणात यावी म्हणून भारतात रिझव्‍‌र्ह बँकेने आणि अमेरिकेत फेडरल रिझव्‍‌र्हने कर्जावरील व्याजाचे दर वाढविण्याचे सत्र अशा कुठल्याही आर्थिक निराशाजनक बातम्यांचा लवलेशही नव्हता. मग हे भाकीत कसे केले..?

सरलेल्या सप्ताहात  निफ्टी निर्देशांकाने १५,९००चा ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ तोडल्याने ३०० अंशाच्या परिघात निफ्टी निर्देशांकाची घसरण सुरू झाली. १५,९०० उणे ३०० अंश १५,६००,  उणे ३०० अंश १५,३००.. हा सरलेल्या सप्ताहाचा साप्ताहिक बंद. सरलेल्या वर्षांतील १८ ऑक्टोबरच्या लेखात १८,६०० च्या उच्चांकाच्या भाकितापासून आजपर्यंत निफ्टीने लाल रंगाच्या विविध छटा असलेलेच पेहेराव वापरत, त्या वेळेला नमूद केलेले १५,५०० चे खालचे लक्ष्य सरलेल्या सप्ताहात गाठले. या मंदीच्या दाहकतेमुळे गुंतवणूकदारांची एकच भावना आहे – ‘ये लाल रंग कब मुझे छोडेगा’.. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ५१,३६०.४२ 

निफ्टी :  १५,२९३.५०

सरलेल्या सप्ताहात निफ्टी निर्देशांकाने १५,५०० चे खालचे लक्ष्य साध्य केले. पण याचे भाकीत हे वर्षांरंभाच्या ३ जानेवारीच्या ‘ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी’ या लेखात केले होते. तेव्हा तर रशिया – युक्रेन युद्ध, इंधन, खाद्य तेलाचे गगनाला भिडणारे भाव, देशांतर्गत व परदेशात महागाई, ती नियंत्रणात यावी म्हणून भारतात रिझव्‍‌र्ह बँकेने आणि अमेरिकेत फेडरल रिझव्‍‌र्हने कर्जावरील व्याजाचे दर वाढविण्याचे सत्र अशा कुठल्याही आर्थिक निराशाजनक बातम्यांचा लवलेशही नव्हता. मग हे भाकीत कसे केले..? आज ती प्रक्रिया वाचकांसमोर उलगडून सांगायची आहे. यासाठी तांत्रिक विश्लेषणातील ‘भूमिती श्रेणीतील’ वाढ (जीअमेट्रिकल प्रोग्रेशन – जी.पी.) या एकाच प्रमेयाचा आधार घ्यावासा वाटतो. हे प्रमेय १० जानेवारीच्या ‘मन उधाण वाऱ्याचे’ या लेखात विस्तृतपणे मांडलेले होते. त्या वेळेला निफ्टी निर्देशांकावर अवघ्या १४ कामकाजीन दिवसात १,४९५ अंशांची अतिजलद (२० डिसेंबरला १६,४१० च्या नीचांकावरून, ७ जानेवारीला १७,९०५ उच्चांक) वाढ झाली होती. ही वाढ पाया न रचता (बेस फॉर्मेशन) न करता झाल्याने, ही अतिजलद वाढ एखाद्याला सुखरूप बाहेर पडण्यासाठी (सेफ एग्झिट) म्हणून तर उपयोगात आणली जात नाही ना? अशी शंकाही स्वाभाविकपणे व्यक्त केली होती. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटनाक्रम पाहता.. बाजाराच्या पोशिंद्याना (परदेशी गुंतवणूकदार संस्था) अतिशय अद्ययावत माहिती / गुप्तचर संस्थाचे अहवाल मिळत असतात. त्या माहितीचे पृथ:करण / विश्लेषण करत त्यांच्या भविष्यकालीन हालचाली ठरत असतात.

आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकांनी १५,२०० चा आधार राखल्यास, ३००अशांच्या परिघातील वाटचाल ही १५,२०० अधिक ३०० अंश १५,५००, पुढे १५,८०० ते १५,९०० अशी असेल. ही तेजीची बाजू झाली. निफ्टी निर्देशांक १५,२००चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशाकाचे खालचे लक्ष्य हे १५,२०० उणे ३०० अंश १४,९००..१४,६०० असेल.

युद्ध हे कधीही सांगून होत नाही. तर शत्रू गाफील असतानाच आक्रमण करावे हा युद्ध शास्त्राचा नियम. पण शत्रूच्या प्रदेशात आक्रमण करताना सीमेवर सैन्याची जमवाजमव, हालचाली या टेहळणी उपग्रहामार्फत टिपता येतात. यात आक्रमण करणाऱ्याची (रशियाची) बलस्थाने, त्याची उपद्रवमूल्यता याचा एकत्रित विचार करता, भविष्यात युद्ध झाल्यास कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारात रशिया हा मुख्य पुरवठादार आहे. किंबहुना हेच ‘तेलास्त्र’ वापरत रशिया जगाला वेठीला धरू शकतो. त्यात खनिज तेलाच्या किमतींमधील दरवाढ ही चलनवाढीला निमंत्रण देते. त्यात अमेरिकेची मध्यवर्ती बँक ‘फेड’चे माजी प्रमुख अ‍ॅलन ग्रीनस्पॅन यांचा मानसपुत्र ‘क्वांटिटेटिव्ह इिझग’- कमी व्याजदरावर अथवा शून्य व्याजदराने अर्थव्यवस्थेत मुबलक पैसा उपलब्ध करून देण्याची योजना २००८ पासून सुरू होऊन ती आता तारुण्यात आल्याने ‘सोळावं वरीस धोक्याचे’ प्रमाणे या ‘क्वांटिटेटिव्ह इिझग’ संकल्पनेची काळी बाजू दिसून येणे अपरिहार्यच होते. तिनेच आजच्या अनियंत्रित चलनवाढ, भाववाढीला जन्म दिला. या सर्व गोष्टींचे एकत्रित आकलन केल्यास, बाजाराच्या पोशिंद्यांस भारतीय भांडवली बाजारातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी (सेफ एग्झिट) पाहिजे होती. दुसरी खटकणारी गोष्ट यांच्या बाबतीतील वंदता. ती म्हणजे ही मंडळी नाताळ साजरा करण्यासाठी आपल्या मायभूमीत जातात तेव्हा २० डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या सप्ताहापर्यंत यांचा सहभाग नगण्य असतो. या सर्व संकल्पनांना या वेळेला छेद मिळाला,२० डिसेंबर ते ७ जानेवारी मध्येच अवघ्या १४ कामकाजीन दिवसांत १,४९५ अंशांची अतिजलद वाढ झाली आणि हीच अतिजलद वाढ खटकणारी ठरली. ‘अ‍ॅन ओल्ड मॅन इन हरी’ वृद्ध माणसाची वयाला न शोभणारी धावपळ. हीच धावपळ तांत्रिक विश्लेषणातील ‘भूमिती श्रेणीतील’ वाटचाल या संकल्पनेने टिपली आणि १० जानेवारीच्या लेखात आता चालू असलेल्या सर्व निराशाजनक घटनांची दाहकता एका वाक्यात मांडण्यात आली – ‘निफ्टी निर्देशांक भले १८,००० ते १८,३०० उच्चांक मारेल, पण अंतिमत:‘भूमिती श्रेणीतील वाढी’च्या सिद्धांताप्रमाणे ही वाढ विनाशास कारणीभूत ठरेल.’  जे आज आपण अनुभवत आहोत.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Stock market analysis for last week weekly stock market update zws

Next Story
करावे  कर-समाधान : मृत व्यक्तींचे विवरणपत्र ..   
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी